आपला दवाखान्याचे ५७ लाख लाभार्थी

मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा

    06-Jun-2024
Total Views |

bmc
मुंबई, दि.६ : प्रतिनिधी मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा देणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची’ संख्या २३९ झाली असून, या दवाखान्यांतून आतापर्यंत तब्बल ५७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे प्रस्तावित केलेल्या २५० दवाखान्यांपैकी २३९ दवाखाने कार्यान्वित असून उर्वरित ११ दवाखाने देखील गरजेनुसार लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. १७ नोव्हेंबर २०२२ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सर्व नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने पहिला 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरू केला. त्यानंतर टप्प्याटप्याने दवाखाने सुरू करण्यात आले. गुरुवार, दि.६ जूनपर्यंत मुंबईतील आपला दवाखान्यांची संख्या २३९ झाली आहे. यामध्ये ३३ पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर, ८१ पोर्टा केबिन, १०८ उपलब्ध दवाखाने आणि १७ रेडी स्ट्रक्चर मधील दवाखाने आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांतून आतापर्यंत ५७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे. त्यात आपला दवाखान्यात ५६ लाख ४६ हजार ९९४ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तर १ लाख ३६ हजार ७५७ लाभार्थ्यांनी पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटरचा लाभ घेतला. येत्या काही दिवसांत महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘झिरो प्रिस्क्रीप्शन’ धोरण राबविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.
आपला दवाखान्यात मिळताहेत या आरोग्य सुविधा
- मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार, रक्त चाचण्या
- पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दंतचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय चिकित्सक, त्वचारोगतज्ञ आणि नेत्ररोग तज्ञ अशा विविध तज्ज्ञांमार्फत मोफत सल्ला
- आपला दवाखाना अंतर्गत फिजिओथेरेपी सेंटर देखील कार्यरत करण्यात आले आहेत
लवकरच या सुविधाही मिळणार
- खासगी निदान केंद्रांच्या (डायग्नोस्टिक सेंटर) माध्यमातून महानगरपालिकेच्या दराने डायग्नोस्टिक टेस्ट (एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय इ.) या सेवाही लवकरच सुरू करण्यात येतील
या वेळेत मिळताहेत उपचार
- पोर्टा केबिन आणि रेडी स्ट्रक्चर १३ दवाखाने पहिल्या सत्रात सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू असतात. तर दुसऱ्या सत्रात ९८ दवाखाने दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत सुरू असतात.
- नियमित दवाखाने केवळ दुसऱ्या सत्रात म्हणजे दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू असतात. असे एकूण १०८ दवाखाने मुंबईकरांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहेत.