दहशतवाद, नक्षलवादाविरोधात कठोर बिमोड सुरूच राहणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

दहशतवाद थांबल्याशिवाय पाकसोबत संबंध सुधारणार नाहीत – परराष्ट्र मंत्री जयशंकर

    11-Jun-2024
Total Views |
union home minister amit shah
 

नवी दिल्ली :      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातही दहशतवाद आणि नक्षलवादाचा बिमोड सुरूच राहणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी गृहखात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर दिली आहे. अमित शाह यांनी केंद्रीय गृह आणि सहकार खात्याचा पदभार सलग दुसऱ्यांदा स्वीकारला आहे. रायसिना हिलवरील नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयामध्ये शाह यांनी पदभार स्वीकारला.

त्यानंतर त्यांनी ‘एक्स’वर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भारताचे गृहमंत्रीपद स्वीकारले आहे. गृह मंत्रालय देश आणि देशवासियांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध काम करत राहणार आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाची सुरक्षा धोरणे आणि प्रयत्न नवीन उंचीवर पोहोचतील आणि भारत दहशतवाद व नक्षलवादाच्या विरोधात एक मजबूत शक्ती म्हणून उदयास येईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला आहे.

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पुन्हा एकदा डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांच्याकडेच परराष्ट्र खात्याची धुरा सोपविण्यात आली आहे. डॉ. जयशंकर यांनीदेखील सकाळी परराष्ट्र खात्याचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. जयशंकर म्हणाले, सध्याच्या विभाजित आणि संघर्षाच्या जगामध्ये भारत ‘विश्वबंधू’ म्हणून प्रस्थापित झाला आहे. तणावाच्या वातावरणामध्ये भारताकडे संपूर्ण जग आशेने बघत आहे.


विविध मंत्र्यांनी स्वीकारले पदभार

देशाची राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्र्यांनी आपापले पदभार स्वीकारले आहेत. कृषी व ग्रामविकास खात्याचा पदभार शिवराजसिंह चौहान यांनी स्वीकारला, तर रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याचा पदभार अश्विनी वैष्णव यांनी स्वीकारला आहे.

डॉ मनसुख मांडविय यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री म्हणून दिल्लीत कार्यभार स्वीकारला, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दूरसंचार खात्याचा पदभार स्वीकारला आहे.

त्याचप्रमाणे मुरलीधर मोहोळ यांनी सहकार राज्यमंत्री, रक्षा खडसे यांनी क्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री, रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.