‘जीवनविद्या फाऊंडेशन’च्यावतीने ग्रामसमृद्धी अभियानाची सुरुवात

    11-Jun-2024
Total Views |
Jeevanvidya Foundation

महाड
: सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षात ‘जीवनविद्या फाऊंडेशन, मुंबई’ व ग्रामपंचायत वरंध, ता. महाड, जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘सविता ऑईल टेक्नोलॉजिस लि.’ यांच्या सीएसआर निधीच्या सहकार्यातून ग्रामसमृद्धी अभियानाचे भव्य उद्घाटन नुकतेख संपन्न झाले.
 
कार्यक्रमास ‘सविता ऑईल टेक्नॉलॉजिस लि.’ कंपनीचे उपाध्यक्ष डॉ. किशोर संखे, निशांत देशमुख तसेच ‘जीवनविद्या फाऊंडेशन’चे विश्वस्त बन्सीधर राणे, ग्रामसमृद्धी अभियानाचे मुख्य समन्वयक आनंद राणे, ग्रामसमृद्धीचे कार्यकारी समन्वयक नवनाथ हळदणकर व अमर गावडे, वरंध गावाचे सरपंच जयवंत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्याहस्ते ग्रामसमृद्धी अभियानाच्या फलकाचे अनावरण व उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने पारंपरिक वाद्य खालू बाजा वादन करत सर्वांचे स्वागत करण्यात आले. श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डिजिटल वर्ग व पाण्याची टाकी यांचे अनावरण करण्यात आले. तसेच विद्यालयातील ग्रंथालयासाठी विविध पुस्तके प्रदान करण्यात आली. यावेळी शाळेत डिजिटल वर्गात संस्कार शिक्षण अभियानाची माहिती उषाताई पालकर यांनी ऑनलाइन दिली.
 
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ‘जीवनविद्ये’चे आजीव विश्वस्त आदरणीय प्रल्हाद वामनराव पै यांनीही ऑनलाइन उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना प्रल्हाद पै यांनी ‘सविता ऑईल टेक्नोलॉजिस लि.’ कंपनीचे व वरंध ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले. देशातील गावागावांत ग्रामसमृद्धी झाल्याने राष्ट्रप्रगती शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले. शिक्षण, संस्कार, पर्यावरण, आरोग्य, स्त्रीसन्मान, व्यसनमुक्ती, राष्ट्रहित याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. विकासाला विवेकाची जोड देत बन्सीधर राणे यांचे ‘जीवनविद्या काळाची गरज’ या विषयावर प्रबोधन झाले. गावात भेडसावणारी कचर्‍याची समस्या लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीने घंटागाडीचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. घराघरातून तयार होणारा ओला व सुका कचरा वर्गीकरण करून या घंटागाडीने जमा करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य व गावचे पर्यावरण सुयोग्य राखण्यास मदत होणार आहे. या सर्व कार्यक्रमात ग्रामपंचायत वरंधचे सरपंच जयवंत देशमुख, उपसरपंच, इतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान लाभले.

त्याचबरोबर, जीवनविद्या ज्ञानसाधना केंद्र, अंधेरी पूर्वचे अध्यक्ष राजेश नटे, सचिव यतीन माटे, अभियान प्रमुख प्रसाद ढवन, निलेश नवाळे आणि इतर नामधारकांनी उपस्थित राहून विशेष मेहनत घेतली. तसेच आगामी काळात जीवनविद्या अंधेरी पूर्व ज्ञानसाधना केंद्राच्यावतीने गावात नियमित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी गावाचे प्रथम नागरिक सरपंच जयवंत देशमुख यांनी ‘सविता ऑईल टेक्नोलॉजिस लि.’ कंपनीचे व ‘जीवनविद्या फाऊंडेशन’चे आभार व्यक्त केले व सर्वांना धन्यवाद देत कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आगामी काळात ग्रामसमृद्धी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.