प्रकाश प्रदूषणाचा जीवघेणा लखलखाट

    10-Jun-2024
Total Views |

प्रकाश प्रदूषणाच्या पहिल्या भागात आपण प्रकाशप्रदूषणाचे स्रोत तसेच परिणाम यांच्याविषयी माहिती घेतली. या भागात प्रकाश प्रदूषणामूळे मानवी आरोग्यावर तसेच वन्यजीवांवर होणारे परिणाम याबरोबरच उपायांचा आढावा घेऊ...


light pollution

रात्रभर प्रखर प्रकाशात राहिल्यामुळे मेंदूतील ‘पाइनी’ ग्रंथीमधून स्रवणारे ‘मेलॅटोनिन’ हे संप्रेरक तयार होण्यात अडथळा येतो. ‘मेलॅटोनिन’ हे संप्रेरक अ‍ॅण्टीऑक्सिडंट, कर्करोगविरोधक आणि चयापचयाचे नियमन करणारे अशा महत्त्वाच्या भूमिका पार पाडणारे संप्रेरक आहे. त्याचप्रमाणे ‘मेलॅटोनिन’च्या साहाय्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे शोधून काढले आहे की, रात्रीच्या वेळी 15 मिनिटे जरी प्रखर प्रकाशाला आपण सामोरे गेलो, तर आपल्या शरीरात ‘मेलॅटोनिन’निर्मिती बंद होते. याशिवाय ‘मेलॅटोनिन’च्या प्रमाणातील घट आणि स्तनाचा कर्करोग यांच्यातील संबंध स्पष्ट होत चालला आहे. रात्रभर प्रखर प्रकाश असतो, अशा प्रदेशात राहणार्‍या महिलांमध्ये 73 टक्क्यांहून अधिक जणींना स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आढळते. याउलट ज्या स्त्रिया रात्रीचा कमी प्रखर प्रकाश असणार्‍या प्रदेशात राहतात, त्यांच्यात कर्करोगाचे प्रमाण कमी असते. रस्ते, वसाहती, बाजारपेठा अशा ठिकाणी असणार्‍या प्रखर दिव्यांमुळे तिथले दृश्य स्वरूप जरी ठळक होत असले, तरी या उजेडामुळे अनेक शारीरिक व्याधींना आमंत्रण मिळते. यामुळे ज्यांना हे ज्ञात आहे, अशा ठिकाणी त्या नगरपालिका या दिव्यांना शेड्स लावून प्रकाशाचा प्रसार आता घटवते. तसेच जेव्हा आवश्यकता नसते, त्यावेळी दिवे बंद करणे हा पर्याय कसोशीने पाळला जातो. त्यामुळे प्रखर प्रकाश म्हणजे सुरक्षितता असे जर वाटत असेल, तर तो निव्वळ गैरसमज आहे त्या उलट योग्य प्रकाशयोजना असणे हे रात्रीच्या अंधारात सुरक्षितपणे वावरण्यासाठी आवश्यक आहे.

प्रकाशाच्या प्रदूषणाचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो. विशेषतः वन्य प्राण्यांना प्रकाशप्रदूषणाचा जास्त त्रास होतो. त्याचप्रमाणे जलचरांनादेखील प्रकाशापासून त्रास होतो. याच बाबींचा वापर करून अलीकडच्या काळात एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारी करण्याची एक हानिकारक परंपरा चालू झाली आहे. या एलईडी फिशिंगमुळे समुद्रातील इतर अनेक सजीव दिगंतात विलीन पावतात.

वन्यप्राण्यांच्या स्थलांतर प्रजनन, भक्ष्य पकडण्यासाठी शिकार करणे आणि अन्नग्रहण करणे अशा सर्वच क्रिया प्रकाशप्रदूषणामुळे बिघडल्या जातात. समुद्रातील मादी कासव सागर किनार्‍यांनी अंडी घालतात आणि ज्या वेळेला या अंड्याचे उबवणे संपते, त्यावेळी ती कासव बाळे अंड्यातून बाहेर येऊन आपोआपच प्रखर प्रकाशाच्या स्रोताकडे कूच करू लागतात. विजेच्या दिव्यांचा शोध लागायच्या कित्येक शेकडो वर्षे अगोदर तार्‍यांच्या उजेडामुळे समुद्राचे किनारे उजळले जात होते. या नैसर्गिक रोषणाईने कासवबाळांना पाण्यात नेमके कसे पुन्हा पोहून जायचे हे समजत होते. परंतु, आता नजीकच्या सर्व शहरांतून येणार्‍या कृत्रिम उजेडामुळे कासवबाळे गोंधळात पडतात आणि रस्ता चुकून भलतीकडेच जाऊ लागतात. समुद्राच्या पाण्यात शिरायच्या ऐवजी प्रकाशाच्या दिशेने त्यांचे मार्गक्रमण होते. त्यामुळे त्यातील कित्येक भक्षकांच्या दारात जातात किंवा निर्जलीकरणाने मरण पावतात. समुद्रात ती कधीच पोहोचू शकत नाही. हा अभ्यास अमेरिकेतील फ्लोरिडाच्या किनार्‍यावर हजारोवारी कासवांचे मृत्यू झाल्यानंतर करण्यात आला. त्यामानाने आपल्या महाराष्ट्राच्या आणि ओडिशाच्या किनार्‍याने कासवबाळांची काळजी घेणारी बरीच मंडळी आता योग्य कार्य करीत आहेत.

प्रकाशप्रदूषणामुळे इतरही प्राण्यांच्या वर्तणुकीत लक्षणीय फरक पडतो, त्यांच्या स्थलांतरात, निद्रा आणि सजगता यांच्या सवयी आणि अधिवास निर्माण करण्याच्या प्रक्रियेत ढवळाढवळ होते. कासवे आणि पक्षी चंद्रप्रकाशात स्थलांतर करतात. परंतु, प्रकाशप्रदूषणामुळे हे आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकत नाही. अनेक प्रजातीचे कीटक मोठ्या प्रमाणात प्रकाशाकडे झेप घेऊन अकस्मात मृत्यू पावतात. हे प्राणी आणि पक्ष्यांचे भक्ष्य असतात त्यांच्या मृत्यूमुळे अन्नसाखळी कोसळू शकते. पक्ष्यांमध्ये रात्रीच्या उजेडामुळे इतका गोंधळ उडतो की, पहाटे पहाटे त्यांचे मंजुळ सूर ऐकण्याची वेळ असते, त्याऐवजी मध्यरात्रीलाच ते गाऊ लागतात. रात्री साडेतीनला गाणारा कोकीळ आता मुंबईच्या लोकांना परिचित आहे.

प्रकाशप्रदूषणाचा पर्यावरणावर होणारा परिणाम अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे, याच प्रदूषणाचा अर्थकारणावरदेखील प्रतिकूल परिणाम होतो, हे लक्षात आले आहे. ‘इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन’ नावाच्या संस्थेने तसेच जाहीर केले आहे. निर्माण होत असलेला प्रकाशातील एकतृतीयांश प्रकाश कुठल्याही प्रकारे लाभदायक न ठरता निव्वळ प्रतिवर्षी 2.2 अब्ज डॉलर्स इतक्या रकमेचे नुकसान करतो, असे अनुमान शास्त्रज्ञ काढतात. चाळीस व्हॅटचा टेबलावरील लॅम्प पेटवायला लागणारी विद्युतशक्ती आणि रस्त्यावर तीव्र प्रखर उजेड फेकणारे दिवे यांना लागणारी विद्युतशक्ती यात खूप मोठी तफावत असते. त्या प्रमाणामध्ये वीजनिर्मिती करण्यासाठी औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्रात जाळला जाणारा कोळसा वायू प्रतिवर्षी जवळपास दीड कोटी टन कार्बन डाय-ऑक्साइड वातावरणात सोडतो. यामुळे हवाप्रदूषण तर होते, त्याशिवाय मोठ्या प्रमाणात हवामानबदल करण्यासाठी हे घटक बाबदार आहेत.

प्रकाशप्रदूषण रोखण्यासाठी जर प्रयत्न यशस्वी झाले तर त्यामुळे हवाप्रदूषणदेखील कमी होईल. हे प्रमाण रस्त्यावर 9.5 दशलक्ष गाड्या वाहतुकीपासून थांबवल्या तर जितक्या प्रमाणात हवाप्रदूषण कमी होईल, तितक्याच प्रमाणात प्रकाशप्रदूषण थांबवल्यानंतरही होऊ शकते. प्रकाशप्रदूषणावर उपाय करायचे म्हणजेच उगीचच अतिप्रमाणात केलेली रोषणाई कमी करणे. आता अनेक ठिकाणी ‘लाईट आऊट’ हा कार्यक्रम राबवून कीटक आणि पक्षी वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचप्रमाणे पक्ष्यांच्या स्थलांतराच्या मार्गामधील इमारतींवरील दिवे विझवण्याचा आग्रह धरला जात आहे. पाण्याखाली तयार केलेल्या कृत्रिम रोषणाईमुळे जलचरांवर विपरीत परिणाम होत आहे, हे लक्षात आले आहे. त्यामुळे त्यादृष्टीने पण लोकांचे जनजागरण सुरू झाले आहे. शेवटी, आपण हेच लक्षात ठेवायचे आहे की, आपल्या आरोग्यासोबतच पृथ्वीवरच्या आपल्या सहचरांचे हित पण आपण जपले पाहिजे ना!
- डॉ. नंदिनी देशमूख