"काँग्रेस आणि दहशतवाद्यांचा ये रिश्ता क्या कहलाता है?"

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

    08-May-2024
Total Views |
 
Vijay Wadettivar
 
बीड : मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांशी काँग्रेसचा संबंध आहे. त्यामुळे काँग्रेसमधील लोकांचा आणि दहशतवाद्यांचा 'ये रिश्ता क्या कहलाता है'? असा प्रश्न देश विचारत आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. बीडमध्ये मंगळवारी महायूतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
 
"मुंबईतील २६/११ च्या पाक पुरस्कृत दहशदवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतून लागली नव्हती," असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस नेत्यांचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "इंडी आघाडीचे लोक वोट जिहादचे आवाहन करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे लोकं २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत. पाकिस्तानमधून आलेल्या कसाबसह १० आतंकवाद्यांशी काँग्रेसचा काहीतरी संबंध आहे. त्यामुळे काँग्रेसमधील लोकांचा आणि दहशतवाद्यांचा 'ये रिश्ता क्या कहलाता है' असा प्रश्न आता देश त्यांना विचारत आहे."
 
"तिसऱ्या टप्प्यातील मतदानाबरोबरच इंडी आघाडीच्या अपेक्षाही संपलेल्या आहेत. मोदी विकसित भारताच्या मिशनवर आहेत. पण ज्यावेळी इंडी आघाडीचं सरकार येईल तेव्हा ते मिशन कॅन्सल सुरु करतील. मोदींनी हटवलेलं कलम ३७० ते पुन्हा सुरु करतील आणि सीएए, ट्रिपल तलाक हे सर्व कायदे ते रद्द करतील. एवढंच नाही तर काँग्रेस आणि इंडी आघाडी राम मंदिरालादेखील कॅन्सल करुन टाकतील," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना आरक्षणाचा अधिकार दिला होता. त्यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यासही नकार दिला होता. परंतू, काँग्रेस पक्ष दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचं आरक्षण हिसकावून घेत ते धर्माच्या नावावर देऊ पाहत आहे," असेही ते म्हणाले.