सॉल्टलेकवरील पोस्टर बॉयची निवृत्ती ...

    19-May-2024
Total Views |
sunil

भारतीय फुटबॉलचा पोस्टर बॉय असणारा सुनिल छेत्री यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केली. फुटबॉल या खेळात असून देखील, त्याने भारतीयांच्या मनावर अधिराज्य केले हे नाकारता येणार नाही. सुनिल छेत्री येत्या ६ जून रोजी आपला शेवटचा सामना खेळणार आहे. भारताच्या या स्टार खेळाडूविषयी या लेखातून जाणून घेऊया....
 
केवळ ६७ दिवसांनंतर पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होतील. त्यात आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व करणारे हॉकी, बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्स अशा फुटबॉल वगळता एक ना अनेक क्रीडाप्रकारांत क्रीडापटू सहभागी असतील. भारतीय फुटबॉलपटू परत ऑलिम्पिकमध्ये दिसायला किती दिवस लागतील, हे काही सांगता येत नाही. आजमितीस असलेल्या ऑलिम्पियनमध्ये असे अनेकजण असतील की, ज्यांचे हे शेवटचेच ऑलिम्पिक असेल तर काहींचा आपापल्या क्रीडाप्रकारांत मैदानावर उतरण्याचा शेवटचाच अवसर असेल. हे ऑलिम्पिक संपल्यावर अशा क्रीडापटूंच्या अनेक घोषणा होतील. त्यात भारतीयांचे लाडके क्रीडापटूही असतील. सध्या क्रीडाविश्वात क्रिकेटच्या आयपीएल स्पर्धा जोमात चालू आहेत. त्यात चेन्नई सुपर किंग्जचा महेंद्रसिंग धोनी खेळत आहे, आणि कदाचित त्याचा हा शेवटचा हंगाम असला तरी त्याचे संघचालक धोनीला अजून दोन वर्षे तरी सोडण्याच्या स्थितीत नाहीत. तसेच धोनी स्वतःच निवृत्तीच्या मानसिकतेत आढळत नाही. काही काळापूर्वीच धोनी गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर खेळायला उतरला असला, तरी पूर्वीचा तो जोम त्याच्यात दिसत नाही. तसेच तो आता कप्तानही नाही. असा हा एम.एस. धोनी कधी निवृत्त होईल, हे फक्त तो स्वतःच कधी घोषित करतो, याकडे सगळ्या क्रीडाविश्वाचे लक्ष लागलेले असेल.
 
आता क्रिकेटपटू विराट कोहलीच्या निवृत्तीचीही चर्चा चालू होती. अशा क्रीडानिवृत्तीच्या चर्चा सर्वत्र होत असतानाच, दुसरीकडे आपल्या कानावर फुटबॉलची वार्ता येते. तो अजूनही काही काळ बिनदिक्कत खेळला तरी चालेल, कारण तो अजूनही सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे, आणि त्याची जागा घेणारा अजूनही अन्य भारतीय फुटबॉलपटू आपल्याला आढळत नाही. असं असताना जो क्रीडापटू निवृत्तीची समयोचित घोषणा करतो, तो क्रीडाप्रेमींच्या मनात निरंतर राहताना आढळतो. विराट कोहली, नीरज चौप्रा आणि पीव्ही सिंधू ह्यांच्या तोडीसतोड असलेला, भारतीय फुटबॉलचा पोस्टर बॉय सुनील छेत्री, जो भारतीय फुटबॉल चाहत्यांचा लाडका तसेच नवीन पिढीचा प्रेरणास्रोत बनलेला आहे. त्याच सुनील छेत्रीने दिनांक १६ मे २०२४ रोजी प्रसारमाध्यमांतून स्वतःच्या निवृत्तीची घोषणा करत, त्याच्या चाहत्यांना खट्टू केले.
 
६ जून २०२४ रोजी फुटबॉल विश्वचषक पात्रता फेरीत कुवेतविरुद्धच्या सामन्यानंतर जेव्हा ३९ वर्षीय सुनील छेत्री फुटबॉलला अलविदा करेल, तेव्हा कोलकाताच्या सॉल्टलेक मैदानात आणि देशभर असलेल्या फुटबॉलप्रेमींचे डोळे पाणावलेलेच असणार आहेत. १६ मे २०२४ ला स्वतः सुनील छेत्रीसह समस्त भारतीय क्रीडाजगत भावुक झाले होते, तद्वतच किंबहुना त्याहूनही अधिक ती स्थिती ६ जून २०२४ रोजी असेल. आजदेखील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भारताला साधी पात्रता मिळवता आलेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय फुटबॉल आपला ठसा उमटवू शकलेला नाही. असे जरी असले तरी स्वतःच्या खेळाने, स्वतःचे नाव तर सुनील छेत्रीने कमावलेच, पण सुनील छेत्री हा भारताचा असल्याने आपसुकच त्याने भारताचेही नाव जागतिक पटलावर मोठे केले आहे. 
 
पाकिस्तानविरुद्ध सन २००५ मध्ये सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात पदार्पण करत, त्याच्या पहिल्याच सामन्यात गोल डागण्यात तो यशस्वी झाला होता. तेव्हापासून मार्च २०२४ पर्यंतच्या काळात, सुनील छेत्रीने १५० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा टप्पा पार केला आहे. गौहातीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, तो त्याचा १५० वा सामना होता. भारताकडून सर्वाधिक ९४ गोल त्याने केले आहेत. ३ ऑगस्ट १९८४ रोजी तत्कालीन आंध्र प्रदेशच्या सिकंदराबादमध्ये जन्मलेल्या, सुनील छेत्रीला सेनादलात फुटबॉल खेळणारे वडील आणि नेपाळच्या राष्ट्रीय संघाकडून फुटबॉल खेळणारी आई सुशीला अशा त्याच्या पालकांचा वरदहस्त लाभला आहे. वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत बदली होत असे. जिथे-जिथे ते कुटुंब जाई तिथे-तिथे सुनील फुटबॉल शिकला व मनसोक्त खेळला. जागोजागच्या शाळांमधून शालेय शिक्षण घेताघेता, तो शालेय स्पर्धांमधून आपले फुटबॉलचे कसब दाखवत होता. महाविद्यालयीन प्रवेश मिळवण्यासाठी स्पोर्ट्स कोटा असतो, तशा कोट्यातून आपल्यालाही उत्तम महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, ही त्याची मनोकामना पूर्ण होत गेली. १६ वर्षांच्या सुनील छेत्रीला दिल्लीतील एका महाविद्यालयात १२वी साठी प्रवेश मिळाला होता. त्यावेळेस सन २००१ मध्ये सुनील छेत्रीला कुआलालंपूर येथील आशियाई शालेय स्पर्धेत भारतीय संघात सहभागी होण्याचे निमंत्रणही मिळाले होते.
 
भारतातील सर्वात पुरातन आणि प्रसिद्ध असलेल्या कलकत्त्याच्या मोहन बागानच्या पदाधिकार्‍यांनी, एका स्पर्धेत सुनील छेत्रीला हेरले आणि आपल्या मोहन बागानच्या संघाकडून खेळण्याची गळ घातली. हा बहुमान सुनील छेत्रीने स्वीकारला. त्या क्षणापासून मोहन बागानच्या जोडीने जेसीटी, ईस्ट बंगाल आणि डेम्पो अशा संघांचे लक्ष सुनील छेत्रीकडे लागून राहिले. पुढची आठ-नऊ वर्षे सुनील छेत्रीने आपली फुटबॉलची जादू त्याच्याकडूनही दाखवली. भारतातील फुटबॉलचा सुनील छेत्री नावाचा झंझावात विदेशी क्लबच्याही नजरेत भरला. पोर्तुगाल, अमेरिकेतील व इंग्लंडमधील अनेक क्लबकडून सुनील छेत्री खेळला अन् पैसा आणि नाव कमावले. दरम्यान, इंग्लंडच्या वर्क परमिट’च्या प्रश्नात त्याने तेथे खेळणे थांबवले होते.
 
देशात खेळताना छेत्रीने २००८ साली एएफसी चायलेंज चषक सामन्यात चार गोल केले, त्यातील अंतिम सामन्यातल्या हॅट्ट्रिकचाही समावेश होता, भारत त्यात विजेता होता. सर्वत्र त्याच्या चित्रफिती झळकू लागल्या आणि तेव्हापासून वृत्तपत्रांत, मासिकात, क्रीडा पुरवण्यात फुटबॉलचा पोस्टर बॉय म्हणून सुनील छेत्री ओळखला जाऊ लागला. २००९ चा नेहरू कप, २०११ चा दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एसएएफएफ)स्पर्धा अशा लहान-मोठ्या स्पर्धा त्याने भारताला जिंकवून दिल्या. दिल्लीत झालेल्या त्या एसएएफएफ स्पर्धेत अंतिम सामन्यात तीन गोल करणार्‍या सुनील छेत्रीला, स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यातही आले होते.
 
भारतात २०१५ साली फुटबॉलची इंडियन सुपर लीग नावाने एक नवीन लीग चालू करण्यात आली. मुंबई सिटी एफसी या संघाने सुनील छेत्रीला इंडियन सुपर लीगमधील सगळ्यात महागातला फुटबॉलपटू म्हणून, आपल्या संघाकडून खेळण्यासाठी त्याला आर्थिक मोबदला देऊन विकत घेतले होते. आज इंडियन सुपर लीगमध्ये सगळ्यात जास्त गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे. बंगळुरू एफसीने त्याला नंतर आपल्यात बोलवून घेतले. २०१८ च्या आंतरखंडीय फुटबॉल चषक स्पर्धेत केनया विरुद्ध विजयी होताना, स्वतःचा १००वा गोल सुनील छेत्रीने केला होता. त्यावेळेस सुनील छेत्रीने लियोनेल मेसीच्या ६४ आंतरराष्ट्रीय गोलच्या विक्रमाची बरोबरी केली होती, आणि नंतर अर्जेंटिना त्या दिग्गज फुटबॉलपटूचा विक्रमही मोडला.
 
प्रत्येक क्रीडापटूला कधीतरी थांबावे लागतेच. खेळातून थांबवताना कायमच आपले सर्वस्व पणाला लावून खेळण्याचा त्याचा प्रयत्न असतो. तसा छेत्रीचा शेवटचा सामना कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर कुवेतविरुद्ध होणार आहे. हा विश्वचषक पात्रता सामना आहे. सुनीलच्या कारकिर्दीत कोलकाताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कारकिर्दीचा सुरुवातीचा काळ त्यांनी येथेच व्यतीत केला आहे. ३९ वर्षीय छेत्री १९ वर्षांपासून भारतीय फुटबॉलमध्ये आहे. भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक गोल करणारा तो फुटबॉलपटू आहे. 
 
गेल्या वर्षीची सुनील छेत्रीची एक मुलाखत वाचनात आली होती, त्यात जेव्हा सुनील छेत्रीच्या अनुपस्थितीत भारतीय फुटबॉलचे भविष्य कसे घडेल, हे तुम्ही पाहता? असा प्रश्न त्याला पत्रकाराने विचारला होता. त्यावरील सुनील छेत्रीचे उत्तर ऐकण्यासारखे होते. त्यात तो म्हणतो की, जेव्हा आयएम विजयन आणि बायचुंग भुतिया सारखी नावे खेळत होती, तेव्हा कोणी सुनील छेत्रीच्या अस्तित्वाचा अंदाज लावला होता का? मला माहीत आहे की देशातील अनेक प्रतिभावान सुनील छेत्रीपेक्षा चांगली कामगिरी करू शकतात. मी अशा स्थितीत आहे जिथे मला ते घडताना दिसत आहे आणि दुसरे म्हणजे, आपण सर्वांनी त्याबद्दल आशा बाळगणे खूप महत्वाचे आहे, अन्यथः भविष्य अंधकारमय होईल. आशियातील टॉप-१० संघांमध्ये स्थान मिळवण्याचे आमचे लक्ष्य असेल, तेव्हा आम्हाला सुनील छेत्रीपेक्षा सरस खेळाडूंची आवश्यकता असेल. मी आणि संघ जे सर्वोत्कृष्ट कामगिरी करू शकलो, त्यावर अवलंबून फिफा रँकिंगच्या आणि एएफसी रँकिंगच्या चांगल्या टप्प्यावर आम्ही पोहोचू शकलो आहोत. खंडातील सर्वोत्कृष्ट संघाशी सामना करण्यासाठी, आम्हाला राष्ट्रीय संघाची गरज आहे. आणि आम्ही त्यासाठी लक्ष्य ठेवले पाहिजे. (२०२३ सालच्या आकडेवारीनुसार) आम्ही एकदा १७३ च्या क्रमवारीत घसरलो आणि नंतर आम्ही आता जिथे आहोत, त्या टप्प्यावर लक्षणीय झेप घेण्यासाठी हळूहळू सावरलो.
 
आम्ही आशियातील १७ आणि १९ च्या क्रमवारीत राहिलो आहोत. आता आपल्याला पहिल्या १० मध्ये जावे लागेल आणि नंतर तेथे आपले स्थान निश्चित करावे लागेल. त्यासाठी आपल्याला यापेक्षा चांगली कामगिरी करू शकणारा संघ हवा आहे, ज्याने भविष्याचा पाया रचला आहे असे मला वाटते. भारतीय फुटबॉल संघाची उत्क्रांती अशीच घडली पाहिजे. एक संघ म्हणून आपण कमी पडू नये, याची खात्री करणे हे आमचे कार्य आहे. ते घडण्यासाठी माझ्यासारखे लोक, अनिरुद्ध थापा आणि संदेश झिंगन आमच्या क्षमतेनुसार कार्य करत राहतील. सुनील छेत्रीने किती आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत हे महत्त्वाचे नाही, राष्ट्रीय संघात सुधारणा करणे महत्त्वाचे आहे.
 
सुनील छेत्रीचा फोन १६ मे २०२४ पासून गेले काही दिवस सतत वाजत होता. दुसर्‍या दिवसापर्यंत ६८८ मिस्ड कॉल पाहिल्यावर, डिव्हाइस बंद करण्यावाचून त्याला काही गत्यंतरच नव्हते. सुनील छेत्रीचा फोन अजूनही वाजणे थांबलेले नाही. पण, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. १९ वर्षांच्या देशसेवेनंतर निवृत्तीची घोषणा करणारा भारतीय फुटबॉलचा एक जिवंत दिग्गज, अर्थातच, प्रत्येकाला त्याच्याशी बोलायचे आहे, त्यांचे विचार जाणून घ्यायचे आहेत. इतक्या भव्य कारकिर्दीबद्दल बोलण्यासाठी ५ मिनिटांचे निरोपाचे भाषण कधीही पुरेसे नव्हते. आणि कदाचित भारतीय कर्णधाराने शुक्रवारी, १७ मे रोजी केलेला तासभर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तरी बहुतेकांना तो अवधी पुरेसा वाटला नसावा.
 
इंडिया कलर्समध्ये त्याचा शेवटचा सामना ६ जून रोजी होईल, १६ मे २०२४ पासून अजून काही आठवडे बाकी आहेत. पण तो त्याच्यापासून दूर जाण्यासाठी आणि सॉल्टलेक क्रीडागारात कुवेतविरुद्धच्या महत्त्वपूर्ण विश्वचषक पात्रता सामन्यावर लक्ष केंद्रित करण्यास उत्सुक आहे. भारतीय विक्रमी गोल-स्कोअररने निवृत्ती, अंतिम हुर्राभोवतीच्या त्याच्या भावना, त्याचा संभाव्य उत्तराधिकारी, भारतातील शर्टमधील त्याचे सर्वोत्तम क्षण आणि बरेच काही संबोधित करण्यासाठी समाजमाध्यमाने अक्षरशः त्याच्या नाकीनऊ आणले होते.
 
स्वतःला सांगणे हा निर्णय निवृत्तीचा सर्वात कठीण भाग होता, तो म्हणतो, जेव्हा त्याने एक महिन्यापूर्वी हा निर्णय घेतला होता, परंतु त्याला कांजण्यांनी ग्रस्त झाल्यानंतर त्याची घोषणा करणे पुढे ढकलले होते. मी माझ्यातच भांडत होतो. मी गोष्टींचे विश्लेषण करत होतो. मी अधिक समग्रपणे विचार करण्याचा प्रयत्न करत होतो, मी सर्व गोष्टींचा विचार करत होतो. हे सोपे नव्हते आणि थोडा वेळ घेतला. आता, मी म्हणू शकतो की मी आता शांत आहे. मला वाटते की मी योग्य निर्णय घेतला आहे. पण त्याआधी, पुढील महिन्यात कोलकाता येथे त्याच्या आणि राष्ट्रीय संघाकडून अपेक्षा असतील, हे त्याला समजते. पण त्याच्या निर्णयाने तो आता शांत आहे, त्याचप्रमाणे छेत्री ६ जून रोजी त्याच्या वाटेवर येणारी भावनांची अंतिम लहर अनुभवण्यासाठी तयार आहे.
 
६ जूननंतर या कर्णधाराचे आयुष्य वेगळे असेल, पण फुटबॉल थांबणार नाही. जून ६ म्हणजे जेव्हा मी निवृत्त होईन. ७ जून, आम्ही कदाचित खूप वेळ रडण्यात घालवू. ८ जूनपासून, मी आराम करण्याचा प्रयत्न करेन आणि विश्रांती घेईन. मला माझ्या कुटुंबासोबत राहायचे आहे, आणि नंतर पहिल्या आठवड्यापासून जुलैमध्ये, आम्ही आमचा प्री-सीझन बंगळुरू एफसीसोबत सुरू करू. असे जीवनचक्र माझे चालूच राहणार आहे. ६ जूनच्या सुमारास लाट येईल आणि नंतर ती नाहीशी होईल. ठीक आहे, माझा वेळ होता. मला मजा आली. मी जो विचार केला होता त्यापेक्षा जास्त मला मिळाले. माझा वेळ उत्तम गेला. सर्व काही पुढे सरकत असतं, आयुष्यही तसेच पुढे सरकत असतं असे सॉल्टलेकवर तो पोस्टर बॉय आपल्याला सांगताना आढळेल. अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, तसेच ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पटकावणारा हा फुटबॉलपटू आपल्या भावी जीवनात अग्रेसर होत राहो, आणि असे अजून सुनील छेत्री भारतमातेच्या पोटी जन्मास येवोत. जी इच्छा सुनील छेत्रीसह आयएम विजयन आणि बायचुंग भुतिया यांची ऑलिम्पिक आणि फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत यश प्राप्त करण्याची अपुरी राहिली आहे, ती पूर्ण होवो. ही मागणी आपण सारे क्रीडाप्रेमी भगवंताकडे मागू.
-श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत)
९४२२०३१७०४