धोक्यांची पूर्वसूचना देणारे बुलेट ट्रेनचे जिओ मॉनिटरिंग

बुलेट ट्रेन प्रकल्पात वापरण्यात येतेय अद्यावत तंत्रज्ञान

    16-May-2024
Total Views |

nhsrcl


मुंबई,दि. १६ : प्रतिनिधी 
मुंबई अहमदाबाद अशा या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे मुंबईतील वांद्रे, पालघर आणि विरार या सर्वच साईटवर वेगाने काम सुरु आहे. या प्रकल्प स्थानांवर बांधकामदरम्यान अद्ययावत तंत्रज्ञान आणि विविध सुरक्षा उपाययोजनेचा अवलंब केला जात आहे. या प्रकल्प साईटच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व पाणीपुरवठा आणि इतर युटिलिटी पाईपलाईन आणि वास्तू यांच्या सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेण्यात येते आहे. यासाठी अतिशय संवेदनशील तपशीलही टिपू शकणाऱ्या जिओ टेक्निकल मॉनिटरिंग सिस्टीमचा वापर करण्यात येत असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे.
कोणत्याही बांधकामात खोदकाम करणे आणि भूमिगत बोगदा बांधणे आव्हानात्मक काम असते. हे काम अधिक आव्हानात्मक होते जेव्हा असे भूमिगत बोगदे मुंबईसारख्या दाटीवाटीच्या वस्ती असणाऱ्या, ऐतिहासिक वास्तू आणि नागरी वस्त्यांच्या खालून जाणारे असतात. सध्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कामही वेगात सुरु आहे. यामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून २४ तास ७ दिवस अविरतपणे जिओ टेक्निकल मॉनिटरिंग करण्यात येते आहे. उपकरणांद्वारे मिळणाऱ्या डेटाच्या आधारावर भूमिगत बोगदा तयार करताना कोणताही धोका निर्माण होत नाहीये ना याची खात्री केली जाते. स्टॅन्डपाइप पायझोमीटर, व्हायब्रेटिंग वायर पायझोमीटर, इंक्लिनोमीटर, व्हायब्रेशन मॉनिटर, ग्राउंड सेटलमेंट मार्कर, टिल्ट मीटर, स्ट्रेन गेझेस, प्रेशर सेल्स, आदी विविध प्रकारची जिओटेक्निकल उपकरणे बसविण्यात आली आहेत. हे उपकरण शाफ्ट, बोगदे आणि स्थापत्य सुरु असणाऱ्या ठिकाणावर बसविण्यात आले आहे.

ही उपकरण अभ्यास आणि निरीक्षणांच्या हेतूने इतर मॉड्युल्सला जोडण्यात आले आहेत. येणाऱ्या डेटाचे नियमितपणे आकलन आणि निरीक्षण केले जाते आहे. यामुळे संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना मिळणे शक्य होईल. या पूर्वसूचनेमुळे या धोक्यांची तीव्रता कमी करणे शक्य होणार आहे. इतकेच नाही तर प्रकल्प स्थळांवर पर्यावरण संबंधित नियमांचेही काटेकोरपणे पालन केले जाते आहे. बोगद्याच्या सर्व स्थानांवर धूळ आणि वायू प्रदूषण निरीक्षण यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. यामुळे हे प्रदूषण नियंत्रणात ठेवणे शक्य होते आहे.
महाराष्ट्रातील मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या २१ किमी लांबीच्या भूमिगत भागासाठी बांधकाम प्रगतीपथावर आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे अंदाजे १ किमी लांब आणि ३२ मीटर खोल म्हणजे अंदाजे १० मजली इमारत एवढ्या आकाराचे भूमिगत बुलेट ट्रेन स्थानकासाठी खोदकाम, बोगद्याच्या कामासाठी शाफ्ट आणि पोर्टलचे बांधकाम सुरु आहे. तीन मेगा टनेल बोरिंग मशीन्स १६ किमी बोगद्याच्या कामासाठी वापरल्या जातील, ज्यामध्ये ७ किमी लांबीच्या समुद्राखालील बोगद्याचा समावेश आहे आणि उर्वरित ५ किमी बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती वापरून तयार केला जाईल. बोगद्याची खोली २५ मीटर ते ५७ मीटर असेल. टनेल बोरिंग मशीन खाली उतरविण्यासाठी तीन शाफ्ट, एक ADIT पोर्टल बांधले जात आहे. अशा भूमिगत मेगास्ट्रक्चर्सच्या बांधकामासाठी बांधकाम साइटचे संरक्षण आणि निरीक्षण आवश्यक आहे. नागरी वस्त्यांना कोणतंही धोका निर्माण होणार नाही याची पूर्ण खबरदारी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉरीडोअरच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.