एल्गार परिषद-माओवाद्यांशी संबंधित खटल्यात 'गौतम नवलखा'ला जामीन मंजूर

    14-May-2024
Total Views |
 GAUTAM NAVLAKHA
 
नवी दिल्ली : एल्गार परिषद-माओवाद्यांशी संबंधित खटल्यात आज सर्वोच्च न्यायालयाने गौतम नवलखा यांना जामीन मंजूर केला आहे. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घातलेली बंदी वाढवण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की, नवलखा चार वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत आणि या प्रकरणात अद्याप आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत.
 
मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दि. १९ डिसेंबर रोजी नवलखा यांना जामीन मंजूर केला होता, परंतु एनआयएने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी वेळ मागितल्यानंतर तीन आठवड्यांसाठी त्याच्या आदेशाला स्थगिती दिली होती. ऑगस्ट २०१८ मध्ये अटक करण्यात आलेल्या नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नजरकैदेत ठेवण्याची परवानगी दिली होती.
 
गौतम नवलखा यांच्यावर दि. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप आहे. त्यांच्या चिथावणीखोर भाषणामुळेच दुसऱ्या दिवशी दि. १ जानेवारी २०१८ ला महाराष्ट्रातील कोरेगाव-भीमा युद्ध स्मारकाजवळ हिंसाचाराचा भडका उडाला होता. या प्रकरणी १६ लोकांना अटक करण्यात आली असून त्यापैकी पाच जण सध्या जामिनावर बाहेर आहेत.