मोदी सरकारच्या काळात मुंबई पुर्णपणे दहशतमुक्त

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची ग्वाही

    13-May-2024
Total Views |
 keshav upadhyay
 
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुर्णपणे दहशतमुक्त आहे. एक दिवस पाकव्याप्त काश्मीरही आम्ही भारताला जोडू, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज व्यक्त केला.
 
लोकसभा निवडणूकीत उत्तर मुंबईत उभे असलेल भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल आणि अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईत आलेल्या डॉ. एस. जयशंकर यांनी बीकेसी येथील एनएसईमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. एस. जयशंकर म्हणाले, सध्या मतदारांसमोर दोनच पर्याय आहेत. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेली कामे जनतेसमोर आहेत. या कालावधीत पायाभूत सुविधा किती प्रमाणात वाढल्या आणि किती प्रगती झाली, ते स्पष्ट आहे. मोफत आरोग्य, घर, मुद्रा कर्ज, आणि स्वनिधी यात मोठी वाढ होणार आहे. मोदींच्या गॅरंटीवर भाजप आशीर्वाद मागत आहे. म्हणून जनता मोदींचे हात मजबूत करतील.
 
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याची बाजू मांडायचे काम कोणी केले आणि कोणती विचारधारा दहशतवाद्यांविरोधात लढतेय, याचा नक्कीच विचार झाला पाहिजे. भाजपाच्या दहशतवादविरोधी धोरणामुळेच आज दहशतवादी कारवायांना आळा बसला आहे, असे डॉ. एस. जयशंकर म्हणाले.
 
भाजप सरकारने कलम ३७० हटवण्याचे काम केले. परिणामी काश्मीरमध्ये सुधारणा होऊ लागल्यात. आता पाकव्याप्त काश्मीरमध्येही काही घटना घडू लागल्या आहेत. एक दिवस तोही भारताशी जोडला जाईल, असा विश्वास डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केला. मुंबईतील उत्तर लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार आणि वाणिज्य आणि उद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर गती देणारे निर्णय घेतले आणि अनेक योजनांद्वारे व्यवसायवृद्धी घडवून आणल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
आजमितीस देशात दररोज २८ किमी लांब महामार्ग आणि १४ किमी लांब रेल्वे मार्गाचे काम होते. दहा वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झाली. भारताच्या प्रगती आणि तंत्रज्ञानाचे पुर्ण पॅकेज जनतेसमोर आहे. जनता त्याचा नक्कीच विचार करेल, असे डॉ. एस. जयशंकर यांनी नमूद केले. याचप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर पत्रकारांशी चर्चा केली.
 
चीनच्या ताब्यात भारताची भूमी हे तर नेहरूंचे पाप
चीनने भारताचा भूभाग बळकावला तो १९५८ ते १९६३ या काळात. त्यावेळी जवाहरलाल नेहरू पंतप्रधानपदी होते. मात्र भारताचा हा भूभाग मोदी सरकारच्या काळात चीनने बळकावल्याचा कांगावा करीत काँग्रेस नेहरूंच्या चुकांचे खापर मोदी सरकारवर फोडत आहे. ते टिका करत राहू देत. आम्ही राजनैतिक मार्गाने आमचे काम करत राहू, असे डॉ. एस. जयशंकर यावेळी म्हणाले.