गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरच्या कामाला विलंब

३० सप्टेंबर, प्रकल्प पूर्ण होण्याची पुन्हा नवीन मुदत

    11-May-2024
Total Views |


gokhale


मुंबई, दि.११ : 
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे सुटे भाग अद्याप मुंबईत आलेले नाहीत. त्यामुळे दुसरा बीम बसविण्याचे काम सुमारे तीन महिने लांबले आहे. या कामासाठी ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली असून, रेल्वे क्षेत्रातील काम पूर्ण करण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पुलाच्या कामाचे वेळापत्रक साडेपाच महिन्यांनी पुढे ढकलण्यात आले आहे.
हे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करून उर्वरित काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेने यापूर्वी केले होते. कामाच्या दिरंगाईबाबत पालिका प्रशासनाने कंत्राटदाराकडून स्पष्टीकरण मागितले होते. “त्यानुसार, ठेकेदाराने स्पष्टीकरण सादर केले आहे. जर स्पष्टीकरण स्वीकारले गेले, तर नागरी संस्था दंड आकारणार नाही,” बीएमसीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यानी सांगितले.
२६ फेब्रुवारीला गोखले पुलाची एक बाजू उघडल्यानंतर मुंबईकर दुसरी बाजू उघडण्याची मुंबईकरांना प्रतीक्षा आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर एकेरी रस्ता खुला करण्यास १५ महिन्यांचा कालावधी लागला. एप्रिलच्या सुरुवातीला, दुसऱ्या बाजूसाठी बीमचे काही सुटे भाग मुंबईत आणले जाऊ लागले. त्यामुळे ३१ मेपर्यंत पोहोच रस्ता तयार करून ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण पूल खुला करण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या बीमचे काही भाग आले असून त्यांना जोडण्याचे काम सुरू आहे. मात्र हे सर्व भाग न मिळाल्याने वेळापत्रक बिघडले आहे. आता नवीन वेळापत्रकानुसार दुसरा बीम 30 सप्टेंबर रोजी बसविण्यात येणार आहे. रेल्वे हद्दीतील कामे १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण पूल वाहतुकीसाठी खुला होण्यास अंदाजे साडेपाच महिन्यांचा विलंब लागणार आहे.
विस्तारित बीमचे सुटे भाग येण्यास उशीर झाल्यामुळे महापालिका प्रशासनाने ठेकेदाराला दंड ठोठावत खुलासा मागवला होता. ठेकेदाराने खुलासासोबतच नवीन वेळापत्रकही दिले आहे. देण्यात आलेली काही कारणे प्रशासनाला समाधानकारक नसून मागणी केलेल्या जादा दिवसांसाठी दंड आकारण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या मूल्यांकनाचे काम सुरू असून दंड आकारल्यानंतरच मुदत वाढवली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.