पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून फुंकणार प्रचाराचे रणशिंग

१० एप्रिलला रामटेकमध्ये पहिली जाहीर सभा

    02-Apr-2024
Total Views |
narendra modi maharashtra visit

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. दि. १० एप्रिल रोजी रामटेक येथे ते पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर १४ एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन व चंद्रपूर येथे जाहीर सभा प्रस्तावित आहेत, अशी माहिती भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मंगळवार, दि. २ एप्रिल रोजी दिली.

नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रसाद लाड, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. दरकेर म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ५ किंवा ६ एप्रिल रोजी विदर्भात सभा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि शीर्षस्थ नेत्यांच्या सभांचेही वेळापत्रक लवकच जाहीर होईल, असेही त्यांनी सांगितले.

निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीविषयी माहिती देताना ते म्हणाले, भाजपा हा पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत नियोजनबद्ध, कालबद्ध आणि समयसूचक काम करणारा पक्ष आहे. पक्षाची निवडणूक व्यवस्थापन समिती ही निवडणुकीत अत्यंत महत्वाची भुमिका निभावत असते. आज महाराष्ट्राच्या व्यवस्थापन समितीची बैठक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडली. महाराष्ट्रात निवडणुकीच्या दृष्टीने व्युहरचना काय आहे, कशा प्रकारची व्यवस्था, यंत्रणा उभी आहे. या यंत्रणेची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने होतेय याचा आढावा आणि मार्गदर्शक सूचना डॉ. दिनेश शर्मा यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून एकेकावर जबाबदारी देण्यात आली आहे.

ठाकरेंना दुसऱ्यांनी टाकलेलेच उचलावे लागणार

उन्मेश पाटील यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाबाबत विचारले असता दरेकर म्हणाले की, निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकजण इच्छुक असतात. काही जण उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ राहून काम करतात आणि एखाद्याला निवडणुकच लढवायची असेल तर अशा प्रकारची भूमिका अनेक लोक अनेक पक्षात घेताना दिसतात. तशी भूमिक उन्मेश पाटील यांची आहे का? हे लवकरच समजेल. ठाकरेंना दुसऱ्यांनी टाकलेलेच उचलावे लागणार आहे. स्वतःकडे उमेदवार नाहीत. जे चांगले उमेदवार होते ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. उबाठा सेनेच्या उमेदवारांवर नजर टाकली तर सर्व उमेदवार आयात करून निवडणुका लढवत आहेत. रिकाम्या जागा भरण्याचा उबाठा सेनेचा प्रयत्न असल्याची बोचरी टीकाही दरेकरांनी केली.