जगाचे परिवर्तन घडवणारे भारतीय तंत्रज्ञान

    31-Mar-2024
Total Views |
 UPI
 
जागतिक क्रांती घडवणार्‍या, डिजिटल सुविधांच्या विकासात भारताच्या क्षमतेत जगाचे परिवर्तन घडवून आणण्याची ताकद असल्याचे बिल गेट्स म्हणतात, तेव्हा भारतीय क्षमतांचे त्यांनी ते केलेले कौतुक असते. ‘युपीआय’च्या माध्यमातून कॅशलेस पेमेंट कसे करता येते, हे भारताने हे जगाला दाखवून दिले. आज कित्येक देशांनी त्याचा प्रभावी वापर सुरू केला आहे.
 
जागतिक व्यवस्थेत क्रांती घडवून आणणार्‍या, डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात भारताच्या क्षमतेत जगाचे परिवर्तन घडवून आणण्याची ताकद आहे,” असे ‘मायक्रोसॉफ्ट’ या अग्रणी संगणक कंपनीचे सहसंस्थापक तसेच अब्जाधीश बिल गेट्स यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या चर्चेनंतर गेट्स यांनी सामाजिक दरी भरून काढण्यासाठी, तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असल्याचेे म्हटले आहे. गेट्स या भेटीत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि ‘डीपीआय’मधील भारताच्या वापराचे कौतुक केले. गेट्स यांनी समाजमाध्यमावर म्हटले आहे की, माझ्या भारत भेटीदरम्यान मी पाहिले की ‘एआय’ आणि ‘डीपीआय’ हे शिक्षण, आरोग्य सेवा आणि शेती क्षेत्रात प्रवेश करत असून, हे तंत्रज्ञान जगासाठी परिवर्तनकारी ठरू शकते, असे गेट्स नमूद करतात.
 
‘युपीआय’ तसेच ‘आधार’सारख्या उपक्रमांमुळे भारतातील डिजिटल क्षेत्र आर्थिक विकासाला चालना देईल, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ‘नॅसकॉम’च्या नेतृत्वाखालील नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, ‘डीपीआय’ २०३० पर्यंत भारताला आठ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने नेऊ शकते. भारताने एक ट्रिलियन डॉलर डिजिटल अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले असून, ते साध्य करण्याच्या दिशेने ते मोठे पाऊल ठरेल, असेही हा अहवाल सांगतो. त्याचवेळी बिल गेट्स यांनी ‘एआय’ क्षेत्रात भारताने केलेली प्रगती अधोरेखित केली आहे. जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, भारताचा दृष्टिकोन पंतप्रधान मोदी आणि गेट्स यांच्या चर्चेत ठळकपणे मांडला गेला.
 
‘डीपीआय’चा म्हणजे काय? याचा सविस्तर आढावा म्हणूनच घेणे अत्यंत आवश्यक असेच आहे. भारताची ‘डीपीआय’ ही एक उल्लेखनीय परिसंस्था असून, देशाच्या डिजिटल परिदृश्यात तिने बदल केला आहे. भारतात ‘युआयडी’ म्हणजेच ‘आधार’ हा वैयक्तिक ओळख क्रमांक १३९ कोटींहून अधिक नागरिकांना देण्यात आला आहे. म्हणजेच भारतातील जवळपास संपूर्ण लोकसंख्येचा यात समावेश होतो. सामाजिक तसेच आर्थिक समावेशासाठी ‘आधार’ क्रांतिकारक ठरले आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्याचवेळी ‘युपीआय’ ही पेमेंट प्रणाली, सुरक्षित डिजिटल व्यवहारांची सुविधा प्रदान करते. संपूर्ण जगाला या पद्धतीने आकर्षित केले असून, २०२७ पर्यंत दररोज १०० कोटी व्यवहार या माध्यमातून होतील, अशी अपेक्षा आहे.
 
‘आधार’, ‘डिजिटल लॉकर’, ‘डिजियात्रा’ आणि ‘युपीआय’ यांचा समावेश असलेले इंडिया स्टॅक कागदपत्रे सोबत बाळगण्याची आवश्यकताच रद्द करणारे आहे. मोबाईलमध्ये डिजिटल कागदपत्रे साठवण्याची सुविधा देण्यात आली असून, दैनंदिन व्यवहारांमध्ये कागदपत्रे तसेच ओळखपत्रांची भासणारी गरज यात बाद करण्यात आली आहे. किमान कागदपत्रे हे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्याला अनुसरून ही सुविधा आहे. ‘डीपीआय’अंतर्गत देशात विकसित केलेल्या, तसेच वापरात असलेल्या विविध सेवा तसेच पायाभूत सुविधांचा समावेश यात होतो. भारतातील ‘डीपीआय’ची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली असून, सध्या ३८ प्रकल्प पूर्णपणे किंवा अंशतः भारतात विकसित केले गेले आहेत.
 
‘डीपीआय’च्या बाबतीत अन्य राष्ट्रांसाठी भारत एक आदर्श ठरत आहे. २०२२ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतात ७०० दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते होते. ज्यामुळे त्याला जागतिक स्तरावर दुसर्‍या क्रमांकाची ऑनलाईन बाजारपेठ म्हणून ओळख मिळाली आहे. यात चीन अव्वल स्थानावर आहे. देशातील वेगाने होणारे शहरीकरण तसेच स्मार्टफोनच्या परवडणार्‍या किमती आणि स्वस्त इंटरनेटची सुविधा यांमुळे वाढीला हातभार लागत आहे.
 
आधार कार्ड सामाजिक तसेच तसेच ‘युपीआय’ ही प्रणाली डिजिटल व्यवहारात क्रांती घडवून आणणारी ठरली. ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने भारताचा जागतिक दर्जाचा ‘डीपीआय’ मान्य करून, शाश्वत विकास उद्दिष्टांना समर्थन देण्याच्या भूमिकेवर जोर दिला आहे. ‘जी २०’ने देखील भारताच्या ‘डीपीआय’चे समर्थन केले आहे.
 
उद्योजकतेला प्रोत्साहन, वर्धित स्पर्धा, सेवा प्रदात्यांवरील कमी झालेले अवलंबित्व, जीवनाची गुणवत्तेत झालेली वाढ, व्यवसाय वाढीसाठी मिळालेल्या नवीन संधी यांमुळे भारतातील ‘डीपीआय’ नावाजले जात आहे. त्याचवेळी देशांतर्गत असलेले ‘डीपीआय’ हे ‘एआय’ तंत्रज्ञानाला चालना देणारे ठरले आहे. ‘एआय’चा विकास तसेच वापर यासाठी आवश्यक सुविधा भारतात उपलब्ध आहेत. दैनंदिन जीवनमान सुसह्य करण्याबरोबरच सर्वांना चांगली हवा, पाणी, सार्वजनिक आरोग्य तसेच शिक्षण, प्रशासन यांसाठी त्याचा प्रभावीपणे वापर कसा करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. थोडक्यात, भारत त्याच्या ‘डीपीआय’चा एक विश्वासार्ह एआय फ्रेमवर्क उभे करण्यास सक्षम आहे, यावर जगाचे एकमत झालेले दिसून येते. म्हणूनच या डिजिटल पायाभूत सुविधा नागरिक, व्यवसाय यांच्यासाठी तसेच अर्थव्यवस्थेला चालना देणार्‍या ठरत आहेत. भारतातील या सुविधा संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक म्हणून काम करत असल्याने, भारतातील तंत्रज्ञान परिवर्तन घडवून आणणारे आहे, असे म्हणता येते.