समग्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर!

    30-Mar-2024
Total Views |

veer savarkar 
 
 
आजपर्यंत मी खूप वेगवेगळ्या विषयांवर, गोष्टींवर, आयुष्यातल्या अनुभवांवर आधारित किंवा सत्य घटनांवर आधारित म्हणा किंवा चित्रपटावर आधारित अनेक ब्लॉग लिहिले. तसेच अनेक ऐतिहासीक विषयांवर सुद्धा लिहिले, देशाच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांवर लिहिले. परंतु तेव्हापासून ते आत्तापर्यंत फक्त एका क्रांतिकारकांवर लिहिले नाही किंवा लिहू शकलो नाही ते म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये तब्बल एक नाही तर दोन दोन काळ्या पाण्याची शिक्षा भोगून आलेले आणि त्या नंतरही देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या कार्याची मशाल धगधगती ठेवणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजेच तात्याराव सावरकर! ह्या व्यक्तीबद्दल मी काय लिहू?
 
माझ्याकडे शब्दच नाहीयेत! आपल्याला जर कोणी आपल्या आई वडिलांबद्दल, मित्रांबद्दल, मैत्रिणीबद्दल लिहायला सांगितलं तर आपण चार ते पाच परिच्छेद किंवा फुलस्केप अगदी सहज लिहू शकतो. पण ह्या नामांकित व्यक्ती बद्दल जर कोणाला एक परिच्छेद जरी लिहायला लावला तर परिच्छेद तर सोडाच एक वाक्य पण लिहिता येणार नाही. मुळात ह्या थोर व्यक्तीबाबत लिहिण्यासाठी मलाच दुसरा जन्म घ्यावा लागेल. कारण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ही व्यक्ती फक्त फुलकेप वर लिहिण्यापूर्तीच मर्यादित नसून त्या व्यक्तीचे विचार, त्या व्यक्तीची बुध्दी, आजच्या पिढीने खरच आचरणात आणणे ही काळाची गरज आहे. त्या वेळी भारत पारतंत्र्यात असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी विशी एकविशीच्या मुलांनी हसत खेळत मृत्यूला कवटाळले. सावरकरांच्या तिखट आणि ज्वलंत विचारांमुळे अगदी इंग्रज सरकार सुद्धा हादरले होते. आजकाल जो तो आपल्या देशाच्या महांपुरूषांचा वापर फक्त स्वतःच्या लालसेपोटी आणि स्वतःच्या वापरासाठी हवा तसा करतोय.
 
आज खूप वर्षांनी मी आणि माझी आई फक्त दोघच सिनेमा पाहण्यासाठी गेलो. आज रणदीप हुड्डा ह्यांचा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या जीवनकथेवर आधारित ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ हा चित्रपट पाहिला आणि मी संपूर्ण निशब्द झालो. चित्रपट पाहताना डोळ्यात फक्त अश्रू होते. आपल्या माणसाचं कसं आहे न की आपण लोक फक्त सिनेमागृहापुरताच तो सिनेमाचा जोश अंगात ठेवतो एकदा का सिनेमा गृहातून बाहेर आलो की कसला सिनेमा नी कसलं काय? त्या वेळी सावरकरांसोबत मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, पांडुरंग बापट, वांछीनाथन अय्यर ह्यांसारखे तरुण क्रांतिकारक होते. आजच्या पिढीतले खोटे क्रांतिकारक म्हणजे खोटे राजकारणी ह्या लोकांचा आदर्श, त्यांचे महत्त्व फक्त आणि फक्त सभा, संमेलनामध्ये लंबी चौडी भाषण देण्यासाठी करतो आणि ह्या मागे त्यांच्या मनात असतो तो काळ्या दलदलीने माखलेला भ्रष्टाचार!
काही महिन्यांपूर्वी तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्यावर सुद्धा अगदी विचित्र पद्धतीने चिखलफेक करण्यात आली होती. अरे तुमची पात्रता तरी आहे का त्यांच्या जवळ उभ राहायची? जो तो येतो आणि एखाद्यानं हळूच मागून येऊन डोक्यात टपली मारून जावं तसा जो तो उठसूठ आपल्या महान पुरुषांच्या नावाने असे घाणेरडे धिंडवडे काढतो!
 
अरे काय चाललय काय? सावरकरांनी वयाच्या २१ व्या वर्षी त्या वेळी लंडन मध्ये बॅरिस्टरची पदवी घेतली होती. आजच्या काळातली २१ व्या शतकातली तरुण पिढी काय करतेय? ती फक्त मुली फिरवतायत, नाहीतर आजूबाजूला निरनिराळी व्यसने पाचवीला पुजलेली आहेच त्यांचा उपभोग घेतायत! लंडन मध्ये असताना सावरकरांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सशस्त्रक्रांतीच्या वाटचाली करत लंडनहून भारतात पुस्तकांच्या मार्फत पिस्तुले, बंदुका पाठवल्या. आज त्याच बंदुकांचा आणि पिस्तुलाचा वापर बेकायदेशीर कोणाचीही हत्या करण्यासाठी अगदी सर्रास केला जातोय. सावरकरांनी समानता आणि हिंदुत्वच्या दिशेने जाण्यास कितीतरी तरुणांना प्रेरित केले. आजच्या पिढीला हिंदुत्व सोडा हिंदू नावाचा अर्थ सुद्धा माहिती नाहीये! आणि मोठे लावतात स्टेटस १५ ऑगस्टला ये दिल है हिंदुस्तानी! सर्व धर्म समभाव मग अगदी तो मुस्लिम, शीख, पारसी, कोणीही असो सावरकरांनी सगळ्या जातीतील लोकांना एकत्र करून समाज बनवला तो म्हणजे हिंदुत्व! हिंदुत्वची खरी व्याख्या जगासमोर आणणारे पहिले व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! आत्ताही ह्या व्यक्तीच्या बाबतीत लिहितांना माझे हात थरथरत आहेतं. अशा व्यक्तीबद्दल लिहिणे म्हणजे एखादे शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे.
 
रणदीप हुड्डा ह्यांच्या ह्या चित्रपटाबद्दल सांगायचे तर चित्रपट अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट आहे त्यात तिळमात्र शंका नाही. अंकिता लोखंडे ह्यांनी सावरकरांच्या पत्नीची भूमिका खूप उठावदार केली आहे. तसेच हा चित्रपट साकारताना त्यांनी एकही रुपयाचे मानधन घेतलेले नाही. शिवाय रणदीप हुड्डा ह्यांनीच स्वतः हा चित्रपट दिग्दर्शित सुद्धा केलाय आणि त्यात कामही केले आहे. बाबाराव सावरकर, गणेश सावरकर, येसुवहिनी, लोकमान्य टिळक, श्यामजी कृष्ण वर्मा, मॅडम कामा, मदनलाल धिंग्रा, खुदीराम बोस, चापेकर बंधू, भगत सिंग ह्या व्यक्तिरेखा सुद्धा कलाकारांनी खूप छान आणि ठळकपणे मांडल्या आहेत. शिवाय अंदमान जेलमधील सगळीच दृश्ये डोळ्यात पाणी आणणारी आणि अंगावर शहारे आणणारी आहेत. खरंच ह्या व्यक्तीने आपल्यासाठी इतक्या हाल अपेष्टा सहन केल्या आहेत हे नुसत डोळ्यासमोर जरी आणलं तरी छातीत धस्स होतंय. ज्यांना सावरकर माहित नाहीत, शिवाय फक्त तोंडाची वाफ उगाळत महापुरुषांना दोष देणाऱ्या शंड लोकांनी हा चित्रपट बघून स्वतःच्या विचारांची वृद्धिंगता वाढवावी आणि अशा महापुरुषांबाबतीत फालतू चहाड्या करण्याआधी हजार वेळा विचार करावा! त्या वेळी वृत्तपत्रांवर बंदी घालण्यात आली होती पण सावरकरांनी इंग्रज सरकारला झुगारून वृत्तपत्रांच्या मार्फत आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले.
 
आजच्या काळातील वृत्तपत्रांमध्ये जे ते आपल्याला हव्या तशा आणि तेवढ्याच बातम्या आणि लेख प्रकाशित करतात. शिवाय विरोधात्मक लेख घेण्यास सुद्धा बंदी अहो मग वर्तमान पत्र हवीतच कशाला? हा चित्रपट पाहून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी ही शिकलो की संघर्ष आणि प्रयत्न करणे जोपर्यंत माणूस सोडत नाही तोपर्यंत माणूस यशाच्या शिखरावर उत्तमोत्तम कार्य करू शकतो. दुसरी गोष्ट ही की बंदूक आणि पिस्तुला पेक्षा ह्या जगात सगळ्यात शक्तिशाली गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे लेखणी! आपल्या लेखणीला आपले शस्त्र बनवा! कारण...‘हिंद से प्यार करने वाले हम सब हिंदू है और देश धरम से ऊपर होता है। ‘मौल्यवान तो सोने की लंका भी थी मगर बात किसी की स्वतंत्रता की हो तो रावण राज हो या फिर ब्रिटिश राज दहन तो होकर रहेगा!
 
लेखक- पार्थ मिलिंद भगरे
मुलुंड पूर्व, मुंबई