मोठी बातमी! विजय शिवतारेंची बारामती लोकसभेतून माघार

    30-Mar-2024
Total Views |

Vijay Shivtare 
 
पुणे : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. विजय शिवतारेंनी बारामतीत दोन्ही पवारांविरुद्ध दंड थोपटत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निश्चय केला होता. मात्र, आता त्यांनी या निवडणूकीतून माघार घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
विजय शिवतारेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर शनिवारी शिवतारेंची त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गुंजवणीचं पाणी पुरंदरला देण्याचं आश्वासन दिल्यामुळे बारामती लोकसभेतून माघार घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
हे वाचलंत का? -  भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का! माजी मंत्र्याच्या सूनेचा पक्षात जाहीर प्रवेश
 
यावेळी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, "गेले १५ दिवस आम्ही ही निवडणूक लढण्यावर ठाम होतो. माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतरही मी माझा निर्णय बदलला नव्हता. मी निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं. परंतू, मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींचा मला एक फोन आला. तुमच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आणि महायूतीला अडचण होत आहे, असे मला सांगण्यात आले."
 
"तसेच सर्वच ठिकाणी जर अपक्ष उमेदवार उभे केले तर कदाचित महाविकास आघाडीचा फायदा होऊन १०, २० खासदार पडतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे, असे मला सांगण्यात आले. आपल्या एका स्थानिक लढ्यामुळे जर कुठे माझ्या हातून काही घडलं तर ते इतिहासात लिहिलं जाईल. त्यामुळे त्या एका फोननंतर मी लगेच मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर ते खुश झाले. त्यानंतर २८ तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली. मी माझं म्हणणं मांडलं. त्यांचं ऐकून घेतल्यानंतर मी माझ्या प्रमुख मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गुंजवणीचं पाणी पुरंदरला देण्याचं आश्वासन दिल्यामुळे मी बारामती लोकसभेतून माघार घेतली," असे ते म्हणाले.