अमरावतीमधून नवनीत राणा यांना भाजपकडून लोकसभेचे तिकीट!

    27-Mar-2024
Total Views |
BJP Candidates Amaravati Navneet Rana
 


महाराष्ट्र :     आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने राज्यातील तिसरी यादी जाहीर केली आहे. अमरावतीमधून नवनीत राणा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. नवनीत राणा या अमरावती येथून विद्यमान खासदार आहेत. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे.

दरम्यान, अमरावतीची जागा भाजपकडेच राहणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी याआधीच जाहीर केले होते. त्यामुळे अमरावतीमधून विद्यमान खासदार नवनीत राणा यांनाच उमेदवारी देण्यावरून चर्चांना उधाण आले होते. आता शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी राणा यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवित आपण निवडणूक लढविणार, असे जाहीर केले आहे.
दरम्यान, आनंदराव अडसूळ यांच्या विधानामुळे आता अमरावतीच्या जागेवरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अडसूळ यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील का, हे पाहावे लागेल. तसेच, प्रहार जनशक्ती पक्षाचे आ. बच्चू कडू यांनीदेखील नवनीत राणा यांना विरोध केला होता. बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीचा घटक पक्ष असून ते कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे असेल.