चंद्रपूर येथे 'महानिर्मिती'च्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेचे आयोजन

    05-Feb-2024
Total Views |
Mahavitaran State level Copetition in Chandrapur

चंद्रपूर : 
हवा, पाणी सहज उपलब्ध होते त्यामुळे त्याचे महत्व जाणवत नाही. विजेचे देखील तसेच आहे, वीज असेल तर त्याची जाणीव नसते मात्र वीज नसली तर त्याचे महत्व लगेच लक्षात येते. वीज ही विकासाची जननी असल्याने तिचे अनन्यसाधारण महत्व आहे आणि वीज उत्पादनाचे राष्ट्रीय कार्य तसेच महाराष्ट्राला प्रकाशमान ठेवण्याचे काम वीज अधिकारी-कर्मचारी करतात ही अभिमानाची बाब आहे. बाह्यगृह क्रीडास्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावून प्रत्येकाने जिंकण्याची भावना ठेवा आणि आनंदाने खेळा असे विपीन पालिवाल आयुक्त मनपा चंद्रपूर यांनी प्रतिपादन केले. ते महानिर्मितीच्या राज्यस्तरीय बाह्यगृह क्रीडास्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून खुले रंगमंच ऊर्जानगर येथे बोलत होते.

मंचावर अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता गिरीश कुमरवार, उप मुख्य अभियंते डॉ.भूषण शिंदे, अनिल पुनसे, श्याम राठोड, प्रफुल्ल कुटेमाटे, फनिंद्र नाखले, महाव्यवस्थापक बाहुबली डोडल,मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजूरकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते तर क्रीडास्पर्धा सचिव दिलीप वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते.

अध्यक्षस्थानाहून गिरीश कुमरवार म्हणाले की यंदा चंद्रपूर वीज केंद्राकडे यजमानपद असल्याने ११ संघाच्या ६५० खेळाडूंसाठी उत्तमोत्तम व्यवस्था आदरातिथ्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा तीन दिवसीय क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी खिलाडू वृत्ती आणि आपल्या सहकार्याची गरज आहे.

ऊर्जानिर्मिती क्षेत्रात अविरत कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी शारिरीकदृष्ट्या सुदृढ राहावेत तसेच त्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतून महानिर्मिती कंपनीच्या तीन दिवसीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र बाहयगृह क्रीडास्पर्धेचे विलोभनीय उ‌द्घाटन चंद्रपूर येथील ऊर्जानगर वसाहत खुले रंगमंच मैदान येथे विपीन पालिवाल आयुक्त मनपा चंद्रपूर यांच्या शुभहस्ते झाले.

याप्रसंगी सर्व खेळाडूंनी मान्यवरांना मानवंदना दिली व विपीन पालिवाल यांनी ध्वजारोहण करून क्रीडास्पर्धाचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. याप्रसंगी आकाशात विविध रंगांचे फुगे तथा शांततेचे प्रतिक कबुतरे सोडण्यात आले आणि क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. प्रारंभी, महानिर्मितीच्या नामांकित राष्ट्रीय खेळाडूंनी क्रीडाज्योत आणली त्यात संदीप येवले,संदीप भोयर,पवन कुमावत,प्रशांत झाडे, अभयकुमार मस्के,शिवदास घुले,संतोष शेरकी, अनिल वारजुरकर,शैलेश जुग्नाके, प्रमोद इरपाते इत्यादींचा सहभाग होता. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ज्येष्ठ खेळाडू उत्तम रोकडे संघव्यवस्थापक यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली. तीन दिवसीय क्रीडास्पर्धाविषयीची माहिती प्रास्ताविकातून पुरुषोत्तम वारजूरकर मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांनी दिली व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

उ‌द्घाटन समारंभानंतर लगेचच प्रत्यक्ष क्रीडास्पर्धाना प्रारंभ झाला. तीन दिवसीय क्रीडास्पर्धेत क्रिकेट, व्हॉलिवॉल, बास्केटबॉल, कबड्डी, अॅथलेटीक्स खेळांचा समावेश असून चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, भुसावळ, नाशिक, परळी, मुंबई, उरण, पोफळी वीज केंद्रांचे आणि नवीकरणीय ऊर्जाचे अश्या ११ संघाचे जवळपास ६५० खेळाडू सहभागी झाले आहेत. महानिर्मितीच्या राष्ट्रीय स्तरावरील चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमुळे हया स्पर्धा चुरशीच्या होणार आहेत हे निश्चित. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वा. खुले रंगमंच मैदान ऊर्जानगर येथे होणार आहे.

उ‌द्घाटन सोहळयाचे सूत्रसंचालन राणू कोपटे आणि तेजस्विता राऊत यांनी तर आभार प्रदर्शन दिलीप वंजारी कल्याण अधिकारी यांनी केले. याप्रसंगी अधीक्षक अभियंते सुहास ढोले, मिलिंद रामटेके, महेश राजूरकर, दत्तात्रय पिंपळे, अशोक उमरे, दिनेश चौधरी दिलीप सराग, महेश पराते, राजेश डाखोळे, रवींद्र चौधरी, झिनत पठाण, मनोज उमप, विष्णू ढगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संगीता बोधलकर, वरिष्ठ व्यवस्थापक(सुरक्षा)शिलरत्न गोंगले, उप महाव्यवस्थापक(मासं) हिना खय्याम, विभाग प्रमुख,विविध संघटना प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, चंद्रपूर वीज केंद्राचे अधिकारी, संघ व्यवस्थापक, कल्याण अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.