"महाराष्ट्रात महाविकास आघाडी पत्त्यासारखी उडणार!"

    05-Feb-2024
Total Views |

MVA


नागपूर :
जनता ही मोदीजींच्या सोबत आहे. त्यामुळे जसं जसं मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात आणि देशात येईल तसं तसं महाविकास आघाडी ही पत्त्यासारखी उडाल्या शिवाय राहणार नाही, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे बावचळले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "उद्धव ठाकरे एवढे बावचळले आहेत की, जसं मुघलांना संताजी धनाजी दिसायचे, जसं त्यांच्या नावाने मुघल घाबरले होते, तसंच उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीदेखील घाबरली आहे. त्यांना माहिती आहे की, महाराष्ट्रात त्यांना आता भोपळाही मिळणार नाही. महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार चांगलं काम करत आहे. भाजप नेते आणि मोदीजींनी जनतेची कामं करुन मतांचं कर्ज चुकवलं आहे. जनता ही मोदीजींच्या सोबत आहे. जसं जसं मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात आणि देशात येईल तसं तसं महाविकास आघाडी ही पत्त्यासारखी उडाल्या शिवाय राहणार नाही."
 
ते पुढे म्हणाले की, "एकनाथजी शिंदे सारखा एक मर्द मराठा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. देवेंद्रजींसारखा अष्टपैलू कर्तुत्वाचा धनी नेता आणि अजित पवार सारखा पूर्णपणे काम करणारा उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रात आहे. मोदीजींचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हे आपला पुर्ण वेळ महाराष्ट्राच्या सेवेकरिता देत आहे. उलट उद्धव ठाकरेंना माझा एक प्रश्न आहे की, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता, तेव्हा तुम्ही अडीच वर्षात दोनदाच मंत्रालयात आणि विधिमंडळात आले होते. त्यामुळे आता खरा राज्याला न्याय देणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे की, एकनाथ शिंदे आहे, हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनताही या महायुती सरकारच्या मागे उभी आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा हे आपल्या राज्याचे बॅट्समॅन आहेत. ते चांगलं काम करत आहे आणि त्यांच्या कामाने जनता समाधानी आहे," असे ते म्हणाले.
 
महाराष्ट्रात काँग्रेसला एकही जागा नाही!
 
"महायुती लवकरच आपल्या जागा जाहीर करेल. केंद्रीय नेतृत्व ज्यांना जागा देतील त्यांना ५१ टक्के मतं घेऊन निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे. अमरावती लोकसभेची जागा महायुती ५१ टक्के मतं घेऊन विजयी होईल. महाराष्ट्र आणि विदर्भात काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, ही त्यांची स्थिती होणार आहे," असेही ते म्हणाले आहेत.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.