"नाना पटोले एका जागी टिकू शकत नाहीत!"

    13-Feb-2024
Total Views |

Nana Patole


मुंबई :
नाना पटोले कुठल्याही एका पक्षात आणि एका पदावर टिकू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. मंगळवारी काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नाना पटोलेंनाही आम्ही प्रवेश दिलाच होता. पण ते कुठल्याही एका ठिकाणी आणि एका पदावर टिकूच शकत नाही, ही त्यांची सवय आहे. त्यांना अध्यक्ष बनवलं होतं तेही ते सोडून गेलेत. त्यामुळे ते सांगतात ते फार गांभीर्याने घेऊ नका."
 
भाजपला पक्ष फोडल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही अशी टीका काँग्रेसकडून करण्यात येत होती. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "माझा काँग्रेस नेत्यांवर असा आरोप आहे की, त्यांना त्यांचा पक्ष आणि पक्षातील नेत्यांना सांभाळता येत नाही. त्यांना त्यांच्या पक्षात मोट बांधता येत नाही. आज हे सगळे मोठे नेते इतक्या वर्षांची त्यांची पक्षातली पुण्याई सोडून आमच्यासोबत का येत आहेत? कारण आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे त्यावरून पक्ष कुठल्या दिशेने चालला हेच कुणाला समजत नाही."
 
"भाजपला विरोध करता करता देशाच्या विकासाला आपण कधी विरोध करायला लागलो हेच त्यांना कळत नाहीये. त्यामुळे जेष्ठ नेते ज्यावेळी दृष्टीक्षेप टाकतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की, आपण काय करत आहोत. आपलं नेतृत्व काय करत आहे. त्यामुळे देशाच्या मुख्य धारेत जाण्यासाठी लोकं आमच्यासोबत येतात. काँग्रेसला घर का सांभाळता येत नाही, ज्यांनी काँग्रेसला मोठं केलं ते नेते आपल्याला का सांभाळता येत नाहीत याबद्दल आधी आत्मचिंतन केलं पाहिजे," असेही फडणवीस म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "आम्ही कुठलंही टार्गेट घेऊन चालत नाही. पण जे नेते आमच्यासोबत येऊ शकतात आणि त्यांचा पक्षाला आणि राज्याला फायदा आहे अशा अनेक नेत्यांशी आमची चर्चा सुरु असते. जर त्यांना वाटलं की, आपण मुख्य धारेत आणि मोदीजींसोबत गेलं पाहिजे तर मग त्यांचा प्रवेश होतो. हे खरं आहे की, अजून काही नेते आमच्या सोबत येण्याच्या चर्चेत आहेत. पण जमिनीशी जुळलेले जे नेते आमच्यासोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करु," असेही ते म्हणाले आहेत.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.