मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Keshavsrushti Puraskar) भाईंदर उत्तन येथील केशवसृष्टीने १५ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या 'केशवसृष्टी पुरस्कारा'ची गरीमा आज सर्वदूर पसरली आहे. सामाजिक संस्था चालविणाऱ्या साधारण ४० वर्ष वयाच्या आसपास असणाऱ्या युवकाची निवड करून त्यास हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार मुंबई येथील मूकबधीर मुलांचे उच्च शिक्षण, विविध क्षेत्रातील कौशल्य शिक्षण आणि त्यांच्या उत्पन्नाच्या संधी यासाठी काम करणाऱ्या 'टीच' संस्थेस जाहीर झाला आहे. 'टीच' संस्थेचे संस्थापक अमन शर्मा यांना ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रविवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी विले पार्ले पूर्व येथील राजपुरिया बाग हॉल येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कार्यक्रम संपन्न होईल.
हे वाचलंत का? : सरसंघचालकांच्या हस्ते 'गौ विज्ञान परीक्षे'चे पोस्टर प्रकाशित
अमन शर्मा ह्यांनी टीच (ट्रेनिंग अँड एज्युकेशनल सेंटर फॉर हियरिंग इम्पैअर्ड) ह्या संस्थेची स्थापना २०१६ मध्ये केली. सध्या ही संस्था मुंबई, पुणे आणि दिल्ली येथे कार्यरत आहे. मूक बधिर विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवून त्यांना एक सन्माननीय जीवन जगण्यासाठी सक्षम बनविणे हेच अमन शर्मा आणि त्यांच्या सहकार्यांचे उद्दिष्ट आहे. आपल्या देशात मूक बधिर मुलांची संख्या जवळपास एक कोटी आहे. त्यांना योग्य शिक्षण मिळत नाही. ही मुले दहावी पर्यंत जेमतेम शिकतात. दहावी नंतर उच्च शिक्षणासाठी त्यांच्या करिता एकाही विद्यापीठात किंवा महाविद्यालयात सोय नाही. त्यांच्यासाठी वेगळी अशी शिक्षण पद्धती नाही.
ही परिस्थिती पाहून अमन शर्मा आणि त्यांच्या सहकार्यांनी अश्या मूक बधिर विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय स्थापन करून केवळ उच्च शिक्षणच नव्हे तर त्यांच्यासाठी उत्पन्नाच्या ही संधी उपलब्ध करून त्यांना त्यांच्या पायावर उभे केले. सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निर्माण केले. त्यांच्या या कामाची केशवसृष्टीने दखल घेत 'टीच' या संस्थेची १५ व्या केशवसृष्टी पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या निवडीसाठी महिलांची ११ जणींची टीम वर्षभर कार्यरत असते. या समितीमध्ये केशवसृष्टीच्या माजी अध्यक्षा प्रसिद्ध भुलतज्ज्ञ डॉ. अलका मांडके, माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, साठे कॉलेजच्या माजी प्राचार्या डॉ. कविता रेगे, यशस्वी उद्योजिका हेमाताई भाटवडेकर, पेठे ज्वेलर्सच्या उद्योजिका राधा पेठे, पोलिस अधिकारी सुनयना नटे, वकील सुनिता तिवारी, पत्रकार वैजयंती आपटे, सामाजिक कार्यकर्त्या रश्मी भातखळकर आणि अर्चना वाडे, त्याच बरोबर या वर्षीच्या पुरस्कार निवड समिती अध्यक्षा अमेया जाधव यांचा सहभाग आहे.