जगात सर्वत्र डॉलरचे वर्चस्व आहे. कोणत्याही व्यापारासाठी डॉलर वापरला जातो. त्यामुळे सहाजिकच जागतिक व्यापारवर डॉलर्सचे वर्चस्व आहे. मात्र, आज याच डॉलर्सला पर्याय शोधण्याचे काम सुरु आहे. त्यात, ब्रिक्स देशांचे चलन येण्याची शक्यता वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय रुपया आणि ब्रिक्स चलनाच्या प्रवासाचा घेतलेला आढावा...
दी सरकारची भक्कम मुत्सद्देगिरी आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत, रुपयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त चलन बनवून, त्याला चालना देण्याचे प्रयत्न हे योग्य दिशेने उचलले गेलेले पाऊल आहे. उदयोन्मुख आणि अविकसित देशांच्या चलनांचे, अमेरिकेकडून होणारे शोषण हे उर्वरित जगासाठी चिंतेचे आणि अनेक समस्यांचे प्रमुख कारण आहे. कारण, भारत हा मोठा आयातदार आहे. विशेषत: तेल आणि सोने याचा परिणाम म्हणून, आपल्या चलनाला अर्थात अर्थव्यवस्थेला फटका बसतो. पूर्वीच्या सरकारांनी तेलाची आयात कमी करण्यासाठी, आवश्यक ते प्रयत्न न केल्यामुळे त्याचा फटका आपल्याला आज सहन करावा लागला आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून, अवलंबित्व कमी करण्याचा मोदी सरकारचा आणि महाराष्ट्र महायुती सरकारचा प्रयत्न असूनही, आयात अवलंबित्व लगेच कमी होणार नाही. मोदी सरकार देश प्रथम या विचाराने कार्य करीत आहे, म्हणून आर्थिक महासत्तांच्या दबावाखाली न येता जी धोरण देशाला सामाजिक आर्थिक क्षेत्रात मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे, ती सर्व पाऊले उचलली जात आहेत. जी खूप अगोदर पूर्वीच्या सरकारांनी उचलायला हवी होती. मोदी सरकारने कोणाच्याही दबावाखाली न येता व आंतरराष्ट्रीय कट सुरू असताना, देशाला सर्व बाबतीत परम वैभवाला नेण्यासाठी जी पाऊले उचलली आहेत, त्याचे मोठ्या प्रमाणात सकारात्मक फायदे आपल्याला पुढच्या काही वर्षात बघायला मिळतील.
ब्रिक्स देशांची डॉलरविरुद्ध रणनीती
‘डी-डॉलरायझेशन’ म्हणजे यूएस डॉलर व्यतिरिक्त, इतर चलनांमध्ये व्यापार करणे. मूळतः ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी बनलेली, ब्रिक्स राष्ट्रे त्यांच्या संबंधित चलनांच्या बास्केटद्वारे, सर्वांच्या सहयोगाने नवीन राखीव चलन स्थापन करण्याचा विचार करत आहेत. संभाव्य ब्रिक्स चलन या राष्ट्रांना विद्यमान आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेशी स्पर्धा करताना, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा दावा करू शकेल. सध्याच्या प्रणालीवर अमेरिकन डॉलरचे वर्चस्व आहे. ब्रिक्स चलन कधी प्रसिद्ध होईल आणि वापरात येईल, हे सांगणे अजून कठीण आहे. परंतु, ब्रिक्स चलनाची क्षमता आणि गुंतवणूकदारांसाठी त्याचे संभाव्य परिणाम पाहण्याची ही चांगली वेळ आहे.
आंतरराष्ट्रीय चलन स्पर्धा कशी कार्य करते आणि त्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो?
चलन स्पर्धा हा राष्ट्रांमधील एक प्रकारचा संघर्ष आहे. ज्यामध्ये प्रत्येकजण आपल्या चलनाचे अवमूल्यन करून, आपली निर्यात वाढवण्याचा प्रयत्न करतो. चलन संघर्ष सामान्यतः त्यामध्ये सहभागी होणार्या सर्व राष्ट्रांसाठी विनाशकारी मानला जातो. भारताने चलन स्पर्धेचा अनुभव घेतलेला नसताना, सप्टेंबर 2015 सालामध्ये चीनने जाणीवपूर्वक युआनचे अवमूल्यन केले. तेव्हा आपण धोकादायकरीत्या त्यात ओढलो गेलो. परिणामी, निर्यातीच्या बाबतीत स्पर्धात्मक राहण्यासाठी, बहुतेक उदयोन्मुख बाजारपेठांनी त्यांच्या चलनांचे अवमूल्यन केले आहे. भारतासमोर रुपयाला पडू देण्याशिवाय पर्याय नव्हता.
डॉलर हे फार पूर्वीपासून जगातील प्राथमिक राखीव चलन आहे आणि ते आंतरराष्ट्रीय व्यापारात सर्वाधिक वापरले जाणारे चलन आहे. 2023-24 सालाप्रमाणे, जागतिक चलन साठ्यांवरील डेटानुसार, 44.15 टक्के डॉलर्समध्ये, 16.14 टक्के युरोमध्ये आणि सुमारे 8.40 टक्के येन आणि 6.40 पाऊंडमध्ये आहेत. ही चलन प्रामुख्याने जागतिक व्यवसायावर नियंत्रण ठेवतात. विनिमय दरातील जोखीम कमी करून, रुपयाचे आंतरराष्ट्रीयकरण सीमापार वाणिज्य आणि गुंतवणुकीच्या व्यवहारावरील खर्च कमी करू शकते. भारताच्या चलनात घसरण झाल्यामुळे, देशातील आयातदारांचे बिल तर वाढतेच, शिवाय आयातीत चलनवाढीच्या रूपात स्थानिक किमतीमध्येही भर पडतो. तेलाच्या वाढत्या किमती आणि कमकुवत होणारा रुपया, हे 2022 सालामध्ये देशाच्या महागाईच्या परिस्थितीसाठी एक खराब मिश्रण सिद्ध झाले. कारण, भारताला मोठ्या प्रमाणात तेल आयात करावे लागते. कारण, पायाभूत सुविधा, उद्योगधंदे, वाहने व इतर व्यवसायात होणारी प्रगती जी आवश्यक आहे, याला कारणीभूत आहे.
इतर चलनांच्या तुलनेत, डॉलरच्या ताकदीमुळे अनेक अर्थव्यवस्थांना महागाई कमी करणे, कठीण झाले आहे आणि परिस्थिती खूप बिकट आहे. परंतु, एवढा मोठा देश असूनही मोदी सरकारने महागाई बाकी देशांच्या तुलनेत नियंत्रित करण्यासाठी आवश्यक पाऊले उचलली आहेत. अशा प्रकारचे दबाव विशेषतः उदयोन्मुख देशांमध्ये तीव्र आहेत, जे आयातीवर अधिक अवलंबून आहेत. भारतामध्येदेखील मोठ्या प्रमाणात व्यापार असमतोल आहे. याचा अर्थ निर्यातीपेक्षा जास्त डॉलर्स, आयातीवर खर्च केले जातात. रुपयामध्ये इनव्हॉइसिंग केल्याने, डॉलरचा आऊटफ्लो कमी होईल, विशेषतः अशा वेळी जेव्हा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत आहे.
भारतीय रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण इतके महत्त्वाचे का आहे?
’आंतरराष्ट्रीयकरण’ हा शब्द रहिवासी आणि अनिवासी दोघांद्वारे मुक्तपणे व्यवहार करण्याच्या रुपयाच्या क्षमतेचा तसेच, जगभरातील व्यापारातील राखीव चलन म्हणून त्याची भूमिका सूचित करतो. यामुळे रुपयाला आयात आणि निर्यात व्यापार, इतर चालू खाते ऑपरेशन्स आणि शेवटी भांडवली खात्याच्या क्रियाकलापांसाठी, मोठ्या प्रमाणावर पुढे नेण्यासाठी कार्य सुरू आहे. आयातदार आणि निर्यातदारांना वाढीव लवचिकतेचा फायदा होईल. कारण, त्यांना यापुढे रूपांतरण शुल्क भरावे लागणार नाही, किंवा यूएस डॉलरच्या हस्तांतरण किमतीची चिंता करावी लागणार नाही. याशिवाय भारतीय आयातदार रुपयात खरेदी करून,स्वस्त तेल खरेदी करू शकतील. रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून, भारत रशियन तेलाचा मुख्य ग्राहक म्हणून उदयास आला आहे. मोदी सरकार रुपयात मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत आहे. त्यावर प्रक्रिया करून, ते युरोपमधील राष्ट्रांना विकत आहे. त्यामुळे, आपली परकीय गंगाजळीही वाढत आहे. भारतीय रुपयाच्या आंतरराष्ट्रीयीकरणात सोप्या आणि प्रभावी संक्रमणाची हमी देण्यासाठी, धोरणकर्ते, बाजारातील सहभागी आणि नियामकांनी काळजीपूर्वक तयारी केली पाहिजे आणि त्यांचे प्रयत्न समन्वयित केले पाहिजेत.
भारतीय रुपया किंवा इतर कोणत्याही चलनाचे मूल्य, त्याच्या मागणीवरून ठरवले जाते. जेव्हा चलनाची मागणी वाढते, तेव्हा त्याचे मूल्य वाढते; जेव्हा चलनाची मागणी कमी होते, तेव्हा त्याचे मूल्यही घसरते. याला ‘अवमूल्यन’ म्हणतात. अधिकाधिक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करत असल्याने, भारतीय चलनाची मागणी वाढते. हे या वस्तुस्थितीमुळे आहे की, जेव्हा आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार किंवा कॉर्पोरेशन भारतात गुंतवणूक करतात किंवा भारतातून उत्पादने खरेदी करतात, तेव्हा त्यांनी प्रथम त्यांचे चलन रूपयामध्ये रूपांतरित केले पाहिजे. कारण, ते फक्त भारतीय बाजारपेठेत रुपयामध्ये गुंतवणूक करू शकतात. परिणामी, भारतीय रुपयाची मागणी वाढते आणि अमेरिकन डॉलर आणि इतर चलनांच्या तुलनेत, त्याचे मूल्य वाढते. जेव्हा भारतीय व्यक्ती आणि व्यवसाय काही आयात करतात, जसे की कच्चे तेल, सोने इ., तेव्हा त्यांना डॉलरमध्ये व्यवहार करावे लागतील. कारण, अमेरिकन डॉलर हे चलन आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी वापरले जात असल्याने, डॉलर खरेदी करण्यासाठी भारतीय रुपये विकतात. परिणामी, डॉलरची मागणी वाढते आणि अमेरिकी चलनाच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होते.
यूएस फेडच्या यूएसमध्ये व्याजदर वाढवण्याच्या घोषणेमुळे आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान परदेशी गुंतवणूकदार आपली गुंतवणूक भारतीय बाजारातून काढून घेत होते. परदेशी गुंतवणूकदार जेव्हा त्यांची भारतातील गुंतवणूक मागे घेतात, तेव्हा त्यांना त्यांचे पैसे रुपयात मिळतात. तथापि, त्यांना त्यांचे होल्डिंग (रुपयाचे) डॉलरमध्ये रूपांतरित करावे लागते. परिणामी, ते रुपयाला डॉलरमध्ये बदलून व्यापार करतील. परिणामी डॉलरची मागणी वाढते, तर रुपयाची मागणी घटते. परिणामी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत, भारतीय चलनाचे मूल्य घसरते. द्विपक्षीय, त्रिपक्षीय आणि बहुपक्षीय भू-राजनीती आणि भू-अर्थशास्त्राच्या संदर्भात, ते भारताबद्दल बरेच काही सांगते. अमेरिकन डॉलरसारखे राखीव चलन होण्यापासून रुपया अजून खूप लांब असला, तरी ही खूप मोठी सुरूवात आहे. जसजसे अधिक राष्ट्रे त्यांची निर्यात आणि आयात रुपयात करू लागतील, भारतासोबतच्या द्विपक्षीय व्यापाराच्या शक्यता सुधारतील आणि रुपया मजबूत होईल.
पंकज जयस्वाल
7875212161