आमदार आशिष शेलार यांच्या प्रचाराला वांद्रेवासीयांचा प्रतिसाद
28-Oct-2024
Total Views |
मुंबई : वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या प्रचाराला स्थानिकांचा प्रतिसाद मिळत आहे. सोमवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी त्यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्र. ९८ मध्ये रथयात्रा काढली. त्यात सर्वसामान्य नागरिक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले.
वॉर्ड ९८ मधील सांताक्रुज सरस्वती रोड, अनुसया मार्ग, मीरा बाग, सारस्वत कॉलनी, १७ वा रस्ता, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रोड, सखाराम बुवा मार्ग, सरोजिनी रोड या परिसरात झालेल्या रथयात्रेला उत्तम प्रतिसाद लाभला. जागोजागी नागरिकांनी उत्साहात रथयात्रेचे स्वागत केले. यावेळी काढण्यात आलेल्या रथयात्रेत भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या तृप्तीबेन पटेल यांची आमदार आशिष शेलार यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
त्याशिवाय शेलार यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील खार येथील कार्यालयात विधानसभा अध्यक्ष, नगरसेवक, वॉर्ड अध्यक्ष वॉर्ड प्रभारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत उपस्थितांशी संवाद साधला.
तमिल सेल्वन यांच्या नामांकन रॅलीत सहभागी
सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांनी नामांकन अर्ज दाखल करताना काढलेल्या भव्य रॅलीत सहभागी होऊन आ. आशिष शेलार यांनी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. आमच्या सायन कोळीवाड्यात पुन्हा कमळच फुलणार हा विश्वास असल्याचे शेलार यावेळी म्हणाले.