देवेंद्र फडणवीसांनी दक्षिण-पश्चिम नागपूरमधून दाखल केला उमेदवारी अर्ज
25-Oct-2024
Total Views |
मुंबई : विधानसभेवर पुन्हा महायुतीचा झेंडा फडकावणार, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी दक्षिण-पश्चिम नागपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या रॅलीमध्ये नागपूरकर स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले.
नागपूरकरांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्या नेतृत्वात नागपूर येथे शिक्षण संस्था, मेट्रोसारख्या पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. सर्वार्थाने नागपूर शहराचे चित्र बदलू शकलो ते नागपूरकरांच्या आशीर्वादामुळेच. याच आशीर्वादामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना वैनगंगा-नळगंगासारख्या दूरदर्शी प्रकल्पांमार्फत विदर्भाचे चित्र बदलू शकलो. महिला, शेतकरी, दीन-दलित, आदिवासी सर्वांसाठी काम करण्याची संधी मिळाली. ओबीसी समाजासाठी ४८ शासन निर्णय काढले, ५४ वसतिगृहे बनवली. दलित-आदिवासी समाजांसाठी 'स्वयं'सारखी योजना आणून शिक्षणाचे दालन सुरू केले. मा. पंतप्रधान मोदीजी यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणार्या नव-महाराष्ट्राची निर्मिती करतो आहे.
यावेळी त्यांनी कृष्णा खोपडे आणि मोहन मते यांनादेखील विक्रमी मताने विधानसभेत पाठवण्याचे आवाहन नागपूरकरांना केले. तसेच विधानसभेवर पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकावणार असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय, सुलेखा कुंभारे, कृष्णा खोपडे, मोहन मते, कृपाल तुमाने, परिणय फुके, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृपाशंकर सिंह, अनिल सोले, आशिष जयस्वाल, विकास महात्मे, प्रवीण दटके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आचार्य पवन त्रिपाठी यांनी घेतली भेट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नामांकन प्रक्रियेनंतर नागपुरातल्या त्यांच्या निवासस्थानी मुंबई भाजपचे उपाध्यक्ष तथा श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि वाराणसीचे आमदार अवधेश सिंह उपस्थित होते. महाराष्ट्राच्या लोककल्याणासाठी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन करण्याचा महाराष्ट्रातील जनतेचा निर्धार आहे, अशी प्रतिक्राय आचार्य त्रिपाठी यांनी दिली.