नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयकाविषयीच्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत मंगळवारी राडा झाला. जेपीसीचे सदस्य आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी अश्लील शब्दांचा वापर करून अध्यक्षांच्या दिशेने काचेची बाटली फोडून फेकल्याचे गंभीर कृत्य केले आहे. संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा विधेयक सरकारतर्फे मांडली जाण्याची शक्यता आहे. सध्या हे विधेयक जेपीसीकडे सोपविण्यात आले आहे.
भाजपचे ज्येष्ठ खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली जेपीसी स्थापन करण्यात आली असून त्यात सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे. मात्र, जेपीसीची प्रत्येक बैठक ही वादळी ठरत आहे. जेपीसीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीतदेखील तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी आक्रमक पावित्रा घेऊन बैठकीत राडा घातला आहे.
जेपीसीच्या सद्स्या आणि बैठकीतील प्रत्यक्षदर्शी खासदारांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या राड्याची माहिती दिली. जेपीसी बैठकीत ओडिशातील प्रतिनिधी मंडळ आपली बाजू मांडण्यासाठी आले होते. त्यावेळी काही सदस्य त्यांच्याशी संवाद साधत असताना प्रामुख्याने विरोधी पक्षातील सदस्य सातत्याने अडथळे आणत होते. सदस्य ब्रिजलाल हे प्रतिनिधी मंडळास काही प्रश्न विचारत असताना अन्य सदस्य सय्यग नासीर हुसेन यांनी अडथळा आणला.
त्याचवेळी तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी हे त्यात पडले आणि सदस्य अभिजीत गंगोपाध्याय यांच्यावर त्यांनी अश्लील टिप्पणी केली. त्यानंतर गंगोपाध्याय यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यानंतर बॅनर्जी यांनी काचेची बाटली आपल्या समोरील टेबलवर जाणीवपूर्वक फोडली आणि फोडलेली बाटली अध्यक्षांच्या दिशेने भिरकावली. यावेळी बॅनर्जी यांना अल्प दुखापतदेखील झाली. मात्र, काचेचे तुकडे वेलमध्ये पडल्याने दुर्घटना टळल्याचे प्रत्यक्षदर्शी खासदारांनी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
बॅनर्जी यांचे स्वत:च्या भावनांवर नियंत्रण नाही
खासदार कल्याण बॅनर्जी यांचे आपल्या भावनांवर नियंत्रण नसल्याची प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी खासदारांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे बॅनर्जी यांनी माफी मागतानाही ती खोट्याच्या आधारे मागितली. अध्यक्षांच्या दिशेने जाणीवपूर्वक बाटली भिरकावण्याचा आपला हेतू नसल्याचा दावा त्यांनी केली. बॅनर्जी यांच्याविरोधात नियम ३७४ व अन्य नियमांप्रमाणे ठराव मंजुर करून त्यांना एक दिवसासाठी बैठकीतून निलंबित करण्यात आले.