‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी हिंदुत्वविरोधी जाहीर मतप्रदर्शनाचा धडाकाच लावलेला दिसतो. उदयनिधी स्टॅलिन बरळल्यानंतर आता कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वर यांनीही हिंदू धर्माच्या मुळावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत अकलेचे तारे तोडले. देशात ‘जी २०’ शिखर परिषद भरत असताना, विरोधकांनी हिंदुत्वविरोधी वक्तव्ये करून आपली देशद्रोही मानसिकताच दाखवून दिली आहे.
जपला रोखण्यासाठी तसेच आपापले सुभे, घराणेशाही वाचवण्यासाठी ‘इंडिया’ या नावाने एक झालेले विरोधकांचे कडबोळे आता हिंदू धर्माविरोधात उघडपणे भूमिका घेताना दिसून येत आहे. द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘सनातन’ धर्माविरोधात केलेल्या वक्तव्यावरून देशभरात तीव्र पडसाद उमटत असतानाच, आता कर्नाटकचे काँग्रेसी गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी हिंदू धर्माच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जगाच्या इतिहासात अनेक धर्म असून, हिंदू धर्माची स्थापना केव्हा आणि कोठे झाली, हिंदू धर्माचा जनक कोण,” हे प्रश्न आजही कायम असल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले.
हिंदू धर्माविरोधात प्रश्न उपस्थित करतानाच परमेश्वर यांनी ख्रिश्चन, इस्लाम या धर्मांचे सार हे मानवजातीसाठी सद्भावना असल्याचा दावाही केला. खरं तर नावातच ‘परमेश्वर’ असलेले हे मंत्रिमहोदय ईश्वराचे अस्तित्वच सरळसरळ नाकारतात, हेच मुळी हास्यास्पद! काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य म्हणून ओळखले जाणारे परमेश्वर कर्नाटकमध्ये गृहखाते सांभाळत आहेत, हे विशेष. भाजपचे कट्टर विरोधक अशीच त्यांची ओळख. भाजपने अर्थातच त्यांच्या या निंदनीय वक्तव्याचा निषेध केला आहे. काँग्रेसची मानसिकता अधोरेखित करणारे हे विधान असल्याचे भाजपने म्हटले आहे. अल्पसंख्यांकांचा अनुनय करण्याचे काँग्रेसचे धोरणच आहे, अशा शब्दांत त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. डाव्या विचारांच्या प्रभावाखालील परमेश्वर भारताची संस्कृती आणि परंपरा नष्ट करू इच्छित आहेत, ही धोकादायक बाब असल्याचा आरोप भाजपने केला. हिंदू धर्माविरोधात बोलण्याचे धारिष्ट्य करणारे परमेश्वर अन्य धर्मियांबद्दल असेच असबद्ध बोलण्याचे धाडस दाखवू शकतात का?
कर्नाटकमधील काँग्रेसी नेत्यांनी हिंदुत्वाविरोधात भूमिका घेण्याची अर्थातच ही पहिलीच वेळ नाही. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही हिंदू धर्माचा अवमान केला होता. हिंदुत्व हत्या, हिंसा आणि भेदभावाचे समर्थन करतो, म्हणूनच आपण हिंदूविरोधी नाही, तर हिंदुत्वविरोधी असल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केला होता. अन्य एक नेते सतीश जारकीहोळी यांनीही हिंदुत्वाविरोधी अशीच गरळ ओकली होती. अर्थातच भाजपने जेव्हा त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली, तेव्हा जारकीहोळी यांनी माफीही मागितली होती. कर्नाटकमधील काँग्रेसी सरकारने भाजप सरकारने मंजूर केलेला धर्मांतरविरोधी कायदाही रद्द करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. हा कायदा देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधातील असल्याचे काँग्रेसचे म्हणणे. तसेच, धर्मांध टिपू सुलतानचे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न कर्नाटक काँग्रेस करीत आहेच.
काँग्रेसची हिंदुत्वविरोधी भूमिका त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनच अशी खालपर्यंत झिरपलेली दिसते, असे निश्चितच म्हणता येईल. २००६ मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की, “हिंदू धर्माने भारताचे विभाजन केले,” तर हिंदू धर्म हा कर्करोग असल्याची टीका मणिशंकर अय्यर यांनी केली होती, ज्याबद्दल त्यांनाही नंतर जाहीर माफी मागावी लागली होती. निवडणुका जवळ आल्या की, मंदिरात जाऊन शर्टावर जानवे घालणारे राहुल गांधी यांचाही हिंदू धर्मावर विश्वास नाही. हिंदू ही जीवनपद्धती आहे, धर्म नाही, असे अजब तर्कट त्यांनी २०१९ मध्ये मांडले होते. काँग्रेसने हिंदूविरोधात केलेली ही काही मोजकीच उदाहरणे. त्या-त्या वेळी या नेत्यांविरोधात तीव्र भावना व्यक्त झाल्या होत्या. आता अचानक देशातील सर्वच विरोधकांना हिंदूविरोधी मते मांडावीत, असे का वाटू लागले असावे? ‘इंडिया’ आघाडीने आपल्या प्रचाराची दिशा तर बदललेली नाही ना?
द्रमुकच्या उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची तयारी सुरू आहे, अशावेळीच कर्नाटकातून पुन्हा एकदा हिंदुत्वविरोधी मत का व्यक्त होते? कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतांचे झालेले ध्रुवीकरण काँग्रेसला तेथे सत्तेवर आणणारे ठरले. ६५ जागांवर भाजपला एकगठ्ठा मुस्लीम मते विरोधात गेल्याने पराभव पत्करावा लागला. ध्रुवीकरणाचा ‘कर्नाटक पॅटर्न’ संपूर्ण देशभरात राबवायचा ‘इंडिया’ आघाडीचा विचार आहे का? म्हणूनच आघाडीतील एकेक पक्ष हिंदुत्वाविरोधात बोलायला लागले आहेत का, असा प्रश्न म्हणूनच उपस्थित होतो. महाराष्ट्रातील शरद पवार, उद्धव ठाकरे हेही मुस्लिमांचे लांगूलचालन करणारे म्हणूनच राज्यात प्रसिद्ध आहेत. म्हणूनच येत्या काही दिवसांत या दोन्ही नेत्यांनी अशाच आशयाची काही विधाने केली, तर त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही.
अर्थात, देशातील बहुसंख्य हिंदूंना अंगावर घेणे, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना परवडणारे आहे का, याचा त्यांनी विचार करावा. विधानसभा निवडणुकीत झालेले ध्रुवीकरण वेगळे आणि लोकसभेत जर ते झाले, तर काँग्रेसला आहेत त्या जागा तरी टिकवता येतील का? हा आमचा प्रश्न आहे. जगभरातील सर्वांत जुना धर्म म्हणून हिंदू धर्म विश्वविख्यात आहे. वेगवेगळ्या देवांची उपासना करणारे अनेक संप्रदाय हिंदू धर्मात आहेत. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत आणि पुराणे ही हिंदू धर्माने जगाला दिलेली अमूल्य अशी भेट आहे. हिंदू धर्म म्हणूनच समृद्ध असा असल्याचे मानले जाते. कर्म सिद्धांताला मानणारा, पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारा, मोक्षाचे ध्येय ठेवणारा, आध्यात्मिक, नैतिक, सामाजिक जबाबदार्यांची शिकवण देणारा, कर्मयोगातून मुक्तीचा मार्ग दाखवणारा, भक्ती योगातून परमेश्वराप्रती प्रेम आणि समर्पण यांची भावना रुजवणारा, ज्ञान योगातून अंतिम सत्याचा साक्षात्कार होईल, असे हिंदू धर्म मानतो, त्याप्रमाणे आचरण करायला सांगतो.
सहिष्णू हिंदू म्हणूनच सर्वधर्मीयांचा आदर करतो, त्यांच्या धार्मिक रुढीपरंपरांचा अनादर करत नाही. मात्र, काँग्रेसी प्रवृत्ती हिंदुत्वाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असतील, तर हिंदू ते सहन करतील का, हा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सनातन विरोधकांना योग्य ते उत्तर द्यावे, असे म्हटले आहे. सनातन धर्म हा शाश्वत आहे, म्हणूनच त्याविरोधात बोलणार्यांना सनदशीर मार्गाने उत्तर द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. ‘जी २०’ शिखर परिषदेच्या निमित्ताने जगभरातील राष्ट्रप्रमुख देशात उपस्थित होत असताना, हिंदू धर्माविरोधात व्यक्त होणारे मत विरोधकांची देशद्रोही मानसिकताच प्रकट करते, हे कोणीही नाकारू शकणार नाही.