प्लास्टिक अतिरेकामुळे महासागरातील प्लास्टिकचे दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रमाण अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. याच ‘दि ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच’ समुद्री कचर्याबद्दल सांगणारा हा लेख...
प्रतिवर्षी विविध कारणांसाठी 40 टन कोटी प्लास्टिकचा वापर केला जातो आणि यातील 1.4 कोटी टन प्लास्टिक दरवर्षी महासागरात फेकले जाते. सागराच्या पृष्ठभागापासून ते तळामधल्या थरात जवळपास 80 टक्के प्लास्टिक अडकून राहिलेले असते. प्लास्टिक प्रदूषणाचे वर्गीकरण किनार्यावरचे प्लास्टिक, समुद्र पृष्ठभागावरील प्लास्टिक, सागरी प्राण्यांच्या शरीरातील प्लास्टिक, समुद्र तळामध्ये रुतलेले प्लास्टिक, पाण्याच्या स्तंभात रंगणारे प्लास्टिक अशा विविध प्रकारे केले जाते. जमिनीवर टाकलेले प्रत्येक टाकाऊ पदार्थ कधी ना कधीतरी वाहत जाऊन समुद्राला मिळतात, त्यामुळे कित्येक टन कचरा प्रतिवर्षी सागरार्पण होतो आणि या कचर्यात सर्वात जास्त आपल्याला नको असलेले प्लास्टिक आढळते. 2014 मध्ये प्रथमच समुद्रविज्ञान अभ्यासानंतर पृष्ठभागावरील प्लास्टिक कचर्याबद्दल अहवाल प्रसिद्ध झाले होते. त्यात नमूद केल्याप्रमाणे पृष्ठभागावरती 5.25 ट्रिलियन प्लास्टिकचे कण तरंगत होते. त्यांचे वजन साधारणपणे 2 लाख,44 हजार मेट्रिक टन इतके भरले. त्यानंतर केलेल्या 2019च्या अभ्यासाप्रमाणे 44 टक्क्यांनी वाढ झालेला प्लास्टिक कचरा, नद्या आणि समुद्रात तसेच किनारपट्टीवर वाहून आला असे म्हटले आहे. यात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या तसेच खाद्यपदार्थांची आच्छादने आढळली. तसे पाहिले असताना समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण हे सुमारे 1960च्या दशकाच्या शेवटी आणि 70च्या दशकाच्या सुरुवातीला सर्वेक्षण करीत असलेल्या वैज्ञानिकांना आढळले. तरंगणारे प्लास्टिक पाच उपोष्णकटिबंधीय महासागरातील प्रचंड भोवर्यात (सबट्रॉपिकल गायर्स) साचत गेले. हे भोवरे जगभरातले 40 टक्के महासागर व्यापतात. पृथ्वीच्या मध्यावर असणार्या अक्षांशावर असणारे हे भोवरे म्हणजे उत्तर आणि दक्षिण प्रशांत( पॅसिफिक) उपोष्णकटिबंधीय भोवरे, उत्तर आणि दक्षिण अटलांटिक आणि हिंद महासागरामधील उपोष्णकटिबंधीय भोवरे. यापैकी प्रशांत महासागरातल्या भोवर्यात प्लास्टिक कचर्याचे प्रमाण इतके जास्त आहे की, येथील पूर्व प्रशांत महासागराच्या एका भागास ‘गार्बेज पॅच’ असे नाव पडले आहे.
2018 पर्यंत 144 जलचर प्रजातींच्या अवयवात मायक्रोप्लास्टिक आढळले होते. यातील काही सजीव तर अतिशय खोल, अशा समुद्रातील घळींमध्ये राहणारे होते. 2020 पर्यंत 1.4 कोटी मेट्रिक टन मायक्रोप्लास्टिक समुद्राच्या तळावर साचून राहिलेले होते. समुद्रात असलेल्या पाण्याच्या प्रवाहांमुळे समुद्रातील ठरावीक ठिकाणी या मायक्रोप्लास्टिकची अतिसंवेदनशील क्षेत्रे झाली आहेत. ‘टायरेहेनीयान सी’ (भूमध्य आणि सिसिली बेटे यामधील समुद्राचा पश्चिम इटली येथला विभाग) या ठिकाणी तर प्रत्येक चौरस मीटरमध्ये 0.2 कोटी टन मायक्रोप्लास्टिक तुकडे आढळून आले आहेत. आणखीन एक परिणाम म्हणजे इतर प्रदूषके अनेक पटीने प्लास्टिकच्या कचर्यात अधिक प्रमाणात संचयित होत जातात. ज्या प्रजाती प्लास्टिक चुकून खातात. त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात ‘पॉलिक्लोरिनेटेड बाय फिनाईल’ सापडले.
सौर किरणांमुळे आणि विशेषतः त्यातील अतिनील किरणोत्सारामुळे तसेच वेगाने वाहणारा वारा, प्रवाह आणि इतर नैसर्गिक घटकांमुळे प्लास्टिकचे बारीक बारीक कणांत रुपांतर होते आणि हेच असते-मायक्रोप्लास्टिक! मायक्रोप्लास्टिक कणांच्या आकार पाच मिलीपेक्षा कमी असतो, तर नॅनोप्लास्टिक हे 100 म्हणजेच नॅनोमीटरपेक्षाही (मीटरचा एक अब्जांश भाग) छोट्या आकाराचे असतात. इतके सूक्ष्म असल्यामुळे समुद्री प्राण्यांच्या शरीरात हे मायक्रोप्लास्टिक व नॅनोप्लास्टिक सहज शिरकाव करते. मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण नळाच्या पाण्यात, मिठात आणि जगभरातल्या सगळ्या समुद्रातून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यात आढळून येते. प्लास्टिक बनवताना वापरण्यात येणारी विविध रसायने कर्करोगकारक असल्याचे ज्ञात आहे. त्यामुळे असे प्रदूषित अन्न व पाणी सेवन केल्यामुळे मानवी शरीरातील अंतर्स्रावी संस्थेवर (एण्डोक्राईन सिस्टीम) परिणाम होतो. त्याचप्रमाणे वाढीवर, प्रजननावर, चेतासंस्थांवर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊन विविध रोग मानवात आणि वन्य प्राण्यात निर्माण होतात, असे लक्षात आले आहे. अलीकडच्या काळात मायक्रोप्लास्टिकचे अस्तित्व मानवी वारेमध्ये (प्लासेंटा) आढळून आलेले आहे.
- डॉ. नंदिनी देशमुख
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.