पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर 'यशोभूमी'चे उद्धाटन!

"यशोभूमी" "भारत मंडपम" पेक्षा मोठी; कारागीरांची ही घेतली मोदींनी भेट

    17-Sep-2023
Total Views |
Yashobhoomi Inauguration

नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथे इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटरचे (IICC) उद्घाटन केले, ज्याला 'यशोभूमी' असे नाव देण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त ‘विश्वकर्मा योजना’ सुरू केली. पंतप्रधानांनी दिल्ली मेट्रोने द्वारकापर्यंत प्रवास केला आणि यादरम्यान त्यांनी एक्सप्रेस वे मेट्रो लाइनचे उद्घाटनही केले. यशोभूमीच्या उद्घाटनापूर्वी त्यांनी कलाकार, कारागीर यांचीही भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची ही विचारणा केली.'यशोभूमी' या नावाने बांधल्या जाणाऱ्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटरचा (IICC) पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे.
 
सर्वात भव्य संमेलन केंद्रांपैकी एक

द्वारका, दिल्ली येथे बांधलेले ‘यशोभूमी’ कन्व्हेन्शन सेंटर अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. आकाराने ते प्रगती मैदानावर तयार करण्यात आलेल्या 'भारत मंडपम' पेक्षा मोठे आहे, जेथे अलीकडेच G-२० संबंधित बैठका आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. द्वारका येथे 'यशोभूमी' नावाचे असेच एक कन्व्हेन्शन सेंटर बांधण्यात आले आहे, ज्याच्या भव्य बॉलरूममध्ये २,५०० पाहुणे एकाच वेळी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतील. बॉलरूम सोबतच एक मोठा टाऊन हॉल आणि एक खुली जागा आहे ज्यामध्ये ५०० लोक बसू शकतात.

यशोभूमी ८ मजली बनवण्यात आली असून त्यात १३ सभागृह आहेत. यशोभूमी हे जगातील सर्वात मोठ्या प्रदर्शन हॉलपैकी एक आहे. १.०७ लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर बांधण्यात आलेल्या या प्रदर्शन हॉलचा वापर प्रदर्शन, व्यापार मेळा आणि व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केला जाईल.

दरम्यान आजपासून विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे. विश्वकर्मा योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून म्हणजेच दि. १७ सप्टेंबर २०२३ पासून सुरू झाली. पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत कामगारांना १५,००० रुपयांचे टूलकिट, तसेच ५ टक्के व्याजाने १ लाख रुपयांचे कर्ज आणि पहिल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर २ लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. याचा फायदा लाखो कामगारांना होणार आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.