मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना दाखवणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. अचुक विनोदाचे टायमिंग आणि तितक्याच ताकदीची भूमिका साकारत प्रेक्षकांना लक्ष्मीकांत यांनी वेड लावलं. लक्ष्मीकांत यांनी ज्या ज्या चित्रपटांमध्ये भूमिका केली ते सर्व चित्रपट सुपरहिट ठरले. त्यामुळे यश आणि लक्ष्मीकांत यांचं वेगळं समीकरणचं जुळलं होतं. यशाच्या शिखरावर असूनही त्यांना कधीच गर्व नव्हता. अनेक दिग्गज दिग्दर्शक, लेखकांसोबत लक्ष्मीकांत यांनी काम केले होते. मात्र, एका सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाच्या लेखकाचे नाव ऐकताच लक्ष्मीकांत यांनी त्या चित्रपटाला नकार दिला होता.
तर झालं असं की, एका मोठ्या लेखकाने लिहिलेली चित्रपटाची कथा त्यांच्याकडे आली. मात्र त्या लेखकाचं नाव ऐकताच त्यांनी नकार दिला. ते लेखक होते पु. ल. देशपांडे, आणि तो चित्रपट होता 'एक होता विदूषक'. जब्बार पटेल यांनी त्या चित्रपटाची कथा आणि संवाद लक्ष्मीकांत यांना ऐकवले होते. आणि चित्रपटाची कथा पु. ल. देशपांडेंची आहे हे ऐकताच त्यांनी या चित्रपटासाठी नकार दिला होता. त्यांनी चित्रपट नाकारण्याचे कारण असे होते की, पु.ल. देशपांडे हे खूप मोठे लेखक होते. त्यांनी लिहिलेली कथा ही ताकदीची असणारच आणि आपण कायमच विनोदी भूमिका साकारत आलो आहोत, त्यामुळे या चित्रपटात त्यांनी आपल्यासाठी लिहिलेली भूमिका झेपेल का या विचारानेच लक्ष्मीकांत यांनी या चित्रपटाला नकार दिला होता.
मात्र जब्बार पटेल यांनी लक्ष्मीकांत यांची समजूत काढून तुम्हीच या पात्रासाठी योग्य आहात हे सांगितले होते. आजपर्यंत तुम्ही साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूप वेगळी असून ती तेवढ्याच ताकदीने मांडणारा कलाकार आम्हाला हवा आहे. हे ऐकल्यानंतर लक्ष्मीकांत यांनी चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला होता. एक होता विदूषक या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. इतकंच नव्हे, तर लक्ष्मीकांत यांनी साकारलेल्या या वेगळ्या भूमिकेमुळे त्यांच्यातील अभिनयाची वेगळी बाजू देखील प्रकर्षाने समोर आली.