मुंबई : करोना काळानंतर ओटीटी वाहिनीला प्रेक्षकांनी अधिक पसंती देण्यास सुरुवात केली. नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीने जगातील विविध भाषांमधील आशय प्रेक्षकांना घरबसल्या पाहण्यास मिळत आहे. ओटीटी वाहिनीच्या जंजाळात नेटफ्लिक्स वाहिनीने उच्च दर्जा गाठला असून दुसरीकडे गेली अनेक वर्ष विविध विषयांवर आधारित सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी यशराज फिल्म्स देत आहे. आता हा मनोरंजनाचा धमाका दुप्पट होणार असून यशराज आणि नेटफ्लिक्स यांच्यात मल्टीपल प्रोजेक्ट्सचा करार झाला आहे.
यशराज फिल्म्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत करारासंबंधी माहिती दिली आहे. “नेटफ्लिक्स आणि यशराज फिल्म्सने भारतात प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी एक करार केला आहे. आता मनोरंजनाचा नवा अध्याय लवकरच सुरू होणार आहे”.
नेटफ्लिक्स आणि यशराज फिल्म्समध्ये झालेल्या करारासंदर्भात नेटफ्लिक्स इंडियाच्या उपाध्यक्षा मोनिका शेरगिल म्हणाल्या की, 'यशराज फिल्म्सचे चित्रपट निर्मितीच्या जगात वेगळे स्थान आहे. आता आम्ही प्रेक्षकांपर्यंत अधिक चांगला कटेंट पोहचवू शकतो”.
अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद हा यशराजच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या 'महाराजा' चित्रपटाद्वारे नेटफ्लिक्सवर पदार्पण करणार आहे. याव्यतिरिक्त अभिनेता आर माधवनची 'द रेल्वे मॅन' ही वेब मालिका देखील नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत आर माधवन व्यतिरिक्त केके मेनन, दिव्येंदू शर्मा आणि बाबिल खान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.