हैदराबाद मुक्तिसंग्राम व हिंदू संघटना

    16-Sep-2023
Total Views |
Hyderabad Liberation War and Hindu Organization

हैदराबाद संस्थान नवनिर्मित पाकिस्तानला मिळावे, असा प्रयत्न तेव्हा होता. कारण, निजामाचे राज्य. उपपंतप्रधान असणार्‍या पोलादी नेतृत्व वल्लभभाई पटेलांनी ही बाब अंतर्गत समस्या म्हणून हिंदुस्थानी सैन्यास आदेश दिला आणि ‘ऑपरेशन पोलो’ ही मोहीम सैन्याने राबवून रझाकारांना नमवून मराठवाडा मुक्तिसंग्रामाची सांगता झाली. या मोहिमेत सर्व हिंदू संघटनांनी हिरिरीने भाग घेतला होता, हा इतिहास आहे. ‘ऑपरेशन पोलो’ दि. १३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत कार्यान्वित होऊन मराठावाडा रझाकारीतून मुक्त झाला. तेव्हा आजच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्ताने ‘ऑपरेशन पोलो’ आणि या लढ्यातील हिंदू संघटनांचे योगदान या विषयांवर भाष्य करणारे हे दोन लेख...

दुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या अर्वाचीन इतिहासावर नजर टाकल्यास असे दिसून येते की, मुस्लिमांच्या अहंकारी पृथकवादी हट्टामुळे आमच्या मातृभूमीची शकले झाली. किंबहुना, बहुसंख्य असूनही हिंदूंच्या फाजील सहिष्णुतेवर मुस्लिमांच्या शिरजोर अतिरेकाने कुरघोडी केली आणि मग हिंदू राष्ट्रवाद उफाळून आला. तत्कालीन नेतृत्वाची मजल, इथपर्यंत गेली की, ब्रिटिशांनी स्वातंत्र्य मुस्लिमांच्या हाती स्वाधीन केले, तरी ते मी आनंदाने स्वीकारेन, अशा या भाबड्या, अवसानघातकी नेतृत्वाचे प्रथम कट्टर टिळकवादी असणार्‍या बॅरिस्टर महंमद अली जिना यांनी पाणी जोखून द्विराष्ट्रवादाला चालना देऊन, त्यात ते यशस्वी झाले. १९२० सालापर्यंत तमाम हिंदुस्थान संपूर्ण स्वातंत्र्यांसाठी लढत असताना पुढे हा बदल झाला. त्याला कारण साधुत्वाच्या आड लपलेले ढोंगी व नेभळट राजकारण. याचाच फायदा घेऊन ब्रिटिश या देशातून चालते झाल्यावर निजामाने ‘आझाद हैदराबाद’ची वल्गना करून रझाकारीत जगणार्‍या हिंदूंचे स्वराज्य दि. १७ सष्टेंबर १९४८ पर्यंत लांबवले.

अनेक संस्थांमध्ये विखुरलेल्या त्या हिंदू राष्ट्रात हिंदू संस्थानांची संख्या जास्त होती. ही संस्थाने ब्रिटिश साम्राज्यात विलीन न करीत उलट त्यांचे पुनरुज्जीवन करावे. कारण, एक संस्थानिक स्वराज्यात आणणे म्हणजे ५० हजार बांधव हिंदू राष्ट्रात समाविष्ट होणे, असे वीर सावरकर मानत असत. कारण, शाहू महाराजांनी आपल्या एका वटहुकुमात अनेक हिंदू लोकोपयोगी सुधारणा घडवल्या होत्या. बडोदे संस्थानाने तर तेव्हा एक दिवसात हिंदी ही शासनदप्तरांची भाषा जाहीर करून कारभार हिंदीत सुरू केला. तसेच, वेळ आल्यास या संस्थानांचे लष्कर हे हिंदू हिताच्या आड येणार्‍यांविरुद्ध मुकाबला करण्यास उपयोगी पडेल; तसेच स्वातंत्र्योत्तर काळात सैनिकीकरणात ही लष्करे कामी येतील, असा आशावाद वीर तात्याराव सावरकरांचा होता. थोड्याफार प्रमाणात तो खरा ठरून सर्व हिंदू संस्थाने हिंदवी संघराज्यात प्रविष्ट झाली. अपवाद केवळ काश्मीर. कारण, काश्मीर संस्थांनात राजा हिंदू, प्रजा मुसलमान अशी विचित्र स्थिती होती. काश्मिरी जनतेला स्वायत्ता पाहिजे होती.

हिंदू संघराज्यात राहायचे तर होते. पण, पाकिस्तानशी संबंध पाहिजे होते. म्हणून पाकिस्तान, हिंदुस्थान व काश्मीरचे एक फेडरेशन करावे, अशीही टूम निघाली. परंतु, सरदार पटेलांच्या कणखर नेतृत्वाने ती मोडून काढली. दुदैवाने स्वप्नाळू नेतृत्वाने हा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेला आणि त्याचा विचका करून टाकला. आजही ते भूत सरकारच्या मानगुटीवरून उतरायला तयार नाही. हा कणाहीन व भोळसट आशावादी राजकारणाचा परिपाक ५५ कोटींची दक्षिणा अन् त्या बदल्यात काय तर हजारो निर्वासित हिंदू बांधवांचा नरसंहार!असाच हिंदूंचा नरसंहार हैदराबाद संस्थानात होणार की काय, या भीतीने सर्व हिंदू संघटनांना ग्रासले होते. कारण, हिंदूंना शह देण्यासाठी निजामाने मुस्लीम निर्वासितांना आपल्या संस्थानात मुक्त प्रवेशद्वार ठेवले होते. तेव्हा नुसत्या संभाजीनगर शहरात एक हजार मुस्लीम निर्वासितांनी आश्रय घेऊन येथील रझाकारांच्या भावना उद्दिपित करून उच्छाद मांडला होता, हा इतिहास आहे.

वीर तात्याराव सावरकरांना पूर्णपणे माहीत होते की, सर्व हिंदू संस्थानांना हिंदू संघराज्यात विलीन व्हावेच लागेल. स्वातंत्र्य म्हणजे केवळ भूमीची मुक्ती नव्हे, तर आमच्या समाजाचे, वंशाचे, राष्ट्राचे स्वातंत्र्य हा विचार अभिप्रेत होता.१९३९च्या मार्चमध्ये भागानगरमधल्या निःशस्त्र प्रतिकाराचा मोठा प्रारंभ झाला. सुमारे २०० प्रतिकारक रोज निजामी सीमेत घुसून आंदोलन करत होते. हळूहळू आंदोलनाला गती आली आणि हिंदू संघटनांचा सीमेवरचा रट्टा निजामाला विचार करण्यास प्रवृत्त करून लागला. तेव्हा या प्रतिकारकांच्या तुकड्यांचे नेतृत्त्व सेनापती बापट, भालाकार भोपटकर, मामाराव दाते, चांदकिरण सारडा, वि. घ. देशपांडे, बाळशास्त्री हरदास, पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह झालेले भय्याजी दाणी व माधवराव मुळे या हिंदू संघटना वीरांनीच केले होते.

त्यातील एका तुकडीत माझे वडील कै. शाहीर श्रीधर अभ्यंकर हेसुद्घा स्वयंसेवक म्हणून निजामाचा पाहुणचार भोगून आले होते. या प्रतिकारकांच्या आंदोलनात आर्य समाजी, हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणून १५ हजार शिलेदार निजामी मुलुखात घुसले होते. हा इतिहास आहे बरं का! या आंदोलनाचा प्रभाव असा झाला की, निजामाने ५० टक्के सुधारित राजकीय सोयी, सवलती, हिंदूसाठी राखीव म्हणून घोषित केल्या. तेव्हा वीर तात्याराव म्हणाले होते की, “जेथे शेकडा शून्य होते, तेथे शेकडा ५० जागा आज पटकावून आम्ही निजामाच्या गर्वाचे हरण केले आहेत.”हैदराबाद जुलमांचा डोंगर निःशस्त्र प्रतिकारकांच्या या आंदोलनाच्या रेट्याने हादरला आणि हिंदू नेत्यांना भेट नाकारणारा सर अकबर हैदरी आणि आला हजरत हे दोघे हिंदू महासभेसमोर वाकले आणि मग निःशस्त्र प्रतिकाराकांची आंदोलने फक्त काँग्रेसचेच नेतृत्त्व करू शकते, हा भ्रमही फुटला. तेव्हा हिंदूंना कळून चुकले की, आपणही संघटित झालो, तर बरेच काही करू शकतो. प्रतिकारक आंदोलनाचे नेतृत्व तेव्हा, वीर सावरकरांच्या सक्षम हातात होते.या प्रतिकारक आंदोलनाचे एक वेगळे वैशिष्ट्य हे होते की, वरील सर्व नेतेगण हे निजामी मुलखाबाहेरचे होते. परंतु, मराठवाड्यातील हिंदू प्रजेचे रक्षण व पालन या उदात्त हेतूने, ते या जनसंग्रामात उतरले होते.




 
विनायक अभ्यंकर


(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.)


vinayakabhyankar९९@gmail.com.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.