स्वयंपूर्तीच्या दिशेने नवा भारत

    15-Sep-2023
Total Views |
Editorial on Reducing solar imports from China to pave way to energy independence

सौरऊर्जा उत्पादनात भारत जगात पाचव्या क्रमांकावर असून २०३० पर्यंत या क्षेत्रात आघाडी घेण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निर्धारित केले आहे. सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात चिनी उत्पादनांची आयात कमी करीत भारताने देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला बळ दिले. त्यामुळे सौरऊर्जेच्या किमती कमी होण्याबरोबरच स्वदेशी सौरऊर्जा उत्पादनांच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे.

एनर्जी थिंक टँक ‘एम्बर’च्या मते, २०२३च्या पहिल्या सहामाहीत चीनमधून होणारी भारताची सौरऊर्जा संबंधित उपकरणांची आयात जवळपास ८० टक्के इतकी कमी झाली आहे. भारताच्या सौरपुरवठा साखळीतील हा महत्त्वपूर्ण बदल म्हणावा लागेल. कारण, भारत चिनी आयातीवर अवलंबून राहण्याचा तसेच देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करीत असताना, जाहीर झालेली ही आकडेवारी देशाच्या धोरणाला बळ देणारी अशीच आहे. भारतातील एकूण सौर मॉड्यूल आयात २०२२च्या पहिल्या सहामाहीत ९.८ जीडब्ल्यूवरून २०२३च्या पहिल्या सहामाहीत २.३ जीडब्ल्यूवर आली. ७६ टक्के इतकी झालेली घट चीनच्या आयात महसुलात तब्बल दोन अब्ज डॉलरची कपात करणारी ठरली. चीनमधून होणारी सौरउत्पादनांसंबंधी आयात कमी होण्यामागे तशी अनेक कारणे. त्यापैकी चिनी सौरउत्पादनांवर लादलेले ४० टक्के आयात शुल्क हे त्यातील प्रमुख.

देशांतर्गत सौरऊर्जा उत्पादन उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने विशेष प्रयत्न केले. त्याचवेळी चिनी बनावटीच्या सौरऊर्जा उत्पादनांची वाढती किंमत हेही आयात कमी होण्यासाठी कारणीभूत ठरली. व्हिएतनाम तसेच मलेशिया येथे उत्पादित होणार्‍या उत्पादनांशी असलेली स्पर्धा त्यायोगे स्वाभाविकपणे कमी झाली. देशांतर्गत सौरऊर्जा उत्पादनांना चालना देण्यासाठी भारत सरकारने प्रोत्साहन कार्यक्रम सुरू केले आहेत. देशांतर्गत उद्योग चिनी पुरवठादारांशी अधिक प्रभावीपणे स्पर्धा करण्यास सक्षम बनले असल्यानेच देशांतर्गत सौरऊर्जा उत्पादन उद्योगातील गुंतवणूकही वाढली आहे. त्याचाच दृश्य परिणाम आयातीवर झालेला दिसून येतो.

आयातीत झालेली घसरण भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम करत असून, एका अंदाजानुसार सौरऊर्जा उत्पादन उद्योग पुढील पाच वर्षांत दोन दशलक्ष रोजगार निर्माण करणार आहे. चीनमधून भारताच्या घटत्या सौरऊर्जा उत्पादनांच्या आयातीची कहाणी ही आत्मनिर्भरता आणि नवनिर्मितीची कथा आहे. भारताचा विदेशी आयातीवरील विशेषतः चीनवरील बाजारपेठेवरील अवलंबन कमी करण्याचा तसेच देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्याचा भारत सरकारने जो निर्धार केला आहे, त्याला सौरऊर्जा उद्योग बळ देत असल्याचेच चिनी आयातीत झालेली घट अधोरेखित करते. हा उद्योग त्यामुळे रोजगार निर्मितीही करत आहे. भारताला सौरऊर्जा उद्योगात जागतिक नेता होण्यासाठी, याची मदत होते. चीनमधील आयातीत झालेली घट ही भारतीय सौरऊर्जा उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब असून, भारत अधिकाधिक स्वावलंबी होत असून, देशांतर्गत उद्योग अधिक मजबूत होत असल्याचेच हे लक्षण.

चीनमधून आयात कमी झालेली असली, तरी व्हिएतनाम तसेच मलेशिया येथील आयात लक्षणीय वाढली आहे. तसेच, उत्पादनांच्या किमतीही सुमारे २० टक्के इतक्या कमी झाल्या आहेत. म्हणूनच भारतीय ग्राहकांसाठी सौरऊर्जा अधिक परवडणारी ठरत आहे.भारत सरकारने २०३० पर्यंत ४५० जीडब्ल्यू सौरऊर्जा क्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी, भारताला देशांतर्गत उत्पादन क्षमतेत वाढ करणे आवश्यक असेच. या उद्योगात नवनवीन संधी निर्माण होत असून, देशांतर्गत पुरवठादार चिनी बाजारपेठेशी स्पर्धा करण्यास सक्षम आहेत. २०२३ मध्ये भारताची सौरऊर्जा क्षमता ६४.५ जीडब्ल्यू इतकी झाली असून, सौरऊर्जा निर्मिती ३९.९५ अब्ज किलोवॅट्स इतकी झाली आहे. वाढीचा दर हा २१ टक्के इतका थक्क करणारा. अन्य देशांशी तुलना केली तर चीन जगात सर्वाधिक सौरऊर्जा निर्माण करणारा देश म्हणून अव्वल क्रमांकावर आहे.

त्याची सौरऊर्जा क्षमता ३०६ जीडब्ल्यू इतकी. अमेरिका १३० जीडब्ल्यूसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. जर्मनी आणि जपान हे देशही भारताच्या पुढे आहेत. तथापि, येत्या काही वर्षांत भारत जर्मनीला मागे टाकेल, अशी अपेक्षा आहे. भारत सरकारने सौरऊर्जा विकासासाठी लक्ष्ये निश्चित केली आहेत. गेल्या काही वर्षांत त्यासाठीच्या खर्चातही लक्षणीय अशी घट झाली आहे, ज्यामुळे भारतीय ग्राहक तसेच व्यवसायांना ती परवडणारी आहे. भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असून विजेची मागणीही अर्थातच वाढत आहे.

सौरऊर्जा हा विजेचा स्वच्छ आणि परवडणारा स्रोत आहे. म्हणूनच देशाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी तो योग्यही आहे. २०३० पर्यंत ४५० जीडब्ल्यू सौरऊर्जा क्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले आहे. त्यासाठी सौरऊर्जा विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. हा उद्योग आर्थिक विकासाला चालना देत असून, जीवाश्व इंधनावरील भारताचे अवलंबन कमी करणारा ठरत आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यास सौरऊर्जेची मदत होत आहे. म्हणूनच भारताने सौरऊर्जा उत्पादनात आघाडी घेतली आहे. देशाकडे त्यासाठी आवश्यक ती संसाधने असून, मुख्यतः केंद्र सरकारचे याला पाठबळ आहे. चिनी आयातीवरील अवलंबन कमी करताना भारताने दोन गोष्टी साध्य केल्या आहेत. या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याबरोबरच भारताने चिनी उद्योगाला धक्काही दिला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत असून, ‘मेक इन इंडिया’ला बळ देत आहे. त्याचेच फलस्वरूप सौरउत्पादनाच्या चिनी आयातीत झालेली घट ठळकपणे दिसून येते.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.