मुंबई : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येत्या नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
विविध विभागांची बैठक घेत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, यंदा पावसाची स्थिती खराब आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन येत्या नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी राज्यव्यापी खड्डेमुक्त रस्ते अभियान राबविण्यात यावे.
तसेच पुढे ते म्हणाले की, राज्यात वेगवेगळ्या विभागांचे जवळपास चार लाख किलोमीटरचे रस्ते आहेत. या प्रत्येक रस्त्यावरून चालणे हा सर्वसामान्यांसाठी आनंददायी अनुभव असावा ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे मेट्रो/एक्स्प्रेस वे सारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे पूर्वीचे रस्ते खराब झाल्यास संबंधित विभाग त्यासाठी जबाबदार असेल, असे ते म्हणाले.
तसेच रस्त्यांसाठी बजेटची कुठलीही कमतरता नसून सर्व विभागांनी व्यवस्थित नियोजन करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच रस्ते बांधणीचे कंत्राट घेणारे कंत्राटदार आणि एजन्सी रस्त्याच्या बांधकामानंतर पुढील ५ वर्षे देखभालीची जबाबदारी घेतील याची खात्री करण्याच्या सुचनाही त्यांनी आपल्या विभागातील मंत्री आणि विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.