आमदार अपात्रता प्रकरण : १४ सप्टेंबरला दुपारी सुनावणी

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर ऍक्शन मोडवर

    11-Sep-2023
Total Views |

rahul narvekar


मुंबई :
शिवसेना पक्षात झालेल्या सर्वात मोठ्या ऐतिहासिक बंडानंतर पक्ष आणि संघटना कुणाची हा प्रश्न ऐरणीवर आला होता. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर पक्षांतराची कारवाई करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उबाठा गटाकडून करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात शिवसेना शिंदेंचीच असल्याचा निर्वाळाही निवडणूक आयोगाने दिला होता.

यावरच आता विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार असून अपात्रतेच्या संदर्भात काही दिवसांत निकाल येण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, गुरुवार दि. १४ सप्टेंबर रोजी आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार असून दोन्ही गटाचे आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत. न्यायायालच्या निर्णयानंतर शिवसेना आणि उबाठा गटाच्या आमदारांच्या भवितव्याचा प्रश्न आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यकक्षेत गेला आहे. 

आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार नार्वेकर यांच्याकडेच असून तेच याबाबत निर्णय घेतील हे स्पष्ट आहे. गुरुवारी होणाऱ्या सुनावणीत दोन्ही गटाच्या आमदारांना आपल्या बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात येणार असून दुपारी बारा वाजल्यापासून ही सुनावणी सुरु होणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भात एकूण ३४ याचिका दाखल झाल्या असून या सर्व याचिकांवर गुरुवारीच सुनावणी होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी म्हटले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.