'देवराई’ हा शब्द ‘देव’ आणि ‘राय’ म्हणजे ‘जंगल’ या दोन शब्दांचे मिश्रण आहे. अनेक समाजांमध्ये निसर्गाचा पारंपरिक आदर करतात, त्याची पूजा करतात आणि काही वनस्पती आणि प्राण्यांना पवित्र मानले जाते. तसेच, जंगलाच्या काही भागालादेखील काही ठिकाणी स्थानिक लोक ‘पवित्र’ मानतात म्हणूनच या जंगलांना ’सेक्रेड ग्रूव्ह’ असे म्हटले जाते. भारतातील अशी ही जंगले सांप्रदायिकरित्या संरक्षित आहेत आणि त्यांचे संरक्षण करणार्या समुदायासाठी त्यांचे धार्मिक महत्त्व असते. अशा जंगलांमध्ये शिकार करणे आणि लाकूड तोडणे सहसा प्रतिबंधित आहे. मधाचे संकलन आणि पडलेली लाकडे गोळा करणे यांसारख्या क्रियांना काही वेळा परवानगी दिली जाते. अशा वनांचे संरक्षण करण्यासाठी स्वयंसेवी संस्था स्थानिक गावकर्यांसोबत काम करतात. पारंपरिकपणे आणि काही प्रकरणांमध्ये आजही, समुदायाचे सदस्य आळीपाळीने देवराईचे संरक्षण करतात. वन्यजीव (संरक्षण) अमेंडमेंट कायदा, 2002 अंतर्गत, ‘देवराई’सारख्या जंगलांना सरकारी संरक्षण प्रदान करण्यात आले आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, संपूर्ण भारतातून सुमारे 14 हजार देवराई नोंदवल्या गेल्या आहेत. ही जंगले, दुर्मीळ प्राणी आणि अति-दुर्मीळ वनस्पतींसाठी आश्रयस्थान म्हणून काम करतात. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, भारतातील एकूण देवरायांची संख्या तब्बल एक लाख इतकी असू शकते. या संरक्षित जंगलांना असलेल्या धोक्यांमध्ये शहरीकरण आणि संसाधनांचे अतिशोषण याचा महत्त्वाचा वाटा आहे. सनातन, बौद्ध, जैन आणि शीख धर्म यांसारख्या भारतीय वंशाच्या अनेक धर्मांमध्ये देवराईला यात्रेचे ठिकाण मानले जाते. आपल्याकडे देवराईची जंगले बर्याचदा मंदिरे, मठ, तीर्थक्षेत्रे, स्मशानभूमीशी संबंधित आढळते.
पण, मला वाटत की खरंतर, देवराईकडे आपण धार्मिक कारणांचा वापर करून संरक्षित केलेल्या नैसर्गिक वन्यजीवांची स्थाने असेदेखील बघू शकतो. व्रुक्षायुर्वेदसारख्या प्राचीन ग्रंथात, तसेच कालिदासाच्या ‘विक्रमुर्वशीय’ या अभिजात ग्रंथातदेखील देवराईचे संदर्भ मिळतात. निसर्गाचा संवर्धन करताना, धार्मिक आणि अध्यात्मिक भावना आत्मसात करून संवर्धन कसे करता येते याचे ‘नक्षत्रवन’ ही देवराई सुंदर उदाहरण आहे. ‘नक्षत्रवन’ हे शृंगेरी, कर्नाटक, येथील एक पवित्र उपवन (सेक्रेड ग्रूव्ह) आहे. ही जागा शृंगेरी शारदापीठम मठाशी संबंधित आहे आणि त्यात 27 झाडे आहेत. जी भारतीय ज्योतिषशास्त्राच्या 27 नक्षत्रांशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ, अश्विनीसाठी कुचलेचं झाड, भरणी नक्षत्रासाठी आवळ्याचे झाड, कृत्तिकासाठी उंबर आणि रोहिणी नक्षत्रासाठी जंभूळ इ. झाडे इथे लावली आहेत.
सामान्यतः, देवराई या आद्यदेवतेच्या किंवा रक्षकदेवता अथवा ग्रामदेवता आणि स्थानदेवता या संकल्पनेशी संबंधित असतात. एकट्या केरळ आणि कर्नाटक राज्यात एक हजारांहून अधिक देवता देवराईशी संबंधित आढळतात. मोठ्या संख्येने, विभिन्न स्थानिक कला-प्रकार आणि लोक-परंपरा देवराईच्या देवतांशी संबंधित आढळतात आणि या परंपरा त्या स्थानाचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक पैलू दाखवतात. वनाचे रक्षण करणार्या स्थानिक देवतांवर आधारित धार्मिक नृत्ये आणि नाटकांना केरळमध्ये ‘थेय्यम’ आणि कर्नाटकात ‘नागमंडलम’ इ. नावांनी ओळखले जाते. तसेच, गुलिका देव किवा ‘कांतारा’ चित्रपटातील उत्सवदेखील अशाच उत्सवाचे उदाहरण आहे.

चला, जरा देवराईच्या अध्यात्मिक इतिहासात खोलवर जाऊ. हिंदू परंपरेप्रमाणे पवित्र जंगले तीन प्रकारची असतात. हे तीन प्रकार म्हणजे तपोवन, महावन आणि श्रीवन. ‘तपोवन’, हे तपस्येशी निगडित आहे आणि त्यात ऋषी आणि मुनींचे वास्तव्य मानले जाते. ‘महावन’ म्हणजे भव्य असे नैसर्गिक जंगल. आपल्या संस्कृतीत तपोवन आणि महावन, हे वनस्पती आणि जीवजंतूंसाठी अभयारण्य मानले जाते. कारण, या जंगलांमध्ये सामान्य माणसांना प्रवेश करण्याची परवानगी नाही. यावरून एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. ती अशी की, अशा प्रतिष्ठित परिसंस्था अस्पर्शित ठेवण्याचे महत्त्व आदिकालिन लोकांनादेखील समजले होते. ‘श्रीवन’, याचा अर्थ, ‘समृद्धीच्या देवीची जंगल’ असा मनाला जातो. यात पवित्र मानल्या जाणार्या घनदाट जंगलांचा समावेश केला आहे. या जंगलांमधून, कोरडे लाकूड, पाने, मर्यादित प्रमाणात लाकूड गोळा करायला काही ठिकाणी परवानगी असते. पण, नैसर्गिक परिसंस्थेला विनाकारण त्रास होणार नाही याची नेहमीच काळजी या भागांमध्ये घेतलेली आढळते. या पवित्र जंगलांच्या शेजारी काही वेळा आंब्याच्या झाडांसारखी विशिष्ट झाडे येथे लावली जात. त्या आंब्याची काळजी घेता घेता, स्थानिक लोक, देवराईचीदेखील काळजी घेत. जर तुम्ही या पद्धतींना वर्तमान काळाशी जोडायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला जाणवेल की, सामुदायिक वनीकरण आणि सिल्व्हिकल्चरशी याचे खूप साधर्म्य आहे.
झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे ही प्राचीन भारतातील अत्यंत विकसित प्रथा आहे, असे मला वाटते. ‘वृक्षायुर्वेद’ या प्राचीन ग्रंथात तसेच या विषयावरील ’सुरापाल’ या दहाव्या शतकातील ग्रंथात देखील, वृक्षांच्या विविध प्रजाती आणि त्यांची वाढ यावर सखोल चर्चा केली आहे. वृक्षायुर्वेदतील नऊ ते 23 श्लोक दर्शवितात की श्रद्धा आणि पर्यावरणाचे संरक्षण कसे एकमेकांशी जोडलेले आहे. आजकाल हळूहळू का होईना, पण निश्चितपणे आधुनिक जगाला या ’सेक्रेड ग्रूव्हस्’चे महत्त्व कळू लागले आहे.
‘सेक्रेड ग्रूव्हस्’ निसर्गाच्या उपासनेचा एक भाग आहेत आणि ’आययुसीएन’सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या व्याख्येनुसार त्यांना ’पवित्र नैसर्गिक स्थळे’ मानले गेले पाहिजे. भारत आणि भारतीय उपखंडा व्यतिरिक्त, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आशिया आणि युरोपसह जगातील इतर भागांमध्येदेखील ’सेक्रेड ग्रूव्हस्’ अस्तित्वात आहेत. ही जंगले जैविक, सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि ऐतिहासिक मूल्यांचे अमूल्य खजिना आहेत. ’सेक्रेड ग्रूव्हस्’चे उच्च संवर्धन आणि जैवविविधता मूल्ये, त्यांना जैवविविधता संवर्धनासाठी अनन्यसाधारण महत्त्व प्रदान करते. भारताच्या राष्ट्रीय पर्यावरण धोरणानुसार प्राचीन पवित्र उपवनांना अतुलनीय मूल्ये अर्थात ’खपलेारिीरलश्रश तरर्श्रीशी’ मानले जाते. परंतु, खेदाची बाब म्हणजे, फक्त काहीच देवराईचे दस्तऐवजीकरण आणि तपशीलवार अभ्यास केला गेला आहे. या मौल्यवान खजिन्यांचा वैज्ञानिक अभ्यास 70च्या दशकाच्या उत्तरार्धात सुरू झाला. भारतामध्ये1 लाख, 50 हजार देवराई असू शकतात, असे काही साहित्य संदर्भ सांगतात तरी फक्त 13 हजार, 720 देवराया नोंदल्या गेल्या आहेत आणि त्यांचा अभ्यास केला गेला आहे. डॉ. वॉरियर आणि त्यांच्या टीमने मे 2023 मध्ये ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंट अॅण्ड क्लायमेट चेंज’मध्ये प्रकाशित केलेल्या सेक्रेड ग्रूव्हजचा अभ्यासात, भारतात, तब्बल 22 राज्यांत देवराईची जंगले असल्याचे सांगितले आहे. यात अधिक प्रमाणात देवराया महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि ईशान्य भारतातील सात राज्यांमध्ये आहेत.
जर आपण फक्त महाराष्ट्रातील आकडेवारीवर नजर टाकली, तर सुमारे 35 हजार, 710 हेक्टर क्षेत्र व्यापात 400 देवरायाची नोंद आहे. यामध्ये देशी वनस्पतींच्या सुमारे 790 प्रजातींचा समावेश आहे. महाराष्ट्रात देवरायांमध्ये, प्राण्यांची हत्या किंवा लाकूड तोडणे निषिद्ध आहे. पण, यातील लाकूड विरहित वनात मिळणार्या गोष्टी स्थानिक समुदाय वापरू शकतो. महाराष्ट्रातील ‘देवराई’मध्ये लक्षणीय वाढ दर्शविणार्या आर्बोरियल अर्थात, झाडांवर वाढणार्या वनस्पती आणि लिआनांसारख्या वनस्पतीच्या अभ्यासानंतर, या ‘देवराई’च्या संवर्धनाच्या गरजेवर भर देण्यात आला आहे. ‘बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ने केलेल्या अभ्यासाने आणि डॉ. व्ही.डी.वर्तक यांच्या विशेष योगदानाने महाराष्ट्रातील या अमूल्य साधनसंपत्तीच्या संवर्धनासाठी खूप मदत केली आहे. लोकसंख्येचा स्फोट, शेतीचे व्यापारीकरण आणि जंगलतोडीचा वाढता वेग, हे महाराष्ट्रातील अनेक देवराईच्या र्हासाचे प्रमुख कारण बनले आहे.
आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे की, ही जंगले आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत आणि भारतातील असंख्य लुप्त होऊ शकणार्या वनस्पती आणि जीवजंतूंच्या जगण्याची शेवटची आशा असू शकतात. आणि म्हणूनच, त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. या जंगलांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा घटक ठरणार्या आध्यात्मिकविश्वास प्रणालीपासून दूर जाण्याऐवजी, स्थानिक समुदायांशी देवराईच्या संवर्धनासाठी हातमिळवणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

उपलब्ध अहवाल वेगवेगळ्या राज्यांमधील देवराईच्या संख्येत असलेली विसंगती दर्शवते. वेगवेगळ्या एजन्सींनी एकाच राज्यात वेगवेगळे नंबर नोंदवले आहेत. उदाहरणार्थ, संपूर्ण केरळमधून 761 महत्त्वाच्या देवराईची शासकीय नोंद आहे. पण, ‘इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट जेनेटिक्स अँड ट्री ब्रीडिंग’ (खऋॠढइ), कोईम्बतूरद्वारे केलेल्या अभ्यासानुसार अलाप्पुझा, या केरळातील सर्वांत लहान जिल्ह्यातून 1 हजार, 128 देवराईची नोंद आहे. यावरून समन्वित प्रयत्नांचा अभाव दिसून येतो. बिहारसारख्या राज्यातील देवराईबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. कारण त्यांची ओळख आणि दस्तऐवजीकरण करणे बाकी आहे. महाराष्ट्र राज्यातही अशीच परिस्थिती आहे.
सध्याच्या युगात, जेव्हा ‘युएन’ आणि ‘आययुसीएन’सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या वनांचे संवर्धन आणि सीमांकन करण्यात खूप रस घेत आहेत, तेव्हा हे स्पष्ट आहे की देवराईचे योग्य संवर्धन आणि संरक्षण धोरण आवश्यक आहे. आता जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पावसाळी सहलीची योजना कराल, तेव्हा तुम्हाला या प्राचीन जंगलांना आणि त्यांचे संरक्षण करणार्या लोकसमुदायाला भेट देण्याची संधी मिळते का ते पाहा. त्यांना भेट द्या, त्यांच्या ज्ञानाची कदर करा आणि आपली संस्कृती आणि जैवविविधता जतन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा आदर करा.
- डॉ. मयूरेश जोशी