शालेय जीवनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राष्ट्रीय कार्याबद्दल अगदी जुजबी माहिती मिळाली होती. परंतु, खूप वर्षांपासून ‘अनादि मी...अनंत मी...अवध्य मी...’ या त्यांच्या काव्यपंक्ती मनात घर करून होत्या. ‘नैनं छिन्दन्ती शस्त्राणी...’ या भगवद्गीतेतील श्लोकाच्या आधारे वरील काव्यपंक्तींचा अर्थ तर समजून घेतला; पण सावरकरांच्या जीवनाशी निगडित याचा गर्भितार्थ जाणून घेण्याची जिज्ञासा त्यांच्या जीवनकार्याची सखोल माहिती घेण्यासाठी उद्युक्त करणारी होती.
मानवी मूलभूत प्रधान अधिकार म्हणजे त्याचे स्वातंत्र्य ही अनादि काळापासूनची सार्थ संकल्पना सावरकरांना स्वातंत्र्यसंग्राम सुरू करण्यास प्रेरक होती. या प्रेरणेला पोषक असणारे त्यांचे आदर्श होते छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळकांसारखे तत्कालीन राष्ट्रपुरुष! ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन‘ ही लहान वयातील सावरकरांची आपली कुलदेवता ’अष्टभुजा’ देवीसमोर घेतलेली प्रतिज्ञा, स्वातंत्र्यनिष्ठा जोपासताना मार्ग सापडेल तसे प्रचंड शक्तीनिशी प्रवाहित राहण्याचा त्यांचा बाणा शिवरायांचा त्यांच्यावरील प्रभावाचा प्रत्यय देतो. शिवरायांवर केवळ श्रद्धेने ओतप्रोत उत्कट आरती लिहून ते थांबले नाहीत, तर शिवरायांचे जीवनकार्य प्रत्यक्ष आचरण्याचा मार्ग अवलंबिला. लोकमान्य टिळकांच्या प्रखर विचार वक्तृत्वाने प्रभावित होऊन स्वातंत्र्यसंकल्प पूर्तीसाठी ‘मित्रमेळा‘, ‘अभिनव भारत’ या संघटना स्थापन केल्या. राष्ट्रप्रेमाने ओथंबलेली स्तोत्रे, गीते रचली. आपल्या अमोघ व गगनभेदी वक्तृत्वाने सशस्त्र क्रांतीसाठी जनजागृती व जनसंग्रह केला. शैक्षणिक जीवनातच स्वतःच्या आयुष्याचा अथवा कुटुंबीयांचा विचार न करता, मातृभूमीसाठी संपूर्णतः समर्पणाची भूमिका घेतली व शेवटपर्यंत ती जपली.
अगदी तरुण वयातील सावरकरांची राष्ट्रासाठीची आत्मियता, ज्वलंत विचार, ओघवती निर्भीड वक्तृत्व शैली, विदेशी कपड्यांच्या जाहीर होळीसारख्या क्रांतिकारक कृती, या असाधारण वैशिष्ट्यांमुळे ते अल्पावधीतच क्रांतिकारकांचे मेरुमणी झाले. सशस्त्र क्रांतीसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर धोरणी वृत्तीने सबल क्रांतीचे महत्त्व जाणून कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी सावरकर लंडनला गेले. हे शिक्षण घेतानाच अभ्यासू वृत्तीने ऐतिहासिक साहित्य निर्मिती व लढवय्या वृत्तीने शस्त्रास्त्रे निर्मिती या दोन्हीचा क्रांतीसाठी पूरक मेळ त्यांनी लंडनमध्ये घडवून आणला. ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हे ऐतिहासिक संशोधनपूर्ण लेखन व त्यांना आदर्श वाटणारे इटलीचे क्रांतीचे प्रणेते थोर विचारवंत व क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी चरित्राचे मराठी भाषांतरण सावरकरांनी लंडनमधील वास्तव्यात केले आणि या ग्रंथांनी स्वातंत्र्ययज्ञ धगधगत ठेवण्याचे कार्य केले. लंडनमध्ये सावरकर व इतर भारतीय राहत असलेल्या ’इंडिया हाऊस’मध्ये ’अभिनव भारत’चे क्रांतिपर्व सुरू झाले.
पुढे भारतातील धरपकड व दडपशाही, त्याचे लंडनमधील भारतीयांमध्ये उमटणारे पडसाद, त्यातूनच लंडनमध्ये कर्झन वायली व नाशिकमध्ये कलेक्टर जॅक्सन या दोघांचा वध, या वधांच्या आरोपात सावरकरांची अटक, खटल्यासाठी भारतात आणताना त्यांची जहाजातून भर समुद्रात मार्सेलिसची अत्यंत धाडसी उडी, पुन्हा कैद, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत न बसणारा दडपशाही खटला व अन्याय्य अशा दोन जन्मठेपेचा काळ्यापाण्याचा तुरुंगवास, हे सारे नाट्य घडले. ऐन तारुण्यात क्रांतिकार्य जोशात असतानाच सावरकरांना अंदमानात जेरबंद होऊन राहावे लागले.अंदमानातील कोलूसारख्या महाभयंकर शिक्षा, राजकीय कैदी असूनही अत्यंत अपमानास्पद वागणूक, प्रिय मातृभूमीपासून दूर असण्याचा जीवघेणा विरह, या सार्याचा सावरकरांच्या देहावर परिणाम होत असला, तरी राष्ट्रभक्ती जणू त्यांचा श्वास असल्याने त्यांची आत्मवृत्ती त्याही परिस्थितीत त्यांच्याकडून तुरुंगातील महत्त्वपूर्ण राष्ट्रहितपर कार्य व ‘कमला‘सारखे भावपूर्ण संवेदनशील अजरामर महाकाव्य रचना करून घेत होती.
अंदमानातील कैद्यांच्या परिस्थितीचे सावरकरांनी डोळस अवलोकन केले व या कैद्यांना राष्ट्रकार्याला जोडून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. कैद्यांच्या मनात मायभूमीसाठी प्रेम उत्पन्न करणे, इतिहासाची व जागतिक घडामोडींची त्यांना माहिती देणे, त्यांना साक्षर करून वाचनासाठी अनेक ग्रंथरुपी भारतीय साहित्य जेलरकरवी उपलब्ध करून देणे, कैदी असले तरी त्यांना माणूस म्हणून वागणूक मिळावी, यासाठी प्रयत्न करणे, त्यांच्यातील जातीभेद निर्मूलनासाठी प्रयत्न करून ऐक्य घडवून आणणे, मानवी मूल्यांविषयी त्यांचे प्रबोधन करणे, शिक्षामुक्त झाल्यानंतर देशकार्याला वाहून घेण्यासाठी त्यांची मानसिकता निर्माण करणे, अशा प्रकारचे कल्पनातीत थोर समाजकार्य सावरकरांनी आपल्या जन्मठेपेच्या काळातही केले.लोकमान्य टिळकांच्या देहावसानानंतर भारताचे राजकारण वेगाने बदलत असतानाच, हिंदू संघटित होण्याची आवश्यकता त्यांनी ओळखली व त्यासाठी अंदमानातून आपल्या अनुयायांना मार्गदर्शन सुरू केले. मोठ्या मुत्सद्देगिरीने ब्रिटिशांची अनेक बंधने मान्य करत त्यांनी अंदमानातून सुटका करून घेतली. मायभूसाठी कोणत्याही मार्गाने जे जे शक्य, ते ते शतप्रतिशत देण्याचे त्यांचे तत्व ही सुटका करून घेण्याचे कारण होते.
अंदमानातील सशर्त सुटकेनंतर सावरकरांना रत्नागिरीत स्थानबद्ध राहावे लागले. राजकीय सक्रियतेवर ब्रिटिशांची बंदी असल्याने स्थानबद्धतेत राहूनच त्यांनी राष्ट्रहितासाठी असामान्य सामाजिक योगदान दिले. हिंदू समाजाच्या अधःपतनाला कारणीभूत व हिंदू ऐक्याला बाधक जातीव्यवस्थेचे व विषमतेचे उच्चाटन करण्याचे कार्य त्यांनी बुद्धिवादाने केले. स्वतः सवर्ण असूनही कुणाच्या विरोधाची तमा न बाळगता अंधश्रद्धा, जातीयवाद यावर विज्ञाननिष्ठ टीका केली. अस्पृश्यांसाठी पाणवठे व मंदिरे खुली करणे, सर्वसमावेशक जातींची सहभोजने घडवून आणणे, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे, सामाजिक मूल्यांची जाणीव करून देणे, मानवतावादाचे महत्त्व पटवून देणे इत्यादी त्याकाळी खरोखरीच अभूतपूर्व असणारे असे सामाजिक कार्य त्यांनी केले. इथेही सावरकरांच्या व्यापक वैचारिक प्रभावानेच हे घडू शकले, याचा प्रत्यय येतो.
ब्रिटिशांनी सावरकरांवर लादलेली बंधने १९३७ नंतर शिथिल झाली व सावरकर पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. त्यांच्या अनुभवसिद्ध तर्काप्रमाणे हिंदू ऐक्याचे महत्त्व व कालानुरूप आवश्यकता त्यांनी हिंदू महासभेच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुरू केले. अथक परिश्रमांसह झंझावाती दौरे व मोठमोठ्या सभा घेऊन हिंदुत्वाची संकल्पना, ब्रिटिश लढ्याचे बदलते स्वरूप व त्याचे संभाव्य दुष्परिणाम, सैन्य भरतीचे महत्त्व, स्वातंत्र्योत्तर देशाच्या सीमा सुरक्षेसाठी सैन्यबळ व शस्त्रसज्जता इत्यादींचे महत्त्व, सामाजिक उन्नतीसाठी बुद्धिवादी सुधारणा, राष्ट्रीय हिताचे योग्य धोरण इत्यादी अनेक विषयांवर सावरकरांनी प्रखर प्रबोधन केले. तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थिती हिंदुत्ववादी का व कशी असावी, अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम काय असतील, याविषयी त्यांनी रोखठोक विश्लेषण केले.एवढी प्रचंड कारकिर्द असूनही सावरकरांना स्वकीयांकडूनच अतोनात तिरस्कार, अवहेलना, दोषारोप, अपमान, अन्याय सोसावा लागला, ही क्रूर शोकांतिका! पण, राष्ट्रहित समर्पणाच्या आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून ते अविरत लढत राहिले, झुंजत राहिले.
वि. दा. सावरकर नावाच्या या धुरंधर व्यक्तिमत्त्वाचे किती पैलू अभ्यासावेत? अढळ ध्येयवादी, स्वातंत्र्यनिष्ठ, ज्वलंत क्रांतिकारक, प्रखर बुद्धिवादी, विज्ञानवादी, संवेदनशील प्रतिभावान साहित्यकार, भाषाकार, समाजसुधारक, अथांग तत्ववादी, विचारवंत, निश्चल हिंदुत्ववादी आणि कितीतरी! सावरकरांच्या ठायी दृग्गोचर होणारे हे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व भारतवर्षात अनेक महापुरुषांच्या रूपाने अनादी कालापासून आढळते आणि अनंत कालापर्यंत याची प्रचिती येत राहणार आहे. असे व्यक्तिमत्त्व दुर्जनशक्तीकडून कितीही दडपण्याचा, नामोहरम करण्याचा प्रयत्न झाला तरी ती अवध्य राहतील, अजरामर असतील. म्हणूनच ‘अनादि मी...अनंत मी...अवध्य मी...’ ही पंक्ती जणू वीर सावरकरांच्या देदीप्यमान कारकिर्दीचे कवचमंत्र होय!सावरकरांनी समर्थ भारताचं आपलं स्वप्न साकारण्यासाठी वयाच्या १५व्या वर्षी प्रज्वलित केलेलं हे जीवनयज्ञ स्वतःच्या आयुष्याची समिधा देत, वयाच्या ८३व्या वर्षांपर्यंत म्हणजे जीवनाच्या अंतापर्यंत अनाकलनीय सामर्थ्यानिशी धगधगत ठेवले.
सावरकरांच्या जीवनकार्यासंबंधी हे सारे लिहिणे-वाचणे जितके दाहक त्याच्या कैकपटीने वास्तविक घटना, प्रसंग थरारक व रोमहर्षक असणार हे निश्चित! चालू भाषेत सांगायचं तर हा ‘ट्रेलर’ असेल, तर प्रत्यक्ष जीवनपट कसा होता, याची केवळ कल्पनाच सावरकरांविषयी अपार आदरभाव, वंदनभाव निर्माण करणारी आहे.पण, सावरकरांचा जीवनक्रम तर सर्वश्रुत आहे... मग मी पुन्हा तेच का लिहावं? कारण, सध्या समाजात अभ्यासू चिकित्सेच्या नावाखाली महापुरुषांच्या चारित्र्याची चिरफाड करण्याची विकृत मनोवृत्ती वाढत आहे. ज्यामुळे आजची पिढी संभ्रमित अवस्थेत नकारात्मकतेकडे वाटचाल करू लागली आहे. ही विकृत मनोवृत्ती सामाजिक स्वास्थ्य व समरसतेसाठी घातक तर आहेच, पण त्याचबरोबर भारताला लाभलेल्या महापुरुषांच्या गौरवशाली भव्य दिव्य वारशापासून, त्यांच्या अनुसरणीय सकारात्मक आकलनापासून आताच्या व येणार्या पिढीला वंचित करीत आहे. किमान सावरकरांच्या या संक्षिप्त जीवनपटातून त्यांच्या जीवनकार्याचा सद्विवेकी व सकारात्मक अभ्यास करण्यासाठी भारतीय समाजाने उद्युक्त व्हावे व ते पिढ्यान्पिढ्यांपर्यंत पोहोचवित राहावे. त्यातून आदर्श भारतीय घडावा, समर्थ भारत घडावा, ही अपेक्षा!
-कविता शेटे