ट्रान्सहार्बर लिंकचे नोव्हेंबरपर्यंत लोकार्पण !

फडणवीस शिंदेंकडून प्रकल्पाची संयुक्तपणे पाहणी

    25-May-2023
Total Views |
 


मुंबई : देशातील सर्वात मोठा सागरी सेतू असलेल्या मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा शिवडी न्हावा शेवा ट्रान्सहार्बर प्रकल्पचे नोव्हेंबर २०२३ पर्यंत लोकार्पण करून तो जनतेसाठी खुला करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
 
 
मुंबई आणि नवी मुंबईला अवघ्या २० मिनिटांत जोडणाऱ्या शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू प्रकल्पाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २४ मे रोजी पाहणी केली. यावेळी झालेल्या कामावर समाधान व्यक्त करत फडणवीस शिंदेंनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आणि जपान सरकारचे आभार मानले आहेत.
 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाची सुरुवात झाली होती. त्यांनी पाठपुरावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहकार्याने अनेक वर्षे रखडलेला हा प्रकल्प सुरू करून दाखवला होता. ज्याप्रमाणे समृद्धी महामार्गाची सुरुवात फडणवीस मुख्यमंत्री आणि मी नगरविकास मंत्री असताना त्याचप्रमाणे या कामाचीही सुरुवात फडणवीसांच्याच काळात झाली आणि आज ते काम पूर्णत्वास जात आहे हा योगायोग म्हणावा लागेल," असे शिंदेंनी यावेळी म्हटले. "या प्रकल्पामुळे पर्यावरणाला आणि फ्लेमिंगोला नुकसान होणार असल्याची आवई उठवणाऱ्यांना उत्तर मिळाले आहे. प्रकल्पाचे काम होऊनही फ्लेमिंगोच्या संख्येत कुठलीही घट न होता त्याग वाढच झाली आहे," असे शिंदेंनी यावेळी नमूद केले.
 
 
ट्रान्सहार्बर लिंक सागरी सेतूचे आदर्श मॉडेल - देवेंद्र फडणवीस
 
 
"आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा आहे. ट्रान्स हार्बर प्रकल्पाने आज निर्णयाक टप्पा गाठला असून २२ किलोमीटर लांबीच्या पुलाच्या लिंकेजचे काम आज पूर्ण झाले आहे. महाराष्ट्राच्या येत्या २० वर्षांच्या अर्थव्यवस्थेला या पुलामुळे चालना मिळणार असून हा ट्रान्सहार्बर लिंक सागरी सेतूचे आदर्श मॉडेल ठरेल यात शंका नाही," असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि प्रकल्पाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
ते म्हणाले की, "शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू प्रकल्प राज्याचे पुढचे गुंतवणूक केंद्र ठरणार असून इकॉनॉमीक कॉरिडॉर म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाईल. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रेलियन पर्यंत घेऊन जाण्याचा मार्ग याच सागरी सेतुवरून जाणार आहे. हा प्रकल्प होण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जात असून त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे आणि पर्यावरणाच्या रखडलेल्या दिल्यामुळे हा प्रकल्प होऊ शकला," या शब्दांत फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
 
 
सारथ्य फडणवीसांच्याच हाती !
 
दरम्यान, ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम स्थळापासून पुढील टप्पा बघण्यासाठी फडणवीस शिंदेंनी एकाच गाडीत बसून प्रवास केला. समृद्धी महामार्गाची पाहणी करताना फडणवीसांनी गाडीचे स्टेअरिंग हाती घेत नागपूर ते शिर्डी प्रवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत पूर्ण केला होता. त्याचीच पुनरावृत्ती यावेळीही झाली. प्रकल्पाची पुढील पाहणी करण्यासाठी ज्या गाडीत फडणवीस शिंदे निघाले त्याचे सारथ्य फडणवीसांनीच केले. त्यामुळे 'समृद्धी महामार्ग' असो किंवा ट्रान्स हार्बर लिंक गाडीचे आणि प्रकल्पाचे सारथ्य फडणवीसांच्याच हाती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.