पुण्यात लाकूड बाजारातील गोदामाला भीषण आग

    25-May-2023
Total Views |
Bhawani Peth Pune fire

पुणे
: पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या लाकूड बाजारातील (टिंबर मार्केट) एका गोदामाला पहाटे सव्वाचारच्या सुमारास आग लागली. बघता बघता ही आग पसरली आणि सात ते आठ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेत दुकानांचे आणि आसपास राहणार्‍या नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. संसार आणि व्यवसायाचा अक्षरश: कोळसा झाल्याचे विदारक दृश्य याठिकाणी दिसत होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे विझविण्यात यश आले.

भवानी पेठ परिसरात पुण्यातील सर्वात मोठा लाकूड बाजार आहे. याठिकाणी लाकडांची मोठ मोठी दुकाने आणि गोदामे आहेत. अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारातील रामोशी गेटजवळील एका गोदामाला पहाटे आग लागली. गोदामात सर्व लाकडी साहित्य असल्याने आग वेगाने पसरली. पाहता पाहता ही आग आसपासच्या दुकानांना जाऊन भिडली. पाहता पाहता आगीने विक्राळ स्वरुप प्राप्त केले. घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिका, पुणे कॅन्टोमेंट बोर्ड आणि पीएमआरडीएच्या एकूण अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर २० अधिकारी व जवळपास १०० जवान घटनास्थळी प्रत्यक्ष काम करीत होते.

पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला. या दुकानांशेजारील चार घरांनाही आगीने वेढले. घरातील सामान तिथेच सोडून नागरिक जीव वाचवित घराबाहेर पळाले. संसारोपयोगी साहित्य, पैसे, कपडे, महत्वाची कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी उपाययोजना करीत ही आग वस्तीमध्ये आणि शाळेमध्ये पसरु दिली नाही. धावपळ करीत युद्ध पातळीवर विविध घरांमधील दहा सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी हानी टळली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.