नऊ महिला जखमी : फुलगाव- तुळपूर रस्त्यावर घडला अपघात
23-May-2023
Total Views | 93
पुणे : अष्टविनायक दर्शनासाठी निघालेली बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने खड्ड्यात पडली. या अपघातात नऊ महिला जखमी झाल्या आहेत. फुलगाव-तुळापूर रस्त्यावर ही घटना घडली. दरम्यान, या जखमी महिलांना उपचारांसाठी घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचाही लोणीकंद जवळ अपघात झाला. लोणीकंद पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तुषार भानुदास डाके (वय 31, रा. खराडी ) असे बस चालकाचे नाव आहे, याप्रकरणी चित्रा प्रसाद खरे (वय 48, रा. शनिवार पेठ) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी खरे या त्यांच्या मैत्रीणींसह अष्टविनायक यात्रेसाठी जात होत्या. भरधाव वेगात असलेली त्यांची बस फुलगाव ते तुळापूर रस्त्यावर असताना चालकाचे नियंत्रण सुटले. ही बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली.
बसमधील नऊ महिला या अपघातात जखमी झाल्या. जखमी महिलांना उपचारांसाठी रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या रुग्णवाहिकेचा लोणीकंद परिसरात अपघात झाला. रुग्णवाहिका चालक विरण उदल चतुर्वेदी याच्यासह पाच महिलांना त्यामुळे किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.