नवी दिल्ली : तुम्ही आतापर्यत मेट्रो पुलावरून धावताना पाहिली असेल तसेच भूमिगत मेट्रोनेही प्रवास केला असेल. पण अंडरवॉटर मेट्रोबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले असेल.आता अशीच अंडरवॉटर मेट्रो कोलकाता येथे धावताना दिसणार आहे.देशात नदीत बांधलेल्या बोगद्यातून जाणारी ही पहिलीच अंडरवॉटर मेट्रो आहे. हा बोगदा हुगळी नदीखाली बांधण्यात आला आहे.हा बोगदा नदीच्या तळापासून १३ मीटर खाली आणि जमिनीच्या पातळीपासून ३३ मीटर खाली आहे.
मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक पी उदय कुमार रेड्डी यांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचे वर्णन केले आहे. पुढील सात महिने हावडा मैदान ते एस्प्लेनेडपर्यंत चाचणी केली जाईल, असेही ते म्हणाले. त्यानंतर ते लोकांसाठी सुरू केले जाईल. बोगदा पार करण्यासाठी सुमारे ४५ सेंकद लागतात. या मेट्रो मार्गावर चार स्थानके आहेत, ज्यात एस्प्लेनेड, महाकरण, हावडा आणि हावडा मैदान यांचा समावेश आहे. कोलकात्याच्या पूर्व-पश्चिम कॉरिडॉर अंतर्गत सुमारे ५२० मीटर लांबीचे बांधकाम करण्यात आले आहे. बोगदा पूर्वेकडील सॉल्ट लेक सेक्टर V ला व्यापतो आणि नदीच्या काठाने पश्चिमेला हावडा मैदानापर्यंत जातो.
योगायोग म्हणजे देशातील पहिली मेट्रो ही कोलकात्यातच सुरू झाली होती.याची सुरुवात १९८४ साली झाली. दुसरीकडे, जर आपण दिल्लीबद्दल बोललो तर येथे २००२ मध्ये सुरुवात झाली. दिल्लीतील मेट्रोचे जाळे सर्वात मोठे मानले जाते.