मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पवारांना राजीनामा मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात येत आहे. पक्षाचे सर्वच नेते राजीनामा मागे घ्या म्हणून शरद पवार यांना आग्रह धरत आहेत. यावेळी कार्यकर्ते व नेत्यांना अश्रु अनावर झाले. दरम्यान, जयंत पाटीलही शरद पवार यांच्या बाजूलाच बसले. पण त्यांना लगेच रडू फुटले. त्यांना बोलता येईना.
त्यानंतर मनाचा हिय्या करून जयंत पाटील बोलू लागले. पुन्हा हुंदका दाटून आला. त्याच रडवेल्या आवाजात त्यांनी साहेब निर्णय मागे घ्या. तुम्हाला जी भाकरी फिरवायची ती फिरवा. मीही काही बोलणार नाही. आम्ही सर्व राजीनामे देतो. आमच्या सर्वांचे राजीनामे घ्या. पण तुम्ही पक्षाच्या अध्यक्षपदावरून जाऊ नका. अध्यक्षपदी कायम राहा, असा आग्रह धरत जयंत पाटील थांबले. अश्रू थांबत नव्हते.