ठाणे कारागृहातील ऐतिहासिक द्वार देतेय स्वा. सावरकर यांच्या पराक्रमाची साक्ष

काळापाणी पाठवणीचा "खाडी दरवाजा"

    30-Mar-2023
Total Views |
 
संजय केळकर
 
 
ठाणे :ठाण्याला ऐतिहासिक वारसा असून येथील प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे म्हणजे या शहराचे मानबिंदू आहेत. यातीलच एक असलेले ठाणे मध्यवर्ती कारागृह आजही क्रांतीवीराच्या बलिदानाची साक्ष देत आहे. याच कारागृहात शिक्षा भोगत असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी अंदनामला पाठविण्यात आले. तो कारागृहातील ऐतिहासिक खाडी 'दरवाजा' स्वा.सावरकरांच्या पराक्रमाची 'साक्ष' देत आजही शाबुत आहे. कारागृहातील फाशी गेटपासून २०० फुटावर असलेले हे बंद द्वार खुले करून त्याचे स्मारकात रुपांतर करावे. यासाठी आ.संजय केळकर पाठपुरावा करीत आहेत.
 
ठाणे कारागृहात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना डांबण्यात आले होते. त्यातील इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा पुकारणारे राघोजीराव भांगरे यांना २ मे १८४८ रोजी फाशी देण्यात आली. नोव्हेंबर १८७९ ते जून १८८० या काळात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. १९०९ मध्ये स्वा. विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटिश न्यायालयाने काळ्या पाण्याची (अंदमान) शिक्षा ठोठावली होती. तेव्हा, अंदमानला पाठवण्याआधी सावरकरांना एक दिवस ठाण्याच्या कारागृहात ठेवण्यात आले होते.
 
येथून त्यांना बोटीने अंदमानला पाठविण्यात आले होते. त्यावेळी सावरकरांवरील अन्यायाच्या निषेधार्थ १९ वर्षीय अनंत लक्ष्मण कान्हेरे, २३ वर्षीय कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि २१ वर्षीय विनायक नारायण देशपांडे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध केला. या तीन क्रांतीकारकांना ११ एप्रिल १९१० रोजी ठाणे कारागृहात फाशी देण्यात आली. त्यांचे मृतदेहच काय पण त्यांची राख देखील त्यांच्या नातेवाईकांना मिळणार नाही, याची व्यवस्था ब्रिटिशांनी केली होती.
 
अशा या ठाणे कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर बंदिवान होते. त्यामुळे, पुरातत्व विभागाच्या परवानगीने आणि त्यांच्या देखरेखीखाली क्रांतीचा संपूर्ण इतिहास जागविला जाणार असून कळवा खाडीच्या दिशेला असलेल्या बुरुजाकडे कशाप्रकारे दरवाजा काढता येऊ शकेल, याचाही विचार केला जात असुन यासाठी आ. केळकर यांचा पाठपुरावा सुरू आहे.
 
 
अशोक स्तंभ,टाऊन हॉल नंतर आता कारागृह
 
ऐतिहासिक ठाणे शहरात आ.संजय केळकर यांच्या संकल्पनेतून याआधी कोर्टनाका येथील अशोक स्तंभ नव्या स्वरुपात उभा राहिला.तर प्रसिद्ध टाऊन हॉलनेही कात टाकली आहे. तर ठाणे कारागृहातील क्रांतिकारकांचा इतिहास जागवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत दरवर्षी एक कोटी या प्रमाणे दोन कोटींचा निधी या कामासाठी मिळणार असून सुरुवातीच्या कामासाठी आ. केळकर यांच्या आमदार निधीतून २५ लाखांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.कारागृहातील, वधस्तंभ म्हणजे फाशी गेट येथील लाकडी सामान,खटका आदीच्या मूळ स्वरुपास धक्का न लावता सुशोभिकरण करण्यात येणार आहे.तसेच येथील ३०० वर्षे पुरातन भिंतींची डागडुजीही पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. येथे डोम उभारून त्याखाली आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, स्वा. वि.दा.सावरकर यांच्यासह अनेक क्रांतिकारकांचा इतिहास साकारला जाणार असल्याचे आ.केळकर यांनी सांगितले.
 
 
'ठाणे' किल्ला बनला कारागृह
 
ठाणे मध्यवर्ती कारागृह ही २९३ वर्षापूर्वीचा एक ऐतिहासिक किल्ला आहे. १७३० मध्ये हा किल्ला पोर्तुजगीजांनी बांधला. मार्च १७३७ मध्ये मराठा साम्राजातील सरदार चिमाजी अप्पा यांनी हा 'ठाणे' किल्ला काबीज करून हा संपूर्ण परिसर पोर्तुगीजमुक्त केला. पुढे डिसेंबर १७४४ रोजी ब्रिटिशांनी हा किल्ला सर केला. याच किल्ल्यात १८१६ मध्ये पेशवाईचे कारभारी त्र्यंबकजी डेंगळे यांना बंदिवान करण्यात आले. परंतु त्यांनी ब्रिटीशांच्या हातावर तुरी दिली. बहुदा या किल्ल्यातील ते पहिले कैदी असावेत. त्यानंतर १८३३ मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्याची अंतर्गत रचना बदलून कारागृहात रूपांतर केले. १८४४ मध्ये जिल्हा न्यायाधीश कारागृहाची पाहणी करण्यासाठी आले असता, कैद्यांनी त्यांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर १८७६ मध्ये पुन्हा कारागृहाचा कायापालट करण्यात आला होता.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.