कॉलेजियम शिफारसींविषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!
19-Nov-2023
Total Views |
नवी दिल्ली : न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदलीसाठी कॉलेजियमने शिफारस केलेल्या नावांना मंजुरी देण्यास केंद्राकडून विलंब होत असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्या. सुधांशू धुलिया आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ७ नोव्हेंबर रोजी याचिकांवर सुनावणी करताना म्हटले होते की, उच्च न्यायव्यवस्थेत कॉलेजियमने शिफारस केलेल्या न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत केंद्राची वृत्ती समस्याप्रधान आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका उच्च न्यायालयातून दुसर्या उच्च न्यायालयात बदलीसाठी शिफारस केलेल्या नावांवर विलंब होत असल्याचीही चिंता व्यक्त केली होती. बदलीची प्रकरणे प्रलंबित असणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे कारण ती निवडकपणे करण्यात येतात, असेही न्यायालयाने म्हटले होते.
केंद्र सरकारतर्फे याप्रकरणी अॅटर्नी जनरल आर. वेंकटरामाणी हे युक्तीवाद करत आहेत. गतवेळी झालेल्या सुनावणीमध्ये हा मुद्दा केंद्र सरकारपुढे विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालय अथवा कॉलेजियमला केंद्र सरकारला न आवडणारा निर्णय घेण्यास भाग पाडू नका, अशीही टिप्पणी न्यायालयाने केली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.