‘झिम्मा’मधील इंदु म्हणजे माझी सासू, असं का? म्हणाला हेमंत ढोमे
18-Nov-2023
Total Views |
रसिका शिंदे-पॉल
मुंबई : 'झिम्मा' चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचे पात्र म्हणजे माझ्या सासूबाईंचे अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री उज्वला जोग यांचे असल्याचा खुलासा दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी केला. २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘झिम्मा २’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला. यावेळी हेमंत ढोमे यांनी ‘महाएमटीबी’शी संवाद साधताना झिम्मा चित्रपटाबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला.
‘झिम्मा’तील सुहास जोशी म्हणजे माझी सासू
‘झिम्मा; चित्रपटातील ७ बायका या माझ्या जीवनातील आजूबाजूच्याच स्त्रिया असल्याचेही हेमंत म्हणाले. “ ‘झिम्मा’ चित्रपटातील सुहास जोशी यांचे पात्र म्हणजे माझ्या सासुबाई आहेत. तर निर्मिती सावंत यांचे पात्र म्हणजे माझी आई आहे. त्यामुळे ‘झिम्मा’ चित्रपटातील प्रत्येक पात्राची निवड आधी केली आणि मग संवाद लिहिले गेले असे देखील हेमंत यांनी सांगितले.
झिम्माची कथा सुचल्याची खरी गोष्ट
“या चित्रपटाची कथा ज्यावेळी सुचली तो क्षण असा होता की, माझी सासू ज्येष्ठ अभिनेत्री उज्वला जोग या खुप फिरतात. विविध टुर कंपनीसोबत देश-परदेशात त्या फिरायला जात असतात. एकेदिवशी आम्ही घरी नाष्टा झाल्यावर मी त्यांना म्हणालो की चला मी कामाला निघतो. तर त्या मला म्हणाल्या की, माझं जरा काम आहे दादरला मला सोडशील का? मी विचारलं काय काम आहे? त्या म्हणाल्या काही दिवसांपुर्वी मी थायलंडला गेले होते, त्या सर्व आम्हा मैत्रिणींच आज रियुनियन आहे. ते ऐकल्यावर माझ्या डोक्यात विचार आला, जर ७ दिवस या बायका भेटल्यावर आयुष्यभराच्या घट्ट मैत्रिणी होऊ शकतात तर यात नक्कीच एक कथा आहे. आणि मग मी ‘झिम्मा १’ करायचं ठरवलं. आणि त्यांच रियुनियनमुळे ‘झिम्मा २’ बनवण्याचा देखील निर्णय घेतला”. तर असा झिम्मा चित्रपटाचे कथानक नेमके कसे सुचले याची कथा हेमंत यांनी सांगितली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.