नेतन्याहूंना खटला न चालवता गोळ्या घातल्या पाहिजे! काँग्रेस खासदाराचे बेताल वक्तव्य

    18-Nov-2023
Total Views |

Rajmohan Unnithan


तिरुवनंतपुरम :
गेल्या अनेक दिवसांपासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु असून आता याबाबत काँग्रेस खासदाराने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. केरळमधील काँग्रेस खासदार राजमोहन उन्नीथन यांनी हमास ही दहशतवादी संघटना नसून नेतन्याहूंना गोळ्या घातल्या पाहिजे, असे वक्तव्य केले आहे.
 
इस्त्रायल-हमास युद्धादरम्यान, केरळमधील कासारगोड येथे पॅलेस्टाईन आणि हमासच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये काँग्रेस खासदार राजमोहन उन्नीथन हेदेखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे एका युद्धाचे गुन्हेगार असल्याचे सांगत त्यांच्यावर कोणताही खटला न चालवता थेट गोळ्या घालण्याचे वक्तव्य केले.
 
ते म्हणाले की, हमास बंदुक हाती घेऊन केवळ आपल्या भूमीचे आणि तेथील लोकांचे रक्षण करत आहे. हमास हा दहशतवादी नाही. हमासला कोणी दहशतवादी म्हणत असेल तर त्याला कडाडून विरोध करावा लागतो, असे त्यांनी म्हटले. तसेच अमेरिकेचे उदाहरण देत जर हमास दहशतवादी असेल तर आपणही दहशतवादी आहोत, असेही ते म्हणाले.
 
पुढे ते म्हणाले की, आता न्युरेमबर्ग मॉडेलची चाचणी घेण्याची वेळ आली आहे. बेंजामिन नेतन्याहू हे युद्ध गुन्हेगार म्हणून जगासमोर उभे आहेत. नेतन्याहूंना कोणत्याही खटल्याविना थेट गोळ्या घालण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, गेल्या ४० दिवसांपासून सुरु असलेल्या इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.