ठाणे : ठाणे महापालिकेस भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून २५० द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बृहन्मुंबई म.न.पा मार्फत पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम दि.२० नोव्हे. ते ०२ डिसे. या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे, परिणामी या दरम्यान बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेस बृहन्मुंबई महापालिकामार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू होणार आहे. त्यामुळे कोपरी, हाजुरी, गावदेवी, पांचपाखाडी, टेकडीबंगला, किसननगर, भटवाडी या भागात झोनिंगद्वारे १० टक्के पाणी कपात लागू होणार आहे.
तसेच पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार असल्याने १० टक्के पाणी कमी उपलब्ध होणार असल्यामुळे ठाणे शहरातील दर पंधरा दिवसातून झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणी कपातीची वेळ वाढवून १२ तास ऐवजी २४ तास करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे. असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.