मुंबईतील रेल्वे स्थानके होणार चकाचक! मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

    17-Nov-2023
Total Views |
CM Eknath Shinde Railway Station Cleaning instructions

मुंबई :
मुंबई शहर व उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. दरम्यान, वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबई शहरातील स्वच्छता, प्रदूषण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांबाबत देखील चर्चा करण्यात आली.
 
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या वर्षा निवासस्थान येथील बैठकीत मुख्य सचिव मनोज सौनिक, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते. या बैठकीत मुंबईतील प्रमुख रस्ते, पदपथ, चौक याठिकाणी नियमित स्वच्छता झाली पाहिजे. त्यासाठी अधिकचे मनुष्यबळ देखील लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
शहर व परिसरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना सुचविल्या आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच, सुमारे १०८ स्थानकांच्या माध्यमातून लाखो मुंबईकर उपनगरीय रेल्वेतून दररोज प्रवास करीत असतात. प्रवाशांकडून रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांचा वापर होतो.
 
तसेच, ही स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत यासाठी आणि निरंतर त्यांची साफसफाई होत राहील याकरीता मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे निर्देश देतानाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा केली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.