सौर रुफटॉप योजनेत आलेले अर्ज प्रलंबित ठेवू नका, अन्यथा कारवाई करु : प्रसाद रेशमे

प्रलंबित अर्जांवर त्वरित कारवाई करून ग्राहकांना मीटर उपलब्ध करून देण्याचे निर्देश

    04-Aug-2022
Total Views |
रुफटॉप सौर ऊर्जा
 
 
 
मुंबई : सौर रुफटॉप योजने अंतर्गत आलेल्या अर्जांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून ग्राहकाला याचा लाभ घेता येईल असे नियोजन प्रत्येक उपविभागीय कार्यालयाने करावेत. या कामात हयगय करणाऱ्या एजन्सींवर, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी बुधवारी दि.०४ ऑगस्ट २०२२ रोजी भांडूप येथील रुफटॉप सौर ऊर्जाबाबत घेतलेल्या बैठकीत सांगितले.
 
 
महावितरणच्या छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत आहे. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होऊन तर नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाते. या योजनेची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी भांडूप परिमंडलातील ठाणे व वाशी मंडळातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, टोरंट पॉवरचे अधिकारी तसेच या योजनासाठी नेमलेली एजन्सीच्या प्रतिनिधीं सोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्य अभियंता, भांडूप परिमंडल मुख्यालयाचे मुख्य अभियंता धनंजय औढेंकर सोबत भांडूप परिमंडलाच्या अधीक्षक अभियंता चंद्रमणी मिश्रा, पायाभूत आराखडा शुभांगी कटकधोंड, वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने, ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले व इतर कर्मचारी उपस्थित होते.
 
 
 
यावेळी बोलताना ते म्हणाले की, या योजनेचा लाभ घेऊन ग्राहक पर्यावरण संरक्षणात हातभार लाऊ शकतो. त्याचबरोबर ग्राहकाला वीज बिलसुद्धा कमी येते. ज्यामुळे, रोहित्रावरचा ताण कमी होऊ शकते. ही योजना सगळ्यांसाठी फायद्याची असून या योजनेला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येक मंडळ, विभागीय, उपविभागीय कार्यालय तसेच एजन्सीने भरपूर प्रयत्न करावेत. हाऊसिंग सोसायटीस व अशा इतर ठिकाणी कँम्प घेऊन सदर योजने बाबत सविस्तर माहिती ग्राहकांना द्यावीत. याशिवाय, झोपडपट्टी असलेल्या भागात जनजागृती केल्यास वीज बिल कमी येऊन याचा फायदा तेथील ग्राहकांना सुद्धा होऊ शकतो.
 
 
या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्त सहाय्य देण्यात येणार आहे. रुफटॉप सौर योजनेमधून घरगुती ग्राहकांसाठी अटी व शर्तीसह १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येते. तसेच सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था  व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळणार आहे.
 
 
महावितरण रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी १ किलोवॅट– ४६,८२०, १ ते २ किलोवॅट- ४२,४७०, २ ते ३ किलोवॅट- ४१,३८०, ३ ते १० किलोवॅट- ४०,२९० तसेच १० ते १०० किलोवॅटसाठी ३७,०२० रुपये प्रति किलोवॅट किंमत आहे. उदा. या दराप्रमाणे ३ किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची १ लाख २४ हजार १४० रुपये किंमत राहील. त्यामध्ये ४० टक्के अनुदानाप्रमाणे ४९ हजार ६५६ रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल व संबंधीत ग्राहकास प्रत्यक्षात ७४ हजार ४८४ रुपयांचा खर्च करावा लागेल.
 
 
रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे ५५० रुपयांची बचत होऊ शकेल. तसेच या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रति युनिट प्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही आर्थिक फायदा संबंधीत घरगुती ग्राहकांना होणार आहे. सोबतच सौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः ३ ते ५ वर्षात परतफेड होणार आहे. दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनी रुफटॉप सौर ऊर्जा योजनेत सहभागी होऊन पैशांची बचत करावी, असे आवाहन महावितरणच्या भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औढेंकर यांनी केले आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.