औरंगजेबाच्या वारसांचे काय?

    दिनांक  14-May-2022 11:10:53
|


Owaisi - Sanjay Raut
 

आपण या देशाचे राज्यकर्ते होतो आणि ब्रिटिशांनी हा देश आपल्या ताब्यातून घेतला आहे, त्यामुळे आपणच त्याच्यावर राज्य करण्याच्या लायकीचे आहोत, अशी ही विकृत मानसिकता आहे. झाकीर नाईक वगैरे सारखे धर्मांध ही भावना जोपासायला मदत करतात आणि संजय राऊतांसारखे बिनबुडाचे लोक त्यातून आपल्या राजकीय पोळ्या भाजत राहातात.
 
 
 
महाराष्ट्र ही देशाला सामाजिक, राजकीय दिशा दाखविणारी भूमी. भारताच्या राजकीय वाटचालीची सुरुवात ही महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांच्या माध्यमातूनच झाली. जेव्हा अशी पार्श्वभूमी एखाद्या राज्याला असते, तेव्हा तिथे उपटसूंभ असण्याची शक्यताही तेवढीच असते. दोन बांडगुळांनी गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात जे उद्योग केले आहेत, त्यांचा समाचार घेणे आवश्यक आहे. एक म्हणजे, ओवेसी बंधूंपैकी धाकटे ओवेसी आणि दुसरे चाय-बिस्कुट पत्रकारांच्या जीवावर ‘नेते’ म्हणून वावरणारे संजय राऊत. ‘एमआयएम’ या रझाकारी पक्षाचे नेते म्हणून अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबादला पोहोचले. त्यांनी तिथे जे ओकायचे ते ओकले आणि जाताना आलमगीर औरंगजेबाच्या मजारीवर आपले डोकेही घासले. औरंगजेबाचा महाराष्ट्राशी काय संबंध, यावर आता वेगळे लिहिण्याची गरज नाही. इतिहासकारांनी त्यावर खूप लिहिले आहे. मराठ्यांना आणि पर्यायाने महाराष्ट्राला संपवायला आलेला हा बुतशिकन महाराष्ट्राच्या मातीतच कायमचा थंडावला. त्यातच ओवेसी म्हणजे कोणी राष्ट्रप्रमुख असल्याच्या दिमाखात त्याची मिरवणूक निघाली होती. शिवसेनेने औरंगाबादेत जी खाबुगिरी गेली अनेक वर्षे केली, त्यातून या मंडळींची ताकद वाढली. आता ही मंडळी महाराष्ट्राच्या छाताडावर औरंगजेबाचे ताबूत नाचविण्याचे उद्योग करीत आहेत. एका अर्थाने असे होते ते बरेच असते. हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या बाता करणार्‍या लोकांचे बुरखेदेखील अशा वेळीच फाटतात. हिंदूंना काय वाटेल याची परवा न करता असले धंदे करणार्‍यांवर कोरडे ओढावे असे त्यांना वाटत नाही. मग ते हिंदूंपेक्षा मुस्लिमांच्याच मागासलेपणाची चर्चा करतात. ही चर्चा चर्चेपुरतीच असते. त्यातून सुधारणांचे मार्ग काही निघत नाहीत. त्याचे स्पष्ट कारण म्हणजे, या सुधारणा झाल्या, तर जी एक गठ्ठा मते मुस्लिमांना हिंदूंचा बागुलबुवा दाखवून मिळतात, ती मिळणार नाहीत. नव्याने बाटलेल्या शिवसेनेची मदारही आता अशाच बाटीव मतांवर आहे. त्यामुळे या असल्या वादग्रस्त विषयांवर चर्चा नको, अशी बुळचट भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे.
 
 
 
वादग्रस्त विषयावर संजय राऊत यांनी बोलावे म्हणजे जरा अतीच! रोज सकाळी ९ वाजता आपला बाजा वाजवून आणि चाय-बिस्कुट पत्रकारांना दिवसभराचा मजकूर पुरवून हे महाशय पवार साहेबांची ख्यालीखुशाली घ्यायला बाहेर पडतात. कोणाची रोजीरोटी कशावर चालेल, याचा काही नेम नाही. हे बरळू रोज बरळतात. पण, काशीच्या ज्ञानवापी मशिदीबाबत त्यांनी हा जो काही समंजसपणाचा राग आळवला आहे, त्याची लक्तरे काढलीच पाहिजेत. ज्ञानवापी मशिदीची जुनी चित्रे पाहिली तरी ते घुमट मंदिरांच्या ढाचावर उभे असलेले दिसतात. कुणाला ते इस्लामी आक्रमकांच्या अडाणीपणाचे लक्षण वाटेल किंवा अर्धवट टाकलेले काम. पण, वस्तुस्थिती तशी नाही. भारतभरातल्या समृद्ध राज्यांमध्ये अशा प्रकारच्या तोडफोडी केल्या गेल्या. मंदिरे, लेणी या हिंदूंना प्रेरणा देणार्‍या वास्तू. त्यातून प्रेरणा घेऊन हिंदू लढायला पुन्हा उभे राहातात. मात्र, अशा वास्तू अर्धवट ठेवल्या की, त्यांना त्यांच्या पराभवाची आठवण करून देता येते. जमले तर त्यांच्यावर जरबही बसवता येते. दुर्दैवाने, मुस्लिमांमधल्या एका मोठ्या गटाला या सगळ्याचा अभिमान वाटतो. आपण या देशाचे राज्यकर्ते होतो आणि ब्रिटिशांनी हा देश आपल्या ताब्यातून घेतला आहे, त्यामुळे आपणच त्याच्यावर राज्य करण्याच्या लायकीचे आहोत, अशी ही विकृत मानसिकता आहे. झाकीर नाईक वगैरे सारखे धर्मांध ही भावना जोपासायला मदत करतात आणि संजय राऊतांसारखे बिनबुडाचे लोक त्यातून आपल्या राजकीय पोळ्या भाजत राहातात.
 
 
 
पण, बहुदा हे त्या पिढीतले शेवटचे लोक असावेत. कारण, आता या देशातल्या हिंदूंना जो आत्मविश्वास मिळाला आहे, त्याच्या आधारावर ते आपल्या लढाया लढतील. अयोध्येचा लढा न्यायालयीन चौकटीत लढून जिंकल्यानंतर हिंदूंना आता त्यांच्या अन्य मंदिरांबाबत न्यायमंदिरात न्याय मिळण्याची आस आहे. देशभरात अशा प्रकारे हिंदू न्यायदेवतेसमोर न्यायासाठी गजर करीत आहेत. हिंसक ताबूत नाचविण्यापेक्षा किंवा दंगली घडवून आणण्यापेक्षा हे अधिक राज्यघटनासुसंगत आहे. देशाचे नागरिक म्हणून तो त्यांचा अधिकारही आहे. त्यामुळे हे समंजसपणाचे डोस संजय राऊतांनी आपल्या मित्रपक्षांना द्यावे. श्रीलंकेचे उदाहरण देऊन देशात अराजक माजण्याची भीती हिंदूंना दाखवू नये. श्रीलंकेतल्या ज्या राज्यकर्त्यांना बदडून काढले जात आहे, ती वेळ त्यांच्यावर घराणेशाही देशावर लादल्यामुळेच उद्भवली. घराण्यातल्या निर्बुद्धांसाठी तुम्ही कितीही राबलात तरी त्यांच्या बुद्धीत काही वाढ होणार नाही. मुंबई महानगरपालिकेतला आपला व्यवहार पाहिला, तर रस्त्यावर धरून बदडण्याची वेळही जवळ आली आहे. निवडणुका टाळून तुम्ही ती वेळ टाळत आहात, पण हे अटळ आहे. पुन्हा राहिला मुद्दा हिंदूंच्या मानभंगाचा, तर तो आता तुमच्याकडून होणार नाही. न्यायालयेही ज्याप्रकारे हिंदूंच्या भावनांची कदर राखूब खटले चालवित आहेत, त्याला हिंदूंचा इतक्या वर्षांचा संघर्ष कारणीभूत आहे. अयोध्येच्या वादग्रस्त वास्तूच्या खाली काय होते, हे पुरातत्व विभागापासून ते इतिहास अभ्यासकांपर्यंत सगळ्यांनाच माहीत होते. मात्र, हिंदूंना न्याय दिल्यानंतर धर्मांध देशभरात काय नंगानाच करतील, याची भीती आधीच्या राज्यकर्त्यांना वाटायची. मोदी आले आणि त्यांनी या भयगंडातून देशाला बाहेर काढले. एकाही धर्मांधाला यामुळे रस्त्यावर उतरून तमाशा करण्याचे धाडस झाले नाही. हा केवळ आणि केवळ हिंदू जनमानसाच्या समूहशक्तीचा विजय होता. त्यात तुमच्यासारखे टाळूवरचे लोणी खाऊन श्रेय लाटायला आलेले हिंदूही आहेतच. देशात अराजक वगैरे मोदी, शाह व योगींसारख्यांना चांगलेच कळते. मदरशांमध्ये राष्ट्रगीत गाण्याची सक्ती ही त्यातून आली आहे; अन्यथा या देशात मदरशातून काय बाहेर पडते, हे आपण काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पाहिलेलेच आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.