Kantara Movie Review : ...यासाठी "कांतारा" आवर्जून पाहावा
17-Oct-2022
Total Views | 913
11
ऋषभ शेट्टी हे नाव अनेकांसाठी आजपर्यंत अपरिचित होत. मात्र काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' (Kantara) या चित्रपटानंतर तरी हे नाव सर्वांच्या ओठांवर खेळताना दिसत आहे. बरं पण कांतारा हा चित्रपट तरी नक्की काय आहे? अनेकांना हा प्रश्न पडला आहे. जर तुम्हाला बरोबर चार वर्षांपूर्वी १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेला 'तुंबाड' आठवत असेल तर त्यातील 'हस्तर' देखील नक्कीच आठवत असेल. पण कांतारा आणि तुंबाडचा काय संबंध, असं अनेकांना वाटेल. त्याच मुख्य कारण म्हणजे ज्याप्रमाणे 'तुंबाड' चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी झाली होती तसेच काहीस आज 'कांतारा' चित्रपटासोबतही घडताना दिसत आहे. आज नेटकऱ्यांनी देखील 'तुंबाड' आणि 'कांतारा' या दोन चित्रपटांची तुलना करण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. मात्र याच नेमकं कारण काय हे हा चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच कळेल.
साऊथच्या अनेक स्टार्स 'कांतारा' चित्रपटाची प्रशंसा करताना दिसत आहे. मात्र या चित्रपटात असे काय आहे हे याची थोडी झलक पाहायची असेल तर प्रथम या चित्रपटाचा ट्रेलर पाहावा. अगदी अंगावर शहारा येईल असा हा ट्रेलर. ट्रेलरमध्ये दिसणारी भारतीय परंपरा, भय, त्यातच ऍक्शन, सिनेमॅटोग्राफी, सिनेमात वापरण्यात आलेले विविध रंग आणि त्याला लाभलेले संगीत आणि या सर्वांत कलाकारांच्या अभिनयाची दिसणारी झलक या ट्रेलरमध्ये पाहिल्यानंतर "हा चित्रपट पाहायला गेलं पाहिजे", हे उद्गार तोंडातून निघाल्याशिवाय राहत नाही.
खरं तर ट्रेलर पाहताना अनेकदा आपणही गोंधळून गेल्याशिवाय राहत नाही. कारण नक्की चित्रपट भयपट आहे की सस्पेन्स आहे, कि अजून काही यांचा अंदाज आपणच मनात बांधण्यास सुरवात करतो. चित्रपटाच्या कथानकाविषयी विचार केला तर, "चित्रपटाची खरी कथा ही भागवतपुराणापासून सुरु होते. कारण चित्रपटात दाखवण्यात आलेली कथा ही एका ग्रामदैवताभोवती फिरते. आता या ग्रामदैवतेचा आणि भागवतपुराणाचा काय संबंध? तर जस की आपल्याला माहिती आहे, हिंदू धर्मात भगवान विष्णूला या सृष्टीचे पालनकर्ता मानले जाते. अनेकदा धर्माच्या रक्षणासाठी विष्णू देवांनी सतयुग ते कलियुगात घेतलेले अवतार हे 'दशावतार' म्हणून प्रसिद्ध असल्याचे भागवतपुराणामध्येही लिहिले आहे. या दशावतारांमधीलच एक अवतार म्हणजे 'वराह' अवतार. ही देवता चित्रपटात कर्नाटकच्या किनारपट्टी भागातील वन आणि आदिवासी गावकऱ्यांची देवता दाखवली आहे. ही देवता हजारो वर्षं या गावाची रक्षा करत आहे.
काही अनुसूचित जाती जमातीमधील लोकांकडून या ग्रामदैवताची सेवा करण्यात येते त्या उत्सवाला ‘कोला’ म्हणतात. या उत्सवामध्ये ग्रामदैवताची सेवा करणारी व्यक्ती एक विशिष्ट प्रकारची वेशभूषा करून नृत्य सादर करते. तसेच त्यादरम्यान काही काळ त्या व्यक्तीमध्ये देवाचा वास असतो. गावकऱ्यांकडूनही ही परंपरा अतिशय श्रद्धेने पाळण्यात येते. त्याचप्रमाणे गावाच्या जमिनीवर वनविभाग आणि जमीनदार या दोघांचाही डोळा असल्याचेही आपल्याला जाणवते. ग्रामदैवताची सेवा करणारे गावकरी, वनविभाग आणि जमीनदार या तीन गोष्टींना केंद्रस्थानी ठेवत लेखकाने अगदी उत्कृष्टरित्या ही कथा बांधली आहे. तसेच या कथेला लोककलेची जोड मिळाल्याने हा चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर गेला आहे.
ही प्रथा नक्की कुठून सुरु झाली किंवा त्यामागील पारंपरिक कथेविषयी जर विचार केला तर, "प्रचीन काळात एका राजाने सुख शांतीच्या शोधात देवदेवतांशी एक वचन करार केलेला असतो. या करारानुसार राजाच्या राज्यात असलेल्या जंगल, वनांची जमीन ही तेथे राहणाऱ्या आदिवासी गावकऱ्यांना देण्यात आलेली असते. राज्याच्या या वचनाचं पालन त्या राजाची पुढील पिढी आणि त्या गावातील आदिवासी लोकं करताना पाहायला मिळतं," अशीही पारंपरिक कथा चित्रपटात जलद गतीने दाखवण्यात आली आहे.
मध्यांतरापर्यंत चित्रपट अगदी संथ गतीने जातो. मात्र चित्रपटात दाखवण्यात आलेले हॉरर प्रसंग, पार्श्वसंगीत, 'कोला' नृत्यप्रकार या सर्वांमुळे चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढते. एवढंच काय तर सुरवातीला दाखवण्यात आलेली म्हशींची शर्यत पाहताना सिनेमॅटोग्राफरची जादू आपल्या डोळ्यांचे पारणे फेडते. मध्यंतरानंतर चित्रपट जो वेग घेतो तो अगदी शेवटपर्यंत. कर्नाटकातील या लोककलेविषयी किंवा त्यांच्या परंपरेविषयी जरी आपल्याला काही माहिती नसलं तरी आपण सहज या कथेत गुंतून जातो आणि याचं संपूर्ण श्रेय हे या चित्रपटाच्या लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टी यांना जातं.
चित्रपट पाहत असताना चित्रपटाची कथा, पटकथा कोठेही भरकटल्याचे जाणवत नाही. चित्रपटाची कथा ही जरी काहीशी गंभीर असली तरी संपूर्ण चित्रपट अगदीच गंभीर होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रोमान्स, नाट्य, विनोद, थरार या सगळ्या गोष्टींची सांगड योग्य प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. कर्नाटकचं निसर्गरम्य चित्रण, तेथील लोकांना मिळालेले निसर्गाचे वरदान, तेथील लोकांच्या प्रथा - परंपरा या सर्व गोष्टींचे अचूक भान राखून हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे.
या चित्रपटाचं संगीत - पार्श्वसंगीत म्हणजे या चित्रपटाचा गाभा आहे. चित्रपटाचा प्रत्येक सिक्वेन्ससाठी अगदी बारकाईने संगीत पेरण्यात आल्याचे चित्रपट पाहताना प्रकर्षाने जाणवते. यासर्व गोष्टींना साथ लाभलीये ती चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाची. या चित्रपटातील मुख्य दुवा म्हणजे 'शिवा' ही प्रमुख भूमिका साकारणारा रिषभ शेट्टी. चित्रपटातील रोमान्स, ड्रामा, असे सर्व पैलू रिषभने प्रभावीपणे मांडल्या आहेत. चित्रपटात ऋषभला साथ लाभली आहे ती सप्थमि गौडा या अभिनेत्रीची. आपल्या खऱ्या आयुष्यापेक्षा एक वेगळी व्यक्तिरेखा सप्थमि गौडाने योग्यरित्या साकारली आहे. चित्रपटातील राजाची पुढील पिढी म्हणजेच जमीनदाराची भूमिका साकारणारे अभिनेते अच्युत कुमार देखील आपल्या समोर लालसा असलेला जमीनदार उभा करण्यात यशस्वी झाले असे आपण नक्कीच म्हणू शकतो. चित्रपटात मध्यात शासकीय वन विभागाचे वन अधिकारी मुरलीधर म्हणजेच अभिनेते किशोर यांची एन्ट्री होते. अभिनेते किशोर यांना पहिल्यानंतर हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉनसनचा भास आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही.
चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाची शेवटची २० मिनिटं. ही शेवटची २० मिनिटं अक्षरशः सुन्न करणारी आहेत. त्या २० मिनिटांमध्ये आपल्या समोर जी नाट्य घडतात, त्यामागील पार्श्वभूमी आणि त्यातील प्रत्येक कलाकाराचा अभिनय पाहून आपण थक्क होतो. खासकरून त्या २० मिनिटात रिषभ शेट्टीने साकारलेले शिवा या पात्राचा एक वेगळाच पैलू आपल्याला पाहायला मिळतो. तसेच त्यामागील रिषभची मेहनत देखील आपल्यला पडद्यावर दिसते. मुळातच ‘शिवा’चा भूतकाळ आणि त्यादिशेने त्याचा होणारा प्रवास आपल्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही.
चित्रपट पाहताना काहीवेळा आपल्याला 'तुंबाड' चित्रपटाची आठवण येते. मानवाचा हव्यास आणि निसर्गाशी असणारा संघर्ष हा अशा चित्रपटांतून एक वेगळाच धडा शिकवून जातो. आत्तापर्यंत सिनेमाने १०० कोटींची कमाई केली असून हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला IMDb वरदेखील ९.४ रेटिंग मिळाले आहे. खरं सांगायचं तर काहींना हा चित्रपट अजिबात आवडणार देखील नाही. मात्र त्यांना आवडावा म्हणून हा चित्रपट नक्कीच बनवला गेलेला नाही. कर्नाटकातील प्राचीन परंपरेला अभिमानाने जगासमोर मांडायचं आणि त्यामाध्यमातून सर्वसमावेशक अशी कथा मांडत लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करण्यास लावणारा हा चित्रपट एकदातरी प्रत्येकाने आवर्जून जाऊन चित्रपटगृहात बघावा.