‘सायबर’ गुन्ह्यांपासून बचावासाठी ‘सायबर सेफ’ संस्कृती जपा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2022
Total Views |

Adv.Prashant-Mali
 
 
 
ठाणे : “तंत्रज्ञानाचे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. त्यामुळे ‘सायबर’ गुन्हे हे होतच राहतील. त्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवणे एवढेच सध्या आपण करू शकतो. आपले घर आणि पर्यायाने समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला घरात ‘सायबर सेफ’ संस्कृती जपावी लागेल,” असा सल्ला ‘सायबर’तज्ज्ञ अ‍ॅड. प्रशांत माळी यांनी बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी दिला. ‘सरस्वती सेकंडरी स्कूल’च्या सभागृहात सुरू असलेल्या ३६व्या ’रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाले’त चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ‘महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशन’चे अध्यक्ष अ‍ॅड. गजानन चव्हाण आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा ठाणे शहराचे आमदार संजय केळकर उपस्थित होते.
 
 
 
अ‍ॅड. माळी यांनी त्यांच्या व्याख्यानात मोबाईल तंत्रज्ञानावर आधारित गुन्हे आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या आधार घेऊन होत असलेल्या आर्थिक फसवणुकीचा उहापोह करून सावध राहाण्याचा सल्ला दिला. विशेषतः पालकांनी मोबाईल आणि इंटरनेट वापरणार्‍या आपल्या लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या. ‘मॅट्रीमॉनिअल’ गुन्ह्यात हल्ली उच्चशिक्षित तरुण-तरुणीही बनावट प्रोफाईलला भुलून बळी पडत आहेत. ‘क्रिप्टोकरन्सी’ आपल्या देशात बेकायदेशीर असूनही यात गुंतवणूक करून अनेकवेळा फसगत झाल्याची उदाहरणे आहेत. ‘सायबर’ गुन्हे रोखण्यासाठी कायदे झाले आहेत. पण, त्याची परिपूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी आणखी बराच काळ जाणार आहे. यामागे कलमांची कमतरता, जनजागृतीचा आणि अभ्यासाचा अभाव या गोष्टी कारणीभूत असू शकतात, असेही माळी यांनी स्पष्ट केले.
 
 
 
सध्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झालेले व्हॉट्सअ‍ॅप ‘क्राईम हब’ बनलाय. हल्ली मुले सतत मोबाईलवर असतात. त्यामुळे पालकांनी त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. ‘ऑनलाईन गेमिंग’ हे कोवळ्या पिढीला लागलेले महाभयंकर व्यसन आहे. त्यातून मुलांचे आयुष्य धोक्यात येत आहे. मोबाईलवरील बँकेचे अ‍ॅप शक्यतो ‘लॉक’ असावेत. मोबाईल, जी-मेल, फेसबुक यांचे पासवर्ड नियमितपणे पूर्ण बदलावेत. प्रवास करताना वादग्रस्त माहिती, व्हिडिओ, चॅट ‘डिलीट’ करावेत, किंबहुना या कामासाठी एक दिवस उपलब्ध करून ठेवा. ‘गुगल’चा मार्गदर्शक म्हणून नक्की वापर करा. ‘फेक स्कीम’चा शोध घेऊन त्यापासून सुरक्षित राहू शकता. त्या स्कीमचे नाव आणि ‘स्पेस’ देऊन ‘फ्रॉड’ असे टाईप केले की, ‘गुगल’मार्फत तपास सुरू होऊन त्याची माहिती मिळू शकते. न मिळाल्यास पुन्हा चार-पाच दिवसांनी असा प्रयत्न करावा. ‘टेक्नोसेव्ही’ व्हा, पण पूर्णपणे त्यावर अवलंबून राहू नका, अशा अनेक सूचना माळी यांनी केल्या.
 
 
@@AUTHORINFO_V1@@