कॉम्रेड ते काँग्रेसी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2021   
Total Views |vedh fin_1  H x

बिहारच्या ‘सीपीआय’मधील पक्षांतर्गत निर्णय, स्थानिक नेमणुका यामध्येही डाव्या कन्हैयाला चक्क डावलेले गेले. त्याचाच परिपाक म्हणजे गांधी घराण्यासमोर आपली मान तुकवून कॉम्रेड कन्हैया काँग्रेसी झाला!

२०१६ साली दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दहशतवादी अफझल गुरूच्या फाशीसाठी आसवे गाळणारी ‘तुकडे तुकडे गँग’ एकाएकी चर्चेत आली. ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’, ‘अफझल हम शरमिंदा हैं’, ‘हमे चाहिए आझादी’ यांसारख्या देशद्रोही घोषणांमुळे अख्ख्या देशभरात संतापाची लाट उसळली आणि याच देशविघातक टोळीचा म्होरक्या होता ‘जेएनयु’च्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार.डावी विचारसरणी अंगात भिनलेल्या कन्हैयाची अटक, जामीन, त्यानंतरचे त्याचे भाजप, संघ, मोदींविषयीचे द्वेषपूर्ण विचार, यामुळे म्हातारलेल्या कम्युनिस्ट पक्षाचा तरणाताठा कन्हैया रातोरात ‘स्टार कॉॅम्रेड’ ठरला. कन्हैयाच्या रूपाने खिसगणतीतही नसलेल्या डाव्यांना पुनश्च दिल्लीच्या सत्तेचीही स्वप्नं पडू लागली. कम्युनिस्ट पक्षाला हवा होता तसा कॉम्रेडी, आक्रमक भाषेत गरळ ओकणार्‍या या विद्यार्थी नेत्याची मग देशभर बरात निघाली. कम्युनिस्ट पक्षात अधिकाधिक तरुणांनी प्रवेश घ्यावा म्हणून कन्हैयाचा चेहराही पुढे केला गेला. परिणामी, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मूळचा बिहारचाच असलेला कन्हैया बेगुसराय मतदारसंघातून तत्कालीन मंत्री गिरीराज सिंह यांच्याविरोधात दंड थोपटून उभा राहिला खरा. परंतु, आपल्या मायभूमीतच तब्बल चार लाख मतांनी सिंह यांनी कन्हैयाला धूळ चारत त्याच्यासह कम्युनिस्ट पक्षालाही त्यांची जागा दाखवून दिली. हा पराभव कन्हैयाच्या जिव्हारी तर लागलाच; पण त्याचे पक्षातील स्थानही डळमळीत झाले. बिहारच्या ‘सीपीआय’मधील पक्षांतर्गत निर्णय, स्थानिक नेमणुका यामध्येही डाव्या कन्हैयाला चक्क डावलेले गेले. त्याचाच परिपाक म्हणजे गांधी घराण्यासमोर आपली मान तुकवून कॉम्रेड कन्हैया काँग्रेसी झाला! काँग्रेस पक्षप्रवेशादरम्यान या पक्षाचा इतिहास, संस्कृती, परंपरा यांचेही त्याने अपेक्षेप्रमाणे गोडवे गायले. “बुडत्या जहाजाला वाचवण्यासाठी एकत्र यावेच लागेल,” असे एक विधानही कन्हैयाने यावेळी केले. त्यामुळे एकीकडे काँग्रेसला त्यांच्या बुडत्या जहाजाला हातभार लावणारे असे तरुण हवेच आहेत आणि कन्हैयासारख्यांनाही ‘सीपीआय’चे अंधारलेले भवितव्य ध्यानी घेता, आपल्या राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसरूपी नेतृत्वहीन जहाजावर स्वार होण्याचा निर्णय घेतला. पण, ‘वर्गसंघर्ष’, ‘व्हीआयपी कल्चरचा विरोध’, ‘सर्वहारा’ वगैरे मार्क्सवादी भाषणं झाडणार्‍या कन्हैयाला गांधीवादी काँग्रेसी ‘हायकमांड कल्चर’ किती मानवते, ते येणारा काळच ठरवेल!

बुडत्याला काडीचा आधार!

हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी आणि कन्हैया कुमार यांसारख्या अल्पावधीत आपल्या आंदोलनांनी स्वप्रभावाची आभासनिर्मिती करणार्‍या; पण वर्तमानात मात्र प्रभावहीन ठरलेल्या मंडळींचा काँग्रेसप्रवेश म्हणजे बुडत्याला काडीचा आधारच म्हणावा लागेल. एकीकडे जुनेजाणते नेते काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत असताना आणि दुसरीकडे पंजाबमधील धुसफूस दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने कन्हैयाच्या पक्षप्रवेशाचे ‘टायमिंग’ साधून पक्षप्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला. परंतु, पंजाब काँग्रेसमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असतानाही राहुल, सोनिया, प्रियांका यांपैकी एकही जण दिल्लीत उपस्थित नसल्याचे समजते. त्याचबरोबर काँग्रेसच्या ‘जी-२३’ गटातील नेते कपिल सिब्बल यांनीही बुधवारी पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेतृत्वाला आरसा दाखविण्याचा जुनाच राग आलापला. पण, या सगळ्या घडामोडी पाहता, या पक्षातील ‘हायकमांड’पासून ते अगदी नेतेमंडळींच्या पातळीवर किती अनागोंदी माजली आहे, याचे संपूर्ण चित्रच स्पष्ट व्हावे.
कन्हैया, जिग्नेशच्या प्रवेशाने काँग्रेसने आपल्या फाटक्या चादरीला ठिगळ लावण्याचा उद्योग केला खरा. पण, ठिगळाचा कपडाही चादरीइतकाच जुनाट असेल तर तो टिकणार तरी किती म्हणा! तीच गत हार्दिक, कन्हैया आणि जिग्नेश या त्रिकुटाची. कोणे एकेकाळी पाटीदार आंदोलनाचा चेहरा असलेला हार्दिक पटेल कालांतराने कालबाह्य ठरला. कन्हैयाची देशद्रोही प्रतिमा तो काँग्रेसमध्ये आला म्हणून जनमानसातून पुसली जाईल, असे कदापि नाही. उलट काँग्रेसमध्ये देशद्रोहींना कसे मानसन्मानाने सामावून घेतले जाते हे पाहता, काँग्रेसचा पारंपरिक मतदारही दुखावला जाऊ शकतो. जिग्नेश मेवानीही असाच केवळ दलितकार्ड खेळून आपली राजकीय पोळी शेकणारा. त्यामुळे पक्षात केवळ तरुणांची भरती केली म्हणजे अख्खा पक्ष, पक्षाची विचारधारा कधीही बदलत नसते की, यामुळे तरुणवर्गाची आयती मतंही पदरी पडत नसतात. पण, ज्या पक्षाला मुळी अद्याप स्थायी अध्यक्षच नाही, जिथे सगळा कारभाराच गांधीभरोसे चालतो, त्या पक्षाला सक्षम विरोधी पक्षाची जबाबदारी भविष्यातही पेलता येईल, ही आशाच मुळी फोल ठरावी. तेव्हा, या बिनकामी त्रिकुटासारख्या १०० जणांनी जरी काँग्रेसचा ‘हात’ धरला, तरी या कणाहीन पक्षाला कोणीही उभारी देऊ शकत नाही, हेच खरे!


@@AUTHORINFO_V1@@